स्फोटकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी ‘जैश’कडून तरुणांची भरती

15 Mar 2020 22:09:31
Jaish _1  H x W
 


‘एनआयए’च्या तपासात धक्कादायक खुलासा




नवी दिल्ली
: पुलवामा हल्ल्याची चौकशी करणाऱ्या  राष्ट्रीय तपास संस्था अर्थात ‘एनआयए’च्या तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. आयईडी आणि अन्य शक्तिशाली स्फोटके तयार करण्यासाठी लागणारे रसायन व इतर सामग्रीची ऑनलाईन खरेदी करण्यासाठी ‘जैश-ए-मोहम्मद’ने काश्मिरातील अनेक तरुणांची भरती केली होती, असे ‘एनआयए’च्या तपासात दिसून आले आहे.


 
या हल्ल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या पाच अतिरेक्यांपैकी ‘वझिर’ असे नाव असलेल्या अतिरेक्याने ‘जैश’कडून खोऱ्याकतील तरुणांच्या मनात भारताविषयी कसे विष कालवले जाते, याची सविस्तर माहितीच सादर केली. अॅल्युमिनिअम पावडर, पर्वतीय भागात वापरले जाणारे जॅकेट्स, मोबाईल बॅटरी आणि ट्रेकिंग शूज यासारख्या वस्तूंची ऑनलाईन खरेदी करण्याची जबाबदारी ’जैश’च्या वरिष्ठ अतिरेक्यांनी माझ्यासह इतर काही तरुणांवर सोपवली होती, असे तो म्हणाला.


 
आधीच्या काळात छायाचित्रकारांकडून अॅल्युमिनिअम पावडरचा वापर कॅमेराच्या फ्लॅश स्वच्छ करण्यासाठी केला जायचा. ही पावडर अतिशय ज्वलनशील असल्याने, व्यावसायिक कोळसा खाणींमध्ये स्फोट घडविण्यासाठीही त्याचा वापर व्हायचा, अशी माहिती ‘एनआयए’च्या प्रवक्त्याने दिली. ‘जैश’च्या आदेशानुसार वझिरने मोठ्या प्रमाणात अॅल्युमिनिअम पावडरची ऑनलाईन खरेदी केली आणि ‘जैश’च्या भूमिगत अतिरेक्यांना सोपवली. १४ फेबु्रवारीच्या पुलवामातील आत्मघाती हल्ल्यात याच पावरडचा आयईडी तयार करण्यासाठी वापर करण्यात आला होता. या हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते.


 
पुलवामा स्फोटात कटाचा सूत्रधारही ठार झाल्याने, हे प्रकरण संपले असल्याचे मानले जात असताना, ‘एनआयए’ने तपासाची व्याप्ती वाढवली आणि या तपास संस्थेचे अधिकारी थेट, ज्या अदिल अहमद दारने स्फोटकांनी भरलेली व्हॅन सीआरपीएफच्या ताफ्यावर आदळली होती, त्याच्या घरापर्यंत पोहोचले. या घरात त्याने स्फोटापूर्वी चित्रीत केलेला व्हिडिओ ‘एनआयए’च्या हातात लागला आणि त्यानंतर पुलवामा स्फोटाच्या कटात सहभागी असलेल्या पाच अतिरेक्यांना अटक करण्यात आली.

 
बेरोजगार तरुणांना हेरून केले जायचे ‘ब्रेनवॉश’

जैशचे बडे अतिरेकी काश्मीर खोऱ्या‘तील बेरोजगार तरुणांना हेरायचे आणि ‘ब्रेनवॉश’ करून, त्यांना दहशतवादी कारवायांसाठी प्रवृत्त करायचे, अशी माहिती वझिरने ‘एनआयए’ला दिली.
 
Powered By Sangraha 9.0