देश कसा घडतो?

    दिनांक  16-Mar-2020 21:57:25   
|
washington_1  H
संविधान समजून घेण्यासाठी ज्या देशाने जगातील पहिले लिखित संविधान निर्माण केले, त्या देशाचा संविधान निर्मितीचा प्रवास समजून घ्यावा लागतो. समजून घ्यावा लागतो म्हणजे अभ्यास करावा लागतो.आपल्या देशात काही विषय सतत चर्चेचे राहतात. चर्चा करण्यात न्यायमूर्तींपासून ते गल्लीतील कृष्णमूर्तींपर्यंत सर्वच जण भाग घेत असतात. कधी कुणाला असे वाटते की, सेक्युलॅरिझम धोक्यात येत चाललेला आहे, तर कुणाला भारताच्या भवितव्याची चिंता असते. आपण कोठे चाललो आहोत? लोकशाही राहणार का? एकाधिकारशाही निर्माण होणार का? मग मधूनच कुणाला तरी जाग येते आणि त्याला देशाचे संविधान आठवते. मग तो ‘संविधान खतरे में हैं’ची बांग देतो. संविधानाला धरून एखादा बहुविधतेचा राग आळवायला सुरुवात करतो. प्लुरॅलिझमचा राग आळवायला सुरुवात करतो.


असे विषय, बोलणार्‍या व्यक्ती त्या कोणत्या स्थानावर आहेत, यावरुन त्यांची भाषा लक्षात येते. न्यायालयातील माणूस असेल तर तो कायद्याच्या भाषेत बोलतो, जी सामान्य माणसाच्या डोक्यावरून जाते. राजकारणी असेल तर उपरोधिक बोलेल, खवचट बोलेल, प्रतिस्पर्ध्याला कोंडीत पकडणारे वक्तव्य करील. विद्वान असेल तर कोणत्या विचारधारेचा आहे, यावरून त्याची भाषा समजते. तो जर डाव्या विचारसणीचा असेल तर की समजले पाहिजे की, हा अतिशय लबाड आणि धूर्त आहे. बुद्धिभेद करण्यात चतूर आहे. त्याला एका विचारधारेला ठोकायचे असते. तो त्याच्या जगण्याचा व्यवसाय आहे आणि जीवंत राहण्याचे ध्येय असते.


पण, आपण लक्षात ठेवायला पाहिजे की, देश कधी अशा वाचीवीरांनी घडत नसतो. उपदेश करण्याएवढे जगात सोपे काम नसते. सल्ला देण्यासारखा बिनभांडवली धंदा नसतो आणि टीका करण्याइतका सोपा मार्ग नसतो. अशा लोकांमुळे देश घडत नाही. समाजमन संस्कारित होत नाही. लोकांना दिशा मिळत नाही.


अशा लोकांची वक्तव्ये मी वाचत असतो. त्यामानाने आपल्या लोकांचे लिखाण मी कमी वाचतो. यामुळेच माझ्या मनात ‘संविधान’ समजून घेण्याची जिज्ञासा निर्माण झाली. एकेक पुस्तक करत करत या विषयाचे मी खूप वाचन केले. आनंद वाटत गेला, ज्ञानात प्रचंड भर पडत गेली. नंतर या विषयावर पुस्तके लिहिली आणि गेल्या तीन-चार वर्षांमध्ये असंख्य भाषणे केली. संविधानाचा अभ्यास करीत असताना दोन गोष्टी समजल्या. पहिली गोष्ट समजली ती या विषयात आपण मूर्ख ठरावे, इतके अज्ञानी आहोत आणि जे स्वत:ला ‘सज्ञान’ समजतात, ते ‘सज्ञानी मूर्ख’ या सदरात मोडणारे ठरतात. याला काही सन्मानीय अपवाद आहेत. ज्यांची विचाराला प्रवृत्त करणारी पुस्तके आहेत. जीवनाला दिशा देणारी पुस्तके आहेत, पण असे फार थोडे लोक आहेत.


संविधान समजून घेण्यासाठी ज्या देशाने जगातील पहिले लिखित संविधान निर्माण केले, त्या देशाचा संविधान निर्मितीचा प्रवास समजून घ्यावा लागतो. समजून घ्यावा लागतो म्हणजे अभ्यास करावा लागतो. लोकशाही राज्य उभे करणारी राज्ययंत्रणा निर्माण करण्याचा आधुनिक काळातील आपल्या देशाचा इतिहास नाही. आठव्या शतकापासून इस्लामच्या आक्रमणाखाली आपला देश तुडविला गेला. असंख्य छोट्या छोट्या राज्यांत आपण विभक्त राहिलो. मुस्लीम आक्रमक एक राज्य बुडविता, दुसरा राजा त्याची मजा बघत राहिला. तो त्याच्या मदतीला गेला नाही. शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात स्वत:चे राज्य उभे करण्याचा खटाटोप चालू केला. त्यांचे पाय खेचण्यासाठी मराठी सरदारच उभे राहिले. हजार वर्षांचा आपला इतिहास राज्य परक्यांच्या हातात कसे घालवावे, याचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज, राणा प्रताप याला अपवाद आहेत. पण, अपवाद देशाचा नियम झाला नाही.


जगातील पहिले लिखित संविधान करणारी अमेरिका, अठराव्या शतकात आपल्यासारखीच होती. ती १३ राज्यांत विभागलेली होती. त्याला ‘कॉलनीज्’ म्हणत. युरोपातील अनेक देशातील लोक या कॉलनीत राहत असत. त्या बहुसंख्य ब्रिटिशांच्या होत्या. ब्रिटिशांचे राज्य त्यांच्यावर होते. या १३ राज्यात राहणारे लोक ब्रिटनचा उल्लेख ‘मदर कंट्री’ असा करीत. ‘आम्ही राजाची एकनिष्ठ प्रजा आहोत,’ अशी त्यांची भावना होती. ब्रिटिशांनी जेव्हा अमेरिकेतील या १३ वसाहतींवर, युद्धाचा खर्च भरुन काढण्यासाठी कर लादायला सुरुवात केली, तेव्हा लोकांनी त्याचा विरोध केला. ब्रिटिशांनी तो मोडून काढण्याचा प्रयत्न केला. हिंसक लढ्याला सुरुवात झाली. अमेरिकेच्या स्वातंत्र्य युद्धाचा जन्म झाला.


या स्वातंत्र्ययुद्धाचा मुख्य वैचारिक विषय होता, ‘लिबर्टी’चा. ‘लिबर्टी’ म्हणजे पूर्ण मुक्तता, कशापासून तर राजसत्तेच्या, धर्मसत्तेच्या, रुढी-परंपरावादाच्या अन्यायकारक कायद्यापासून! ‘लिबर्टी’चे भाषांतर आपल्याकडे ‘स्वातंत्र्य’ असे करतात. मुक्तता प्राप्त झाल्यानंतर जी अवस्था येते, तिला ‘स्वातंत्र्य’ असे म्हणायचे. ‘लिबर्टी’च्या पुढची ही अवस्था आहे. या लिबर्टी युद्धाचे नेतृत्व सरसेनापती म्हणून जॉर्ज वॉशिंग्टन यांनी केले. १७८३ साली या युद्धाची समाप्ती झाली. अमेरिका स्वतंत्र झाली.


‘अमेरिका स्वतंत्र झाली’ याचा अर्थ अमेरिकेतील १३ राज्ये स्वतंत्र झाली. तेव्हा प्रश्न असा आला की, तुकड्यातुकड्यात विभागलेली १३ राज्यांची अमेरिका, तेव्हाच्या महासत्तांपुढे टिकाव धरू शकेल का? एकीत बळ असते आणि दुहीत दुर्बळता असते. अमेरिकेचा विचार करणारे जॉर्ज वॉशिंग्टन, बेंजामिन फ्रॅकलिन, जेम्स मॅडिसन, थॉमस जेफर्सन, अलेक्झांडर हॅम्लिटन, आदी थोर पुरुष अस्वस्थ झाले. त्यांनी १३ राज्यांचा संघ तयार केला. तो संघ चालविण्यासाठी राज्यघटना तयार केली. संघाला नाव दिले, ‘कॉर्नफेडरेसी’ आणि ते चालविणारे जे डॉक्युमेंट होते, ती झाली अमेरिकेची पहिली राज्यघटना.


या राज्यघटनेने १७८३ ते १७८७ पर्यंत अमेरिका कशीबशी टिकून ठेवली. या राज्यघटनेत अनंत दोष होते. ते वरील थोर पुरुषांच्या लक्षात आले. त्यांनी अमेरिका चालविणार्‍या संसदेपुढे ठराव मांडला की, आपल्याला या संविधानात सुधारणा केल्या पाहिजेत. त्यासाठी राज्याच्या तज्ज्ञ प्रतिनिधींनी फिलाडेलफिया येथे एकत्र जमले पाहिजे. मे १७८७ ला ते फिलाडेलफियाला एकत्र आले. आलटून पालटून ५० जण उपस्थित राहिले पाच महिने त्यांनी, यापूर्वी जगात कुणी केला नसेल असा उपक्रम केला आणि सात कलमांची अमेरिकेची राज्यघटना तयार केली. अध्यक्षीय पद्धतीच्या राजवटीचा त्यांनी शोध लावला. ती अंमलात आणायला सुरुवात केली. पहिले राष्ट्राध्यक्ष झाले, जॉर्ज वॉशिंग्टन. एकमताने त्यांची पहिल्यांदा आणि दुसर्‍यांदा निवड झाली. राष्ट्राध्यक्ष होण्यास ते अजिबात तयार नव्हते. पण, अमेरिका चालविणार्‍या लोकांनी ते ऐकले नाही आणि त्यांनाच राष्ट्राध्यक्ष केले.


नव्याने अस्तित्वात येणार्‍या देशाचा पहिला राष्ट्रप्रमुख ‘इतिहासपुरुष’ असतो. म्हणून राजकारणी स्पर्धा करतात. प्रतिस्पर्ध्याला पुढे येऊ देत नाहीत. त्याला झोपविण्याचा प्रयत्न करतात. सर्व प्रकारची योग्यता असताना सरदार पटेल भारताचे पहिले पंतप्रधान होऊ शकले नाहीत, हा आपला इतिहास ताजा आहे. अमेरिकेत याच्या उलटे झाले. सत्तास्पर्धा राजकारण्यांनी जवळजवळ आठ वर्षे बाजूला ठेवली. एकमताने जॉर्ज वॉशिंग्टन यांनाच निवडले. ते आपले राष्ट्रपिता आहेत, हे मनोमन प्रत्येकाने स्वीकारले होते. त्यांचे जीवन चरित्र उदात्त आणि थक्क करणारे आहे. एकच उदाहरण सांगतो, १७७६ पासून ते १७८३ पर्यंत ते सरसेनापती होते. आणि १७८९ ते १७९६ सालापर्यंत ते राष्ट्राध्यक्ष होते. किती पगार घेतला असेल त्यांनी? शून्य डॉलर. असे होते, वॉशिंग्टन!


राष्ट्राध्यक्षपदाची कारकिर्द संपल्यानंतर देशाला उद्देशून त्यांनी एक संदेश दिला. त्याला ‘फेअरवेल अ‍ॅड्रेस’ असे म्हणतात. हा संदेश सुमारे ३०-३२ पानांचा आहे. अठराव्या शतकातील इंग्रजीतील आहे. सहज समजायला कठीण. पण, समजला की, विसरणे कठीण, अशा योग्यतेचा आहे. त्यात चिरकालिकता आहे, शाश्वत विचार आहेत, देश उभा करायचा असेल, उभा ठेवायचा असेल, ताठ उभा ठेवायचा असेल तर काय करायला पाहिजे, हे रोखठोक भाषेत जॉर्ज वॉशिंग्टन यांनी सांगितले. कविता करण्याच्या भानगडीत ते पडले नाहीत. नंदनवनात जगायचे नसून भावी पिढ्यांसाठी नंदनवन निर्माण करायचे आहे, हा संदेश हे भाषण देतो. म्हणून त्यांच्या जन्मदिनी आजही अमेरिकेच्या सिनेटमध्ये या भाषणाचे वाचन होते.


जॉर्ज वॉशिंग्टन देशबांधवांना सांगतात की, “आपण जर एक राहिलो तर जागतिक स्पर्धेत टिकू. आपल्यात दुही निर्माण करण्यासाठी युरोपातील देश प्रयत्न करतील. आपल्यातीलच काही लोक त्यांना साथ देतील, त्यांचे हस्तक बनतील. बुद्धिभेद करणारे युक्तिवाद करतील. असेही सांगतील की, भौगोलिकदृष्ट्या आपण खूप मोठे आहोत. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर असे आपले चार भाग होतात. या भागांची वेगवेगळी राज्ये निर्माण केली पाहिजेत असेही सांगितले जाईल, या सर्वांपासून तुम्ही सावध असले पाहिजे. फूटपाड्या विचारांपासून आणि देशतोड्या विदेशी लोकांपासून आपण दूर राहिले पाहिजे.”


युरोपमध्ये लहान-लहान देश आपापसात लढत राहतात. आताही लढाया चालू आहेत, याची आठवण देऊन वॉशिंग्टन म्हणतात की, “युरोपच्या भानगडींपासून आपण आपल्याला वेगळे ठेवले पाहिजे. कोणत्याही सामर्थ्यवान देशाशी स्वत:ला कायमचे जोडून घेण्याची चूक आपण करू नये. त्यावर अवलंबून राहण्याची जर आपल्याला सवय लागली तर आपण नेहमीच दुर्बळ राहू. आपल्याला आपल्या पायावर उभे राहायला शिकले पाहिजे. आपले समर्थ नाविकदल आपण निर्माण केले पाहिजे. आपण सामर्थ्य संपन्न झालो की मग जगातील इतर देश आपली सन्मानाने दखल घ्यायला सुरुवात करतील.


सर्वांशी मैत्रभाव ठेवला पाहिजे. दोन देशांच्या लढाईत एकाचा पक्ष घेतला तर दुसरा आपला शत्रू होतो आणि नंतर युद्ध आपल्या भूमीवर येते. आपल्याला युद्ध नको आहे, शांतता हवी. म्हणून जगाच्या भानगडीपासून आपण आपल्याला अलिप्त ठेवले पाहिजे. (स्वातंत्र्यानंतर आपण काय केले, रशियाशी आपण बांधून घेतले. त्यामुळे त्यांचे डावे हस्तक देशात खूप प्रबळ झाले. जगातील इतर देश आपले शत्रू झाले. अमेरिकादेखील आपल्याला विचारीत नसे.)


व्यापारावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे सांगून व्यापाराचे मार्ग सुरक्षित कसे राहतील, ते बघायला आपण शिकले पाहिजे. दोन देशांतील व्यापारात विश्वासार्हता महत्त्वाची असते. केलेल्या करारांचे पालन आपण केलेच पाहिजे.”


अशा अनेक विषयांवर ‘राष्ट्रपिता’ या भूमिकेतून जॉर्ज वॉशिंग्टन यांनी आपल्या देशाला संदेश दिला. आपल्या सर्व चांगल्या कामाचे श्रेय त्यांनी लोकांना दिले आणि ज्या उणिवा राहिल्या असतील त्याबद्दल क्षमेची याचना केली. ही नम्रता त्यांना केवढ्या तरी महान उंचीवर नेऊन ठेवते आणि आपल्या देशाचा, आपल्या वंशाचा, आपल्या धर्माचा नसतानादेखील आपले मस्तक त्यांच्या प्रतिमेसमोर आपोआप नतमस्तक होते.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.