‘गो कोरोना’ एकत्रित प्रयत्न करू..

    दिनांक  17-Mar-2020 21:48:28
|


happywali feeling_1 


चीनमधून सुरू झालेल्या ‘कोरोना’ व्हायरस नावाच्या वादळाने जगभरात धुमाकूळ घातला आहे आणि त्याच्या लाटेत आजवर असंख्य निष्पाप बळी पडले आहेत. भारतात पण सगळीकडे भीतीचे वातावरण आणि त्यात धोक्याची घंटा म्हणजे महाराष्ट्रात भारतातले सर्वात जास्त रुग्ण आढळले आहेत. म्हणून आम्ही निवडलं ‘गो कोरोना’ नावाचं जनजागृती माध्यम...


दरवर्षीप्रमाणे याही वर्षी होळी अनाथाश्रमातील चिमुकल्यांसोबत साजरी करण्यासाठी
‘टीम हॅप्पीवाली फीलिंग’ बदलापूरमधील ‘सत्कर्म आश्रमा’त दाखल झाली, यंदा होळीच्या सणावर ‘कोरोना’ नावाच्या भीतीची चादर पसरली होती. कारण, भारतात होळीसाठी वापरले जाणारे रंग चीनकडून आयात केलेले असतील तर त्यातून कोरोनाची बाधा होऊ शकते, असे बरेचसे संदेश सोशल मीडियावर जोरात व्हायरल झाले होते. मग आम्ही पण चांगलीच तयारी करून गेलो होतो. आम्ही रंगांऐवजी २५ किलो फुले हा पर्याय निवडला होता आणि होळी फुलांच्या पाकळ्यांनी खेळण्याचा संकल्प केला होता. होळीच्या दिवशी सकाळी पहिल्यांदा सर्व मुलांना विविध रंगांनी नटलेली फुलझाडांची रोपटी देण्यात आली आणि त्यांचे वृक्षारोपण चिमुकल्यांच्या हातून करण्यात आले या उपक्रमातून कळत नकळत होळीच्या दिवशी सर्वांचे हात मातीच्या रंगाने रंगले.मुलांनी आपापल्या झाडाला छान नावे दिली आणि त्यांनी त्यांचे संगोपन करण्याचा निश्चय केला
. त्यानंतर टीमने मुलांसोबत फुलांच्या पाकळ्याने दिलखुलास होळी खेळली. एक वेगळाच प्रयत्न होता आनंद लुटण्याचा आणि मनात ठरवलेले त्याहून कितीतरी जास्त पटीने आनंद लुटायला भेटला फुलपाकळ्यांच्या होळीने. एक ते दीड तास होळीचा बेधुंद आनंद लुटून झाल्यावर सर्वांनी मिळून पाकळ्या जमा केल्या आणि त्या पाकळ्यांचे खत म्हणून कसे वापर करू शकतो याचे चांगले प्रशिक्षण मुलांना देण्यात आले. आता वेळ होती आजच्या दिवसातले खरे गुपित सर्वांपर्यंत पोहोचवण्याची, म्हणजे आम्ही सध्याच्या जीवंत विषयावर बसवलेले पथनाट्य ‘कोरोना गो’ याच्या सादरीकरणाची.अनाथाश्रम म्हणजे अशी जागा जिथे प्रत्येक दिवशी विविध लोकांची ये
-जा असते, बर्‍याच कार्यक्रमांचे आयोजन केलेले असते. त्यामुळे तेथील मुलांना प्रत्येक दिवशी बर्‍याच मंडळींना भेटावे लागते, सामोरे जावे लागते ही गोष्ट लक्षात घेऊन या मुलांमध्ये कोरोनाबद्दल जनजागृती करण्याचे काम आम्ही हास्य विनोदी पथनाट्य माध्यमातून केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण कोणत्या गोष्टी टाळाव्यात आणि कोणत्या गोष्टीची दक्षता घ्यावी, हा संदेश मुलांमध्ये दिला आणि मुलांनीही आनंदाने त्या नाटकाच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी समजून घेतल्या.पथनाट्यात मांडलेले ठळक मुद्दे खालीलप्रमाणे


-
आरोग्यदृष्ट्या आजारी व्यक्तीशी जवळचा संबंध टाळावा.

- हात साबणाने कमीत कमी २० सेकंद स्वच्छ धुवावेत.

- सर्दी खोकला ताप यासारख्या आजारांची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा.

- अन्न व्यवस्थित शिजवून सेवन करणे.

- सहसा गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे आणि अनिवार्य असल्यास नाकावर मास्क लावून जाणे.

- खोकताना किंवा शिंकताना नाकासमोर रुमाल घेणे.

- आरोग्याची काळजी घेणे नेहमीच चांगले. सोशल मीडियावरील अफवांवर लक्ष देऊ नये. डॉक्टरांचा सल्ला सर्वात उत्तम.

- कोरोनाचा आकार मोठा आहे ४००-५०० मायक्रो, त्यामुळे कोणत्याही साध्या मास्कमुळेही संरक्षण होऊ शकते. खर्चिक मास्क घेण्याची आवश्यकता नाही.

- विषाणूचे वजन जास्त असल्यामुळे तो हवेत तरंगत नाही. खाली पडतो. त्यामुळे त्याचा संसर्ग हवेतून होत नाही.कपड्यांवर पडलेला विषाणू नऊ तास राहतो. केवळ स्वच्छ कपडे धुवून वाळवल्यास विषाणू मरतो.

- हातावर पडलेला विषाणू १० मिनिटे जगतो.

- स्वच्छ साबणाने हात धुणे किंवा हॅण्डसॅनिटायझर वापरणे हे प्रतिबंध करण्यास पुरेसे आहे.

- कोमट पाण्यात मीठ टाकून गुळण्या केल्यास विषाणू घशातच मारला जातो. फुप्फुसात संसर्ग होत नाही. २६ ते २७ डिग्री तापमानात विषाणू टिकाव धरू शकत नाही. त्यामुळे उष्ण प्रदेशात विषाणू जगू शकत नाही.

- भारतीय जीवनशैलीचा वापर करा म्हणजे हात जोडून नमस्कार करा.

- प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी रोज सूर्यनमस्कारसारखा व्यायाम करावा.संपूर्ण नाटकाचा विषय खेळकर पद्धतीने मांडला असल्याने मुलांनी हे नाटक मोठ्या आनंदाने पाहिले आणि त्यातल्या सर्व मुद्द्यांचा बोध घेतला
. नाटकानंतरनक्की कोणत्या गोष्टी कराव्यात आणि करू नये असे विचारल्यावर मुलांनी मुद्देसूद प्रत्येक गोष्टी सांगितल्या आणि आम्ही या सगळ्या गोष्टी आजपासूनच अंमलात आणू, असे वचनदेखील दिले. अशा पद्धतीने होळीचे औचित्य साधून आनंदोत्सव मोठ्या थाटात पार पडला. सदर पथनाट्य वेगवेगळ्या गर्दीच्या ठिकाणी सादर करून जनजागृती करण्याचा मानस टीमने पक्का केला होता. परंतु, जमावबंदी असल्याने त्याचे सादरीकरण करण्यात यश येऊ शकले नाही. पण मग पथनाट्यातलाच एक मुद्दा सोशल मीडिया यावर लक्ष केंद्रित केले आणि ‘गो कोरोना’ शीर्षकाने सदर पथनाट्य युट्यूब माध्यमाच्या happywalifeeleing संकेतस्थळावर अपलोड केले आणि एका दिवसात हे पथनाट्य अडीचशेहून जास्त जणांनी पाहिले आणि प्रत्येकाने यावर सकारात्मक प्रतिसाददेखील नमूद केले. त्यामुळे जनजागृतीचा उद्देश खर्‍या अर्थाने सफल झाला. ज्या पद्धतीने सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवांचा वणवा पसरू शकतो. त्याचप्रमाणे सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘टीम हॅप्पीवाली फीलिंग’ने जनजागृतीच्या निखळ आनंदी सरी बरसवल्या. देव करो आणि आता या सरींच्या प्रवाहात कोरोना नावाचा राक्षस कायमचा वाहून जावो आणि भूतलावर पुन्हा एकदा आधीसारखा निखळ आनंद पसरो. ‘हॅप्पीवाली फीलिंग’चा निखळ आनंद आश्रमातील मुलांना निरंतर असाच मिळत राहो हीच सदिच्छा.विजय दादा आणि त्यांची टीम आमच्याकडे आले की
, खूप मज्जा येतेच. पण, यावेळी आम्ही खूप जास्त धमाल केली. दादाने फुलांची झाडे आणली होती. आम्ही छान खड्डा खणला आणि त्यात झाडे लावली. मग आम्ही त्या फुलझाडांना नावे दिली. मी माझ्या झेंडूच्या रोपट्याचे नाव ’अजय देवगण’ ठेवलं. पुढच्या दोन महिन्यात झाडाची जो चांगली काळजी घेईल, त्याला मस्त बक्षिस मिळणार आहे. माझा अजय देवगण दोन महिन्यात मस्त बॉडी बिल्डर बनणार, इतकी काळजी नक्की घेईन मी. त्यानंतर आम्ही फुलांच्या पाकळ्यांनी होळी खेळलो. पहिल्यांदा वाटले रंग नाही तर मज्जा येणार नाही, पण फुलांच्या पाकळ्यांनी वेगळीच वातावरण निर्मिती झाली. आम्ही त्याच त्याच पाकळ्या गोळा करून परत उडवायचो. मग सगळ्यांनी मिळून एक नाटक दाखवलं, त्यात कोरोना आजारापासून लांब राहण्यासाठी काय काय केले पाहिजे हे मस्त सांगितले. त्यातली राजा प्रधानाची कॉमेडी बघून खूप जास्त हसायला आलं. पण आता आम्हाला माहीत झालं की, स्वतः या व्हायरसपासून लांब राहण्यासाठी काय केले पाहिजे.


-
अजय, आश्रमातल्या चिमुकल्याचे मनोगत‘हॅप्पीवाली फीलिंग’ हा आमच्या आश्रमातील मुलांच्या आनंदाचा अविभाज्य घटक झाला आहे, या टीमचं करावं तेवढं कौतुक कमी! कारण, ही सगळी मंडळी प्रत्येक वेळी काहीतरी नवीन विषय घेऊन मुलांमध्ये नवचैतन्य निर्माण करतात. ‘हॅप्पीवाली होळी’ हा आजपर्यंतचा त्यांचा हटके उपक्रम! कारण, फुलांच्या पाकळ्यांनी होळी आयुष्यात पहिल्यांदा यांच्यामुळे पाहायला मिळाली. पोरं तर पार आनंदाने वेडावून गेली होती पाकळ्या चौफेर उधळताना आणि विशेष म्हणजे, त्याच पाकळ्यांचे खत कसे बनवायचे हा विषय मांडला तेव्हा तर पार मनात घर केलं या टीमने. उपक्रमाचा सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे ’कोरोना गो’ नाटक, पथनाट्य माध्यमातून अगदी मुलांच्या शैलीत गंभीर विषय इतक्या सहज हाताळला की, ते शब्दात सांगणे शक्य नाही.


-
गेनू कांबळे, सत्कर्म आश्रमाचे अधीक्षकजसे ग्रुपचे नाव तसेच ग्रुपचे सदस्य आणि त्यांचे कामही
. मी सोशल मीडियाच्या माध्यमातून दादांना भेटले आणि या परिवाराची सदस्य झाले. मी पहिल्यांदा भेटले ते महिला दिनाच्या दिवशी. निमित्त होते ‘सत्कर्म आश्रम’ येथील फुलांची होळी. आश्रमातील मुले आमच्यासोबत झाडे लावत होती. आपापल्या झाडाला विशेष नाव देत होती. आम्ही सगळ्यांनी त्यांच्यासोबाबत खूप मज्जा केली. नाचगाणी, देवाघरच्या फुलांसोबत फुलांची होळी, गप्पामस्ती, खेळ सगळे काही माझ्यासाठी नवीन आणि छान होते. त्यात कार्तिक हा माझा ‘गेमपार्टनर’ आणि माझा ‘फेव्हरेट’ पण झाला. तो फारच गोंडस व छान आहे. बघू पुढे जमले तर त्याच्यासाठी काहीतरी छान नक्की करेन. फुलांच्या होळीचा अनुभव फारच छान आणि अविस्मरणीय होता. आधी मला फार वाईट वाटले त्या निरागस छोट्या मुलांना बघून, पण त्यांच्या चेहर्‍यावरचे हसू बघून फार समाधानी वाटत होते. तेव्हाच मी मनाशी ठरवले की आपण या मुलांना आपल्या परिने होईल तेवढे खूश ठेवायचे. आज खर्‍या अर्थाने ‘हॅप्पीवाली फीलिंग’ अनुभवली, किंबहुना घेता आणि देता आली. जाताना तर तिथून पायच निघत नव्हता. पण सोबत खूप सार्‍या छान आठवणी आणि आनंदी चेहर्‍यावरचे हसू सोबत घेऊन जात होते.


-
भक्ती खरात, ‘हॅप्पीवाली टीम’मधील नवीन सदस्य


- विजय माने
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.