दोष चांदण्याचा...

    दिनांक  14-Mar-2020 21:35:32
|


skylight_1  H x

 


मिसेस पार्कर आपल्या चारमजली इमारतीत तळमजल्यावर राहत होत्या. जागेच्या शोधात कोणी होतकरू भाडेकरू आला की त्याला प्रथम तळमजल्यावरची मोठी घरे दाखवीत. तिथलं भाडं दर आठवड्याला १२ डॉलर्स हे ऐकून त्याचा चेहरा पडला, तर त्याला वरच्या मजल्यावर नेऊन दर आठवड्याला ८ डॉलर्स भाडं असलेल्या खोल्या दाखवीत. तरीही भाडेकरूची कळी खुलली नाही, तर त्याला मिसेस पार्करची नोकराणी क्लारा तिसऱ्या मजल्यावर नेई. तिथल्या सदनिकेत मिस्टर स्किडर नामे हौशी नाटककाराने मुक्काम ठोकलेला होता. हा म्हणे नाटक लिहीत होता. त्याने लिहिलेले नाटक न कोणी पाहिले होते की वाचले होते. त्याच्या सदनिकेतून तो फुंकत असलेल्या सिगारेटींचा धूर मात्र सर्वांनी पाहिला होता. त्याच्या हॉलशेजारी एक शिडी होती आणि चौथ्या मजल्यावर जाण्यासाठी त्या शिडीवरून जावे लागे. गच्चीवर शंभर चौरस फुटाची एक खोली होती. खोलीत लोखंडी खाट, वॉश बेसिन, शेल्फ, जुनाट मेज आणि खुर्ची एवढाच सरंजाम होता. खाटेवर पाठ टेकून पहुडलं की शवपेटीत निजल्याचा भास होई. छताला गेल्या अनेक वर्षात रंगरंगोटी झाली नव्हती. खिडकीतून दिवसा ऊन आणि रात्री चांदण्या दिसत.

 

एके दिवशी मिस लीसन नावाची हडकुळी, गोरी, सोनेरी केसांची आणि निळ्या डोळ्यांची तरुणी जागेच्या शोधार्थ तिथे आली. तिच्या एका हातात टाईपरायटरची पिशवी होती. दुसरा हात झग्याच्या खिशात होता. त्यात... शिरस्त्याप्रमाणे मिसेस पार्करनी तिला आधी मोठ्या खोल्या दाखवल्या. "बारा डॉलर्स? मी इतकी श्रीमंत नाही हो. मी एक साधी टायपिस्ट आहे," लीसन कर्कश्श आवाजात बोलली. मिसेस पार्करनी तिला तिसऱ्या मजल्यावर नेली. मिस्टर स्किडरशी परिचय करून दिला आणि क्लाराला हाळी देऊन त्या निघून गेल्या. स्किडर आपल्या अप्रकाशित नाटकातील काल्पनिक नायिकेचे वर्णन करण्यात मग्न होता. त्याने क्षणभर लीसनकडे पाहिले. तेवढ्यात क्लारा आली आणि लीसनला घेऊन शिडीवरून चौथ्या मजल्याकडे रवाना झाली. स्किडरने हातातला नाटकाचा कागद पुन्हा वाचला. मनाशी काही विचार केला आणि खोडरबरने नायिकेचे वर्णन (ठुसक्या बांध्याची, चॉकलेटी केसांची, काळ्या डोळ्यांची वगैरे) खोडून तिथे पेन्सिलने नवे वर्णन लिहिले - हडकुळी, गोरी, सोनेरी केसांची आणि निळ्या डोळ्यांची वगैरे.

 

चौथ्या मजल्यावर गेल्यावर तिथली खोली पाहून लीसनने भीतभीत भाडे विचारले. क्लारा म्हणाली, "दोन डॉलर्स!" आणि लीसनचा जीव भांड्यात पडला. झग्याच्या खिशात असलेल्या तिच्या उजव्या हातात एक डॉलरच्या तीन चुरगळलेल्या नोटा होत्या. तिने लगेच क्लाराला होकार आणि दोन डॉलर्स दिले. मग हातातली टाईपरायटरची पिशवी मेजावर ठेवली आणि काही गुणगुणत त्या लोखंडी खाटेवर अंग टाकले. लवकरच लीसन त्या इमारतीत रुळली. रोज सकाळी ती लवकर उठून कामावर जाई. सायंकाळी येताना पिशवीभर टायपिंगचे कागद घेऊन येई. रात्री उशिरापर्यंत खोलीत बसून टायपिंग करीत राही. कधी कधी तिला काम नसे. अशा वेळी ती जिन्यात बसायला येई. तिथे रोजच गप्पांची मैफील जमलेली असे. लीसन आली की मैफिलीत विशेष जान, चैतन्य येई. नाटककार स्किडर तिला आपल्या नाटकाचे (प्रत्येक भेटीत बदलत जाणारे) कथानक आणि संवाद सांगत असे. मनातल्या मनात त्याने नाटकाची नायिका म्हणून लीसनला मुक्रर केले होते, पण तसे बोलायची हिंमत केली नव्हती. ४५ वर्षाचा गोलमटोल देहाचा हूवर लीसनने केलेल्या प्रत्येक विनोदाला (समजला नाही तरी) मोठ्यांदा हसून दाद देई. हडकुळा इव्हान्स लीसनच्याच वयाचा. तो मुद्दाम खोटं खोटं खोकत राही. लीसनने 'फार सिगारेटी ओढू नकोस' म्हणून विनवलं की, त्याला अंतर्यामी गुदगुल्या होत. आठवडाभर एका दुकानात काम करणारी आणि रविवारी कोनी बेटावर जत्रेला जाणारी 'मिस डॉर्न' किंवा सरकारी शाळेतली शिक्षिका 'मिस लॉन्गनेकर' या मात्र लीसनच्या विभ्रमांवर आठ्या घालण्याव्यतिरिक्त अथवा नाके मुरडण्याव्यतिरिक्त निराळा प्रतिसाद देत नसत.

 

लीसनला रात्री खोलीतील खाटेवर पडल्यावर खिडकीतून एक तारा दिसे. तिनं त्याचं नाव 'बिली जॅक्सन' ठेवलं होतं. गप्पांच्या एका मैफिलीत तिनं सर्वांना तो तारा दाखवला आणि त्याचं नामकरण जाहीर केलं"आलीस मोठी खगोलशास्त्रज्ञ. तू ज्याला 'बिली जॅक्सन' म्हणतेस, त्याचं नाव 'गॅमा' आहे. शर्मिष्ठा नक्षत्रातला तो मोठा तारा आहे." शिक्षिका मिस लॉन्गनेकर खडूसपणे म्हणाली. "असेल. पण त्याचं नाव 'बिली जॅक्सन'च आहे मुळी." "हो! हो! लीसनला रोज निजताना तिच्या खिडकीतून तो दिसतो. तिला त्याचं नामकरण करण्याचा पूर्ण अधिकार आहे," पुरुषांनी लीसनची री ओढलीतो विषय तिथेच संपलाएके रात्री लीसन परतली तेव्हा तिच्या हातात काम नव्हतं. चेहरा चिडलेला होता. हडकुळा इव्हान्स आणि स्किडरच्या अभिवादनाला तिनं प्रतिसाद दिला नाही. आजच सकाळी तिला हूवरने लग्नाची मागणी घातली होती. तो तिच्याकडून उत्तराच्या अपेक्षेने समोर आला. तिनं त्याच्याकडे ढुंकूनही न बघता वर कूच केले. आपल्या खोलीत जाऊन तिने दार लावून घेतलं. पर्समधून दोन गोळ्या काढून पाण्याबरोबर घेतल्या. मग खाटेवर अंग टेकून ती त्या ताऱ्याकडे बघत म्हणाली, "बिली, तू माझ्यापासून कितीतरी दशलक्ष मैल अंतरावर आहेस. आपण दोघे कध्धीच जवळ येऊ शकत नाही. पण, माझं तुझ्यावरचं प्रेम अमर आहे. जन्मोजन्मी मी तुझ्यावर आणि तुझ्यावरच प्रेम करीत राहीन. तू माझ्यावर रागावू नकोस हं..." आणि तिनं डोळे मिटले. सकाळी क्लारा सर्वांना उठवायला आली. लीसन तिच्या हाकेला प्रतिसाद देईना. क्लाराने सर्वांना बोलावले. दार तोडले. लीसन बेशुद्ध होती. कोणीतरी रुग्णवाहिकेला फोन केला. पण, त्याआधीच डॉक्टर रुग्णवाहिका घेऊन पोहोचले होते. वरच्या मजल्यावरून त्यांनी लीसनचा देह उचलून आणला आणि रुग्णवाहिकेत ठेवला. घाईघाईने पुढे होत स्किडरने त्यांना विचारलं, "काळजी करण्यासारखं नाही नं?" "ती आमच्याच रुग्णालयात नोकरी करते. तिने झोपेच्या गोळ्या घेतल्या आहेत. काल रात्री तिने एक चिठ्ठी लिहून ठेवलेली मिळाली. म्हणून आम्ही त्वरेने आलो. ती ठीक होईल. काळजी करू नका." सदरहू डॉक्टरांचं नाव 'विल्यम जॅक्सन' होतं हे समजल्यावर स्किडरला आश्चर्याचा धक्का बसला. तसा धक्का नंतर हूवर आणि इव्हान्सलाही बसला. मिस डॉर्न आणि मिस लॉन्गनेकर यांनी फक्त आपापली नाके मुरडली.

 

- विजय तरवडे

(The Skylight Room या कथेवर आधारित)

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.