आरे वाचवा मोहीम कुठे थांबली ?
मुंबई : मेट्रो कारशेडला विरोध करणाऱ्या कथित पर्यावरणप्रेमी संस्था, बॉलीवूड सेलिब्रिटी ठाकरे सरकारच्या काळात मात्र, चिडीचूप आहेत. 'मेट्रो २ अ' या प्रकल्पासाठी ५०८ झाडे हटवण्यात येणार आहेत. त्यापैकी एकूण १६२ झाडांची कत्तल केली जाणार आहे. मात्र, फडणवीस सरकारच्या कार्यकाळात याच गोष्टीविरोधात तत्कालीन मेट्रोच्या संचालक अश्विनी भिडेंविरोधात रान उठवणारे कथित पर्यावरणप्रेमी मात्र, मुग गिळून गप्प बसले आहेत. विरोध सोडाच मात्र, याविरोधात कुठेही वाच्यताही त्यांनी अद्याप केलेली नाही यामुळे कमालिचे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
आरे वाचवा मोहिमेत पर्यावरण प्रेमींची बाजू उचलून धरणारी शिवसेना सत्तेत आल्यावर मात्र, त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे का, असा सवाल आता विचारला जात आहे. गोरेगाव आणि अंधेरीतील डीएन नगर ते कांदिवलीतील मार्गावर येणारी झाडे हटवण्यात येणार आहे. काही झाडांचे पूर्नरोपण केले जाणार आहे मात्र, १६२ झाडांची कत्तल होणार आहे. सत्ता आल्यावर शिवसेनेचा पर्यावरण वाचवा, आरे वाचवा मोहिमेसंदर्भातील विचार बदलला आहे का असा प्रश्न विचारला जात आहे.
सरकार आल्यावर वृक्षतोड करणाऱ्यांना पाहुन घेऊ, असे वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले होते. आरे कारशेडला स्थगिती देऊन अहवालही मागितला होता. मात्र, या अहवालात आरे कारशेडला सध्याची जागाच योग्य असल्याचा निष्कर्ष आला होता. आदित्य ठाकरे यांनीही आरे आंदोलकांची भूमीका उचलून धरली होती. आता ते पर्यावरण मंत्रीही झाले. मात्र, मेट्रो कामांसाठी झाडांची कत्तल सुरूच आहे.
आरे आंदोलनाला काही कथित पत्रकार, पर्यावरण प्रेमी, बॉलीवूड सेलिब्रिटी यांनी उचलून धरले होते. मात्र, आता नव्याने होणाऱ्या वृक्षतोडीविरोधात कुणी आवाज उचलायला तयार नाही, किंवा आरे कारशेड संदर्भातील अहवालावर आवज उठवायलाही कुणी नाही. त्यावेळी आरे आंदोलनात उतरलेले कित्येक राजकीय व्यक्ती आता राज्यात मंत्री आहेत. मात्र, त्यांच्याकडूनही कुठलीही ठोस भूमीका घेतली जात नाही. मग हा विरोध केवळ राजकीय स्वार्थासाठी त्यावेळी करण्यात आला होता का, असाही सवाल आता विचारला जात आहे.