पाकिस्तानची मोठी कोंडी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Mar-2020   
Total Views |
PAK-Army _1  H



सध्या पाकिस्तान सरकारला एका नव्याच समस्येने ग्रासले आहे. जगभरात कोरोना विषाणूचा विळखा पडला आहे. मात्र, कोणत्याही देशाच्या सैन्यदलाला याबाबत भीती वाटते, असे काही ऐकिवात आले नाही. मात्र, जे कोठेही घडत नाही, ते पाकमध्ये घडले नाही तरच नवल नाही का? जगभरात फैलावलेल्या कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी विविध देशांचे सैन्य रस्त्यावर उतरून आपले कार्य चोख बजावत आहे. मात्र, इकडे पाकिस्तानमध्ये विपरीतच सत्य समोर येत आहे.


भारतविरोधी गरळ ओकण्यात कायम आघाडीवर असणारे पाकिस्तानी सैन्य चक्क कोरोना विषाणूला घाबरले आहे. या सैन्याची भंबेरी उडाली असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे पाकिस्तानी सैन्यातील सैनिक आपल्या कर्तव्यावर रुजू होण्यासदेखील तयार नसल्याचे समोर येत आहे. तसेच, पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी व सैनिक या कोरोना विषाणूचे शिकार झाल्याचेदेखील समोर येत आहे. पाकिस्तानमधील विविध वृत्तसंस्थांच्या वृतानुसार पाकिस्तानी सैन्याचे कमीत कमी आठ अधिकारी यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यात तीन लेफ्टनंट कर्नल, दोन कर्नल, दोन ब्रिगेडिअर आणि एक मेजर जनरल दर्जाच्या अधिकार्‍यांचा समावेश आहे, अशी माहिती पाकिस्तानच्या आरोग्य मंत्रालयाच्या वतीने देण्यात आली आहे. तसेच, आजवर पाकिस्तानमध्ये ३० कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहे. याशिवाय पाकिस्तानमध्ये केवळ तीनच विमानतळे सुरू असून आजवर सुमारे ९ लाख लोकांची तपासणी करण्यात आली आहे. तसेच यंदाची सुपर लीग मॅचदेखील बंद दाराआड खेळवली जाणार आहे.

 

एकंदरीतच कोरोनाचा फटका पाकिस्तानला मोठ्या प्रमाणात बसत असल्याचेच दिसून येत आहे. लष्करात उच्च सुविधा असणारे हे अधिकारी आहेत. यांना कोरोना विषाणूची लागण होते तर, मग आपल्यासारख्या सर्वसामान्य सैनिकांना का होऊ नये? असा प्रश्न तेथील सैनिकांना निश्चितच सतावत असणार. मात्र, येथे मुद्दा हा मानसिक प्रगल्भता आणि धैर्य यांचा आहे. पाकिस्तान सैन्याच्या सैनिकांचे मनोबल हे कमकुवत आहे काय?, असा प्रश्न या निमित्ताने समोर येत आहे. रणांगणावर लढत असताना आपला अधिकारी धारातीर्थी पडला तरी, आपण आपले काम चोख बजावणे, आपले कर्तव्य पार पाडणे आवश्यक आहे.

अशी शिकवण जवळपास सर्वच सैन्यात दिली जाते. तेव्हा भीती वाटते म्हणून कामावरच रुजू व्हायचे नाही, असे सैनिकांना वाटणे. हे पाकच्या सैन्य प्रशिक्षणावर आणि पाकिस्तानी सैन्याच्या मनोबलावर निश्चितच प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. तसेच, याबाबत पाकिस्तानी जनतेला काय वाटते, त्यांचा आपल्या सैन्यावर आगामी काळात भरवसा राहील काय, हेदेखील प्रश्न या निमित्ताने डोके वर काढणारे आहेत. कायमच आपल्या शौर्याच्या आणि हिमतीच्या डिंग्या पाकिस्तानी सैन्याने ठोकल्याचे आपण पाहात आलो आहोत. मात्र, जेव्हा खर्‍या अर्थाने आपल्या देशाला, देशातील समाजाला आपली गरज आहे. आपल्याकडे पाहून समाजाला धीर मिळू शकतो, असा काळ आपल्यासमोर उभा ठाकला आहे. अशावेळी पाठ दाखवून पळणे हीच पाकिस्तानी सैन्याची जमेची बाजू आहे काय, असा सवाल समोर आला तर वावगे वाटावयास नको.

 

हेही नसे थोडके म्हणून की काय, फेब्रुवारीअखेरीस पंजाब राज्यात आरोग्य न्यायकार्डाच्या वितरण समारंभात बोलताना पंतप्रधान इमरान खान यांनी पाकिस्तानमध्ये जीवनावश्यक वस्तू विशेष करून पीठ आणि साखरेच्या वाढलेल्या किमतीवरून विरोधकांच्या टीकेचे धनी होत असताना सरकारच्या निष्काळजीपणामुळेच पीठ व साखरेचे दर वाढल्याचे आणि लोकांना अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याचे मान्य केले आहे.

 

याबाबत चौकशी करून साठेबाज असल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचे संकेतदेखील त्यांनी दिले आहेत. पाकिस्तानात गहू, साखरेच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. यामुळे हाहाकार माजला असून विरोधक यासाठी सरकारला जबाबदार धरत आहेत. महागाई एवढी वाढली आहे की, सर्वसामान्यांना खाण्यापिण्यासाठी वस्तू आणणे अवघड झाले आहे. विरोधकांच्या टीकेला तोंड देताना इमरान खान यांच्या नाकीनऊ येत असल्याची स्थिती पाकिस्तानमध्ये दिसून येत आहे. अशावेळी पाकिस्तानची सामाजिक आणि सैन्य स्तरावर सध्या मोठी कोंडीच झाली आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@