‘मीडियम स्पाइसी’ चित्रपटाव्दारे अरुंधती नाग चार दशकांनंतर परतणार मराठी सिनेसृष्टीत!!

17 Mar 2020 16:23:12

medium spicy_1  



ललित प्रभाकारही दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत



मुंबई : सिने आणि नाट्यविश्वातील ज्येष्ठ अभिनेत्री अरूंधती नाग लॅन्डमार्क फिल्म्स प्रस्तूत ‘मीडियम स्पाइसी’ ह्या सिनेमाव्दारे मराठी चित्रपटसृष्टीत परतणार आहेत. पद्मश्री अरूंधती नाग ह्यांनी सुमारे ४० वर्षांपूर्वी ’२२ जून १८९७’ या मराठी चित्रपटाव्दारे सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. त्यानंतर आता विधि कासलीवाल निर्मित, मोहित टाकळकर दिग्दर्शित आणि इरावती कर्णिक लिखीत, ‘मीडियम स्पाइसी’ सिनेमातून त्या पुन्हा एकदा मराठीत मनोरंजन विश्वात दिसणार आहेत. आणि ही निश्चितच त्यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची पर्वणी आहे.


अरूंधती नाग ह्यांच्या भूमिकेविषयी सांगताना दिग्दर्शक मोहित टाकळकर म्हणाले, “चित्रपटाचे कथानक आकारत असताना, ‘लक्ष्मी टिपणीस’ह्या भूमिकेसाठी माझ्या डोळ्यांसमोर फक्त अरूंधती नाग ह्यांचीच प्रतिमा उभी राहिली. लक्ष्मी टिपणीस अतिशय प्रगल्भ आणि पुरोगामी स्त्री आहे. पण त्यासोबतच ती जेवढी बुध्दिमान आहे, तेवढीच तिच्यात मायेची उब आहे. सिनेमात जेव्हा लक्ष्मीची एन्ट्री होते, तेव्हा तिला पाहताच तिच्या चैतन्यमयी व्यक्तिमत्वाची जाणीव व्हावी, असं मला वाटलं. म्हणूनच अरूंधती ह्यांना ही भूमिका ऑफर केली.”


मोहित पूढे म्हणाले, “मी अरूंधती नाग ह्यांना गेली १५-२० वर्ष ओळखतो. त्या जेवढ्या बहुआयामी आणि प्रतिभावान कलाकार आहेत, तेवढ्याच नम्रही आहेत. आपल्या भूमिकेच्या लांबीपेक्षा कलाकृतीत समरसून व्यक्तिरेखेशी एकनिष्ठ राहण्याकडे त्यांचा कल असतो. त्या जरी मराठीत ४० वर्षांनी परतत असल्या तरीही, त्यांचे मराठीवर प्रभूत्व आहे आणि मुख्य म्हणजे सिनेमाच्या भाषेवर त्यांचे प्रेम आहे.”


मराठीतल्या आपल्या पुनरागमनाबाबत राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्री अरूंधती नागही खूप उत्सुक आहेत. त्या मराठी सिनेसृष्टीत परतण्याविषयी म्हणाल्या, “४० वर्षांनंतर मराठी सिनेसृष्टीत परतणं, ही निश्चितच आल्हाददायक गोष्ट आहे. परतताना एखाद्या नवोदितासारखी अनुभूती होतेय. बंगलोरला आमच्या रंगशंकरा नाट्यमंदिरात मोहित त्याच्या नाटकांचे प्रयोग करायला येत असतो. अशाच एका प्रयोगावेळी मोहित मला त्याच्यासोबत बसायची विनंती करत म्हणाला, अरू अक्का, मी लवकरच एक चित्रपट दिग्दर्शित करतोय. त्यामध्ये तू एक भूमिका करावीस, अशी माझी इच्छा आहे.”


अरूंधती नाग ह्यांना मोहितच्या कलाकृती आवडतात. त्यामुळे त्यांनाही मोहितच्या ह्या सिनेमाचा भाग होणं आवडलं. मोहितसोबतच ललित प्रभाकरचीही त्यांनी प्रशंसा केली. त्या म्हणाल्या, “चित्रपटाचे कथानक आणि व्यक्तिरेखेविषयीची माहिती मला पाठवण्यात आली होती. पण सेटवर पोहोचल्यावर ती भूमिका जिवंत करताना खरी गंमत आली. ललित प्रभाकरसोबत संहितेचे वाचन केले. ललित त्याच्या भूमिकेत चांगलाच उतरला होता. एका प्रतिभावान दिग्दर्शकासोबत काम करायला आणि एक अद्भूत सशक्त महिलेला साकारायला मिळाल्यावर अभिनेत्री म्हणून काही विशेष अवघड करावं लागलं नाही.”


अरूंधती नाग ह्यांच्या दर्जेदार अभिनयाची प्रशंसा करताना मोहित टाकळकर म्हणतात, “ त्या जरी ज्येष्ठ अभिनेत्री असल्या तरीही आपल्या प्रगाढ अनुभवाचे ओझे घेऊन त्या सेटवर येत नाहीत. त्या दिग्दर्शकाच्या दृष्टिकोणाचा आदर करतात आणि मग त्याप्रमाणे आपल्या व्यक्तिरेखेवर काम करतात.”


Powered By Sangraha 9.0