स्वागत, पण...

16 Mar 2020 21:09:35
agralekh_1  H x


मायावती, रामदास आठवले, प्रकाश आंबेडकर यांच्यानंतर वंचित, शोषितांना चंद्रशेखर आझाद यांच्या रूपात आणखी एक नवा नेता मिळाल्याचे दिसते. पण, आपण नेमकी कोणती वाट धरायची, समन्वयाची की द्वेषाची, सर्वांना सोबत घेण्याची की विशिष्ट समाजाविरोधात समर्थकांना भडकविण्याची, हे त्यांचे त्यांनीच ठरवले पाहिजे.



बहुजन समाज पक्षाचे संस्थापक कांशीराम यांच्या ८६व्या जयंतीदिनी रविवारी ‘भीम आर्मी’ या संघटनेचे प्रमुख चंद्रशेखर आझाद ऊर्फ रावण यांनी ‘आझाद समाज पक्षा’च्या स्थापनेची घोषणा केली. नोएडा येथे आयोजित केलेल्या मेळाव्यात उत्तर प्रदेशसह अनेक ठिकाणांहून आलेल्या कायकर्त्यांच्या उपस्थितीत चंद्रशेखर आझाद यांनी राजकारणातील हे पुढचे पाऊल टाकले. ‘आझाद समाज पक्षा’च्या स्थापनेवेळी २८ माजी आमदारांसह सहा माजी खासदारही मंचावर उपस्थित होते. दरम्यान, रावण यांच्या पक्षस्थापनेमुळे उत्तर प्रदेशात व नंतर देशातही स्वतःला अनुसूचित जाती-जमाती, आंबेडकरी समाजाचा हितरक्षक म्हणवून घेणार्‍या बहुजन समाज पक्षाला तगडा झटका बसल्याचे दिसते. उत्तर प्रदेशात येत्या दोन वर्षांत म्हणजे २०२२ साली विधानसभा निवडणुका होणार आहेत. तत्पूर्वी ‘तिलक, तराजू और तलवार, इनको मारो जूते चार’ चा नारा देणार्‍या बहुजन समाज पक्षप्रमुख मायावती यांनी चारवेळा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाचा कारभार सांभाळला. मधल्या काळात मायावती यांनी आपल्या मूळच्या घोषणेत बदल करून ‘हाथी नही गणेश है, ब्रह्मा विष्णू महेश है’ ची हाक देत ‘सोशल इंजिनिअरिंग’चा प्रयोगही करून पाहिला. परंतु, मायावतींनी अनेकदा मुख्यमंत्रिपदाची खुर्ची हस्तगत करूनही दलित समाजाला पुरेसा न्याय दिला नाही, दलितांच्या समस्या, प्रश्न, अडचणी सोडवल्या नाही, दलितांच्या उत्थानासाठी भरीव कार्य केले नाही, असे आरोप चंद्रशेखर आझाद यांच्याकडून सातत्याने करण्यात आले. रावण यांच्या या आरोपांना मायावती यांनीही उत्तर देण्याचा प्रयत्न केला. मात्र, चंद्रशेखर आझाद भाजपचे एजंट आहेत, याव्यतिरिक्त दुसरा कोणताही मुद्दा मायावती पुढे करू शकल्या नाहीत. म्हणूनच स्वतःचे आणि हत्तीचे पुतळे उभारणार्‍या किंवा नातलगांच्या संपत्तीत एकाएकी भरमसाट वाढ झाल्याने टीकेच्या धनी ठरलेल्या मायावतींनी ठोस उत्तर न दिल्याने रावण यांनी केलेल्या आरोपात तथ्य असल्याचे नाकारता येणार नाही.


आता मात्र चंद्रशेखर आझाद यांच्या पक्षस्थापनेनंतर आझाद समाज पक्षाकडून मायावतींच्या बहुजन समाज पक्षाशी निवडणुकीच्या मैदानात थेट संघर्षाला सुरुवात होईल. परंतु, रावण यांनी आपल्या नव्या पक्षाच्या घोषणेनंतर मायावतींवर हल्लाबोल न करता निराळी भूमिका घेतली. “मायावती सर्वकाही एकट्याच्या बळावर करू शकत नाही. त्या अनेक वर्षांपासून काम करत आहेत आणि म्हणूनच आम्हीही त्यांच्या आंदोलनात सहकार्य करण्यासाठीच उतरलो आहोत. राजकारणात कोणीही दीर्घकाळ शत्रू म्हणून राहू शकत नाही आणि मायावतींच्या आशीर्वादाने आम्हीही राजकारणात स्वतःला प्रस्थापित करू,” असे ते म्हणाले. इथे चंद्रशेखर आझाद यांच्यातील धूर्त राजकारणी दिसतोच, तसेच मायावतींवर निशाणा न साधता आशीर्वादाची भाषा करत बहुजन समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपल्यामागे वळावे, यासाठीचा पवित्राही दिसतो. कारण, पुढील निवडणुकीत आझाद समाज पक्षाला मतदानाच्या टक्केवारीतून आपले अस्तित्व दाखवून द्यावे लागेल, निदान पश्चिम उत्तर प्रदेश या आपल्या प्रभावक्षेत्रात तरी चांगली कामगिरी करावी लागेल, निवडणुकीतून नवीन समीकरणे तयार करावी लागतील, तरच त्या पक्षाची दखल घेतली जाईल. म्हणूनच पक्षसंस्थापकाने ‘कोणीही कोणाचा कायमचा शत्रू नसतो,’ असे म्हणत मायावतींच्या पाठीराख्यांनाही साद घातल्याचे दिसते.


दरम्यान, रावण असो किंवा आणखी कोणी, लोकशाही व्यवस्थेत नेत्याने स्वतःचा पक्ष स्थापन केलाच पाहिजे. दलितांना, वंचितांना, शोषितांना अशा पक्षाच्या माध्यमातून आवाज हा मिळालाच पाहिजे. चंद्रशेखर आझाद यांनी तेच केले आणि त्यांच्या निर्णयाचे स्वागतही करायला हवे, पण केवळ पक्ष स्थापन केल्याने सामाजिक, आर्थिक, राजकीयदृष्ट्या मागासलेल्या समाजाचे खरेच कितपत भले होते, हाही एक प्रश्नच. उत्तर प्रदेशात मायावतींनी ज्याप्रमाणे बहुजन समाज पक्षाच्या माध्यमातून दलितकेंद्री राजकारण केले, तशाच प्रकारचे राजकारण महाराष्ट्रातल्या दोन पक्षांनीही केले. रामदास आठवले यांचा ‘रिपब्लिकन पक्ष’ आणि प्रकाश आंबेडकर यांचा पूर्वाश्रमीचा ‘भारिप बहुजन महासंघ’ किंवा नव्या अवतारातला ‘वंचित बहुजन आघाडी.’ हे पक्ष कायमच दलितकेंद्री राजकारण करत आले. तथापि, रामदास आठवले आणि प्रकाश आंबेडकर यांच्या राजकारणातला मूलभूत फरक लगेच ओळखू येतो. ‘दलित पँथर’ या आक्रमक संघटनेपासून रामदास आठवले यांनी आपल्या राजकीय वाटचालीला सुरुवात केली. पुढे राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरही आठवले यांनी आमदार, खासदार वा मंत्री म्हणून काम केले. पण, त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत कधीही विखाराची पेरणी केल्याचे दिसले नाही. काही अपवाद वगळता विद्रोही किंवा तत्सम गट-संघटनांनी नेहमीच देशात हिंदूद्वेषाचे, संघद्वेषाचे काम केले. अजूनही एकेकाळी कोणत्या तरी समाजघटकाने आमच्या पूर्वजांवर अन्याय केल्याने आताच्या हिंदुत्ववाद्यांना देशाबाहेर हाकलून देण्याची भाषा अशा लोकांकडून केली जाते. रामदास आठवलेंनी मात्र असे जाती-जातीत, समाजा-समाजात फूट पाडण्याचे राजकारण केले नाही. भले त्यांनी राजकारणातील कालच्या मित्रांना सोडून नवे मित्र केले असतील, पण समाजात विष कालवण्याचे काम कधीच केले नाही. म्हणूनच त्यांच्याविषयी सर्वच समाजघटकांत आपलेपणाची भावना असल्याचे दिसते. तसेच सर्वांना बरोबर घेऊन चालण्याच्या वृत्तीमुळे त्यांना अनेकदा सत्तेतही सहभागी होता आले. तसेच त्या माध्यमातून आपल्या समाजासाठी, पाठीराख्यांसाठी काम करता आले, त्यांच्या समस्या-प्रश्न सरकारदरबारी मांडून ते सोडवता आले.


नेमके याच्या उलट उदाहरण प्रकाश आंबेडकरांचे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या प्रज्ञासूर्याचा वारसा मिळूनही प्रकाशबापूंनी एका समाजाला दुसर्‍या समाजासमोर उभे करण्यालाच आपले राजकीय उद्दिष्ट मानत नको ते उद्योग केले. गेल्या काही वर्षांत तर प्रकाश आंबेडकरांनी असदुद्दीन ओवेसींच्या धर्मांध एमआयएम पक्षाशीही आघाडी केली. कदाचित हिंदूद्वेषाची आणि संघद्वेषाची भूक त्यांना यातून भागवता आली असेल, पण त्यामुळे आंबेडकरी समाजाला काय लाभ झाला? एल्गार परिषद आणि कोरेगाव-भिमा येथील हिंसाचारानंतरही प्रकाश आंबेडकरांनी हिंदुत्ववाद्यांनाच लक्ष्य केले. इतकेच नव्हे तर माओवाद्यांना आपले म्हणण्याचे कामही प्रकाश आंबेडकरांनी केले. आताच्या नागरिकत्व सुधारणा कायद्यालाही प्रकाश आंबेडकरांनी विरोधच केला. म्हणजे ज्यामुळे समाजात दुफळी निर्माण होईल, त्या घटकाच्या जवळ जाण्याचे काम या सगळ्यातून प्रकाश आंबेडकरांनी केल्याचे दिसते. इथेच रामदास आठवले आणि प्रकाश आंबेडकर यांच्यातील वेगळेपण लक्षात येते व आठवलेंचे राजकारण समन्वयाचे असल्याचे आणि प्रकाश आंबेडकरांचे राजकारण दुहीच्या पायावर आधारल्याचे स्पष्ट होते. आता, मायावती, रामदास आठवले, प्रकाश आंबेडकर यांच्यानंतर वंचित, शोषितांना चंद्रशेखर आझाद यांच्या रूपात आणखी एक नवा नेता मिळाल्याचे दिसते. पण, आपण नेमकी कोणती वाट धरायची, समन्वयाची की द्वेषाची, सर्वांना सोबत घेण्याची की विशिष्ट समाजाविरोधात समर्थकांना भडकविण्याची, हे त्यांचे त्यांनीच ठरवले पाहिजे. अर्थात, भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशांत सर्वांना बरोबर घेण्याला दुसरा कोणताही पर्याय असू शकत नाही. तसे केल्यास लाभापेक्षा हानीच होऊ शकते आणि हे ओळखून रावण यांनी काम केले तर त्यांना यश मिळेल; अन्यथा केवळ निवडणूक आयोगाकडे नोंदणी केलेला एक पक्ष एवढ्यापुरतेच त्याचे अस्तित्व राहील.


Powered By Sangraha 9.0