मुखवट्यामागचा 'पद्मश्री'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |
Shashadhar-Acharya_1 ओडिशा व बिहारमधील लोकप्रिय नृत्य म्हणजे 'छऊ.' या पारंपरिक नृत्याची पिढ्यान्पिढ्या सेवा करणार्‍या शशधर आचार्य यांना यंदा 'पद्मश्री' पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या कलासाधनेवर टाकलेला हा ओझरता प्रकाश...

 

छऊ म्हणजे मुखवटा. म्हणजे मुखवटा परिधान करून जे नृत्य केले जाते ते छऊ नृत्य. छऊ या नृत्यप्रकाराचा जन्म पूर्वीच्या बिहार राज्यातील आणि आताच्या झारखंडच्या सरायकेला गावातून झाला. हे नृत्य मध्यरात्रीच्या सुमारास सादर केले जाते. नगारा, मृदंग, बासरी इ. वाद्यांच्या साथसंगतीने या नृत्याचे सौंदर्य अधिकच खुलते. साध्या नृत्याबरोबर पौराणिक व रामायण-महाभारतातील वेगवेगळ्या प्रसंगावरही नृत्यकथाही सादर केल्या जातात. सोळाव्या शतकात राजा जुना विक्रम सिंह यांनी सरायकेला गाव वसवले. त्यापूर्वी सरायकेला येथे साले गुटू नावाचे जंगल होते. त्या जंगलातील वनवासींची या कलेला राजा विक्रम सिंहने खर्‍या अर्थाने राजाश्रय दिला. तेव्हापासून ही नृत्यकला आजतागायत बिहार, ओडिशा राज्यात कायम आहे. ही कला जपणार्‍या एका 'छऊ' नृत्य कलावंताला यंदा 'पद्मश्री पुरस्कारा'ने गौरविण्यात आले. ती व्यक्ती म्हणजे 'छऊ' नृत्यगुरू शशधर आचार्य.

 

शशधर हे 'छऊ' नृत्यकलेतील सुप्रसिद्ध कलाकार आहेत. खरंतर शशधर यांना नृत्यकलेचे बाळकडू पिढीजातच मिळालेले. शशधर यांना लहानपणापासूनच नृत्याची आवड असल्याने त्यांनी वयाच्या पाचव्या वर्षापासूनच 'छऊ' नृत्यकला शिकण्यास सुरुवात केली. त्यांचे वडील गुरू लिंगराज आचार्य हेदेखील 'छऊ' नृत्यात कमालीचे पारंगत होते. त्यांच्याकडूनच शशधर यांनी छऊ नृत्याचा पहिला धडा गिरवला. याशिवाय त्यांनी पद्मश्री सुधेंद्र नयनरन सिंहदेव, पद्मश्री केदार नाथ साहू, गुरू विक्रम कुंभकर आणि गुरू बनबिहारी पटनायक यांच्याकडूनही 'छऊ' नृत्यकला अवगत केली. सरायकेला येथील पारंपरिक 'छऊ' नृत्यकलेचे नावाजलेले प्रशिक्षक आणि विचित्रा या 'छऊ' नृत्यकलेच्या आणखी एका कलाविष्काराचे दिग्दर्शक म्हणून शशधर आचार्य यांची विशेष ओळख आहे.

 

आाचार्य शशधर यांच्या अनेक पिढ्यांनी 'छऊ' नृत्यकलेला वाहून घेतले आहे. तसेच आपल्या पुढील अनेक पिढ्यांनीही या कलेचे संवर्धन करावे, अशी त्यांची मनीषा आहे आणि त्यांची ही इच्छा त्यांची पुढील पिढी समर्थपणे पार पाडत आहे. शशधर आचार्य यांनी 'छऊ' नृत्यकलेच्या प्रसारासाठी 'इंद्रटांडी आचार्य छाऊ नृत्य विचित्रा' ही संस्था स्थापन केली. या संस्थेच्या माध्यमातून ते ग्रामीण भागातील कलाकारांनाही प्रशिक्षण देतात. इतकेच नव्हे, तर रंगपूर आणि सरायकेलामध्ये सरायकेला 'छऊ' नृत्यकलेच्या विशेष प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन नियमित करत असतात. त्याचे दोन धाकटे भाऊ सरायकेला येथे 'छऊ गुरुकुल' चालवतात. त्यांचे शिष्य प्रत्येक धर्म, जाती आणि वर्गातील आहेत. शशधर हे दिल्लीतील त्रिवेणी कला संगमचे नियमित प्रशिक्षक आहेत.

 

पारंपरिक कलाप्रकाराच्या संवर्धनासाठी शशधर यांना यंदाचा 'पद्मश्री पुरस्कार' देण्यात आला आहे. गुरु शशधर आचार्य यांना 2004 साली संगीत नायक पुरस्कारानेदेखील सन्मानित करण्यात आले होते. आचार्य 1990 ते 1992 पर्यंत सरायकेला येथील शासकीय 'छऊ नृत्यकेंद्रा'चे संचालकही राहिले आहेत. 'नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा' येथे सध्या ते अभ्यागत प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. गुरू शशधर आचार्य यांनी परदेशातही सरायकेला 'छऊ' नृत्याचे सादरीकरण केले आहे. ही नृत्यकला शिकण्यासाठी भारतातूनच नव्हे तर परदेशातूनही मोठ्या संख्येने कलाकार भारतात येतात. प्रामुख्याने प्रादेशिक उत्सवात 'छऊ' नृत्य सादर केले जाते. मुख्यतः 13 दिवस चालणार्‍या वसंतोत्सवात अनेक कलाप्रेमी सहभागी होत असतात. पारंपरिक कलाकार किंवा स्थानिक समुदायाचे लोक असे वेगवेगळ्या प्रकारचे नृत्य सादर करतात.

 

'छऊ' नृत्यमुद्रा या पशू, पक्षी आणि मार्शल आर्टद्वारे प्रेरित असतात. महतो, कालिंदी, पट्टनिक, समल, दारोगा, मोहंती, भोळ, आचार्य, कर, दुबे आणि साहू या संप्रदायातील लोक 'छऊ' नृत्य सादर करतात. 'छऊ' नृत्यात बंगालच्या पुरुलिया आणि सरायकेला महापात्रा, महाराणी आणि सूत्रधार या वनवासींनी वापरलेला एक खास प्रकारचा मुखवटा वापरला जातो. नृत्य, संगीत आणि मुखवटा बनवण्याची कला आणि हस्तकला तोंडी शिकविली जाते. सरायकेला 'छऊ' हे प्रामुख्याने सैनिकांद्वारे सादर केलेले एक सैनिकी नृत्य आहे. शशधर आचार्य हे या कलेतून 'पद्मश्री पुरस्कार' मिळविणारे पाचवे कलाकार ठरल्याने यंदा सरायकेला गावात उत्सवाचे वातावरण होते. ज्यावेळेस शशधर यांना 'पद्मश्री पुरस्कार' जाहीर झाल्याचे कळले तेव्हा ते म्हणाले, 'छऊ' नृत्यासाठी मला 'पद्मश्री' जाहीर झाल्याची ऐकून आनंद झाला. नृत्यकलेच्या विकासासाठी मी नेहमीच कार्यरत राहणार आहे. या पुरस्कारामुळे 'छऊ' कलाकारांचाही सन्मान झाला आहे. माझा 'पद्मश्री पुरस्कार' मी माझ्या पाच गुरूंना समर्पित करतो.

 

'छऊ' नृत्यकला गावा-गावात जाऊन तरुणांना शिकवली जाईल. 'छऊ' कला टिकवण्यासाठी मी यापुढेही काम करत राहीन. 'छऊ' कलाकारांना कलेच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करेन, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. शशधर म्हणतात की, "'छऊ' नृत्यकलेच्या प्रसारासाठी अधिक काम करण्याची गरज आहे आणि मी जीवंत असेपर्यंत या कलेची सेवा करत राहणार. अलीकडच्या काळात केवळ पुरुषच नव्हे तर मुलींनाही 'छऊ' नृत्यात खूप रस आहे. मुली खूप उत्कृष्ट सादरीकरण करतात आणि खूप मेहनतही घेतात." शशधर यांनी आपले संपूर्ण आयुष्य या कलेच्या सेवेसाठी बहाल केले आहे. ही कला अधिक समृद्ध व्हावी व ती अनेक लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा. अशा या हरहुन्नरी कलासाधकाला दै. 'मुंबई तरुण भारत'चा सलाम!

Chhau_1  H x W:@@AUTHORINFO_V1@@