सायलेंट वर्कर

    दिनांक  14-Mar-2020 21:25:59
|


rss balasaheb dikshit_1&n


नुकतेच दि. २५ फेब्रुवारी रोजी नाशिक येथे माझे वडील बंधू गजानन यशवंत उर्फ बाळासाहेब दीक्षित यांचे दीर्घ आजाराने वयाच्या ९३व्या वर्षी निधन झाले. ते आजन्म रा. स्व. संघाचे पूर्ण वेळ प्रचारक होते व गेली काही वर्षे 'वनवासी कल्याण आश्रमा'चे संघटनमंत्री होते. परंतु, गेली काही वर्षे अपंगत्वामुळे कंबरेचे फ्रॅक्चर व नंतर उद्भवलेला स्मृतिभ्रंश व इतर आजरांमुळे अंथरुणाला खिळून होते. त्यांच्या काही आठवणींना दिलेला हा उजाळा...


बाळासाहेब ऐन तारुण्यात रेल्वेची कायमस्वरूपी नोकरी सोडून रा. स्व. संघाचे प्रचारक म्हणून बाहेर पडले व महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांनी संघ कार्याचा प्रसार केला व नंतर 'वनवासी कल्याण आश्रम' हे त्यांचे कार्यक्षेत्र राहिले. परंतु, माझ्या आयुष्याच्या प्रत्येक महत्त्वाच्या टप्प्यावर त्यांनी मला मार्गदर्शन केले, जसे अनेकजणांना केले. माझ्या वैचारिक जडणघडणीत बाळासाहेबांचा सिंहाचा वाटा होता. पत्रव्यवहार, वैयक्तिक चर्चा, शंकासमाधान या मार्गे! 'प्रचारक म्हणजे रूक्ष व्यक्तिमत्त्व' हा समज बाळासाहेबांच्या सान्निध्यात आलेल्या प्रत्येकाने खोटा ठरवला. कारण, शास्त्रीय संगीत, साहित्य - सर्व प्रकारचे, विविध विषयांवरची पुस्तके यांचे वाचन व अभ्यास खूप मोठा होता. त्यांना कोणताही विषय वर्ज्य नव्हता. राजकारणात नसतानाही राजकारण व राजकीय नेते यांच्याबद्दलची त्यांची जाण प्रगल्भ अशी होती. काही उदाहरणे द्यावीशी वाटतात. पू. गुरूजींचा पन्नासावा वाढदिवस पुणे येथे काही वर्षांपूर्वी साजरा झाला. त्यानिमित्ताने जमलेला निधीही त्यांना अर्पण करण्यात आला. मी त्यावेळी अगदी तरुण होतो. परंतु, तो कार्यक्रम ऐन दिवाळीत होता. त्यामुळे पू. गुरूजींच्या कार्यक्रमाला गेलो, तर घरातील दिवाळी चुकेल अशा संभ्रमात होतो. बाळासाहेबांपुढे मी हे सांगितल्यावर ते म्हणाले की, "अरे, 'साधुसंत येती घरा तोचि दिवाळी-दसरा' असे म्हटलेच आहे ना? पू. गुरुजी हे साधुसंतांसारखेच आहेत ना? मग त्यांच्याबरोबरच तुझी दिवाळी होऊ दे. घरची दिवाळी दरवर्षी आहेच ना? अर्थात, तुझा निर्णय तूच घे." मी अर्थातच पू. गुरुजींच्या पुण्याच्या कार्यक्रमाला हजेरी लावली.

 

आम्ही बाळासाहेबांना ७५ वर्षे पूर्ण झाल्यावर व योगायोगाने त्यांनी प्रचारक म्हणून गेल्याला ५० वर्षे झाल्याच्या निमित्ताने एक खाजगी कार्यक्रम घरातच आयोजित केला होता. बाळासाहेबांबरोबर ५० वर्षांपूर्वी असलेले स्वयंसेवक व इतर व्यक्तींना त्यांचा शोध घेऊन बोलावले होते व अनौपचारिक गप्पा व त्यावेळच्या आठवणी असा कार्यक्रम होता. अनेकजण या कार्यक्रमाला उपस्थित होते व कार्यक्रमाला औपचारिकता अजिबात नव्हती. त्यावेळेला बाळासाहेबांनी एका स्वयंसेवकाला कोणते गीत म्हणायला सांगितले असेल तर ते म्हणजे 'मन माझे विसावले, संघमंदिरी स्थिरावले.' संघ त्यांच्या एवढा रोमारोमांत भिनला होता व ते संघाशी तादात्म्य पावले होते. त्याच कार्यक्रमात मुंबईच्या एका प्रसिद्ध दैनिकाशी संबंध असलेली व्यक्ती हजर होती. त्यांनी मला सांगितले की, "या कार्यक्रमाचा तपशील मला पाठवा. मी तो दैनिकांमध्ये प्रसिद्ध करवीन." पण, बाळासाहेब लगेच म्हणाले की, "नको, हा खाजगी कार्यक्रम आहे. त्याला प्रसिद्धी देऊ नका." 'प्रसिद्धी पराङ्मुखता' हे संघाचेच धोरण! बाळासाहेबांनी ते त्यांच्या वैयक्तिक जीवनातही आणले. डॉ. हेडगेवार म्हणायचे की, "संघाचे भूत तुमच्या मानेवर बसले पाहिजे." बाळासाहेबांच्या मानेवर तेच संघाचे भूत बसले होते असे म्हटल्यास वावगे ठरू नये. तन, मन, धन यांपैकी तन व मन त्यांनी संघालाच वाहिले होते. धनाचा प्रश्नच नव्हता. कारण, ते पदरी नव्हतेच! ते अपंग झाले याचे कारणही त्यांचे कार्यकर्त्यांवर असलेले अपरिमित प्रेमच! डोंबिवलीच्या आश्रमाच्या कचेरीत ते एका दौऱ्या दरम्यान गेले. जेव्हा जेवणाची वेळ झाली तेव्हा कार्यकर्ते जमिनीवर चटईवर बसले व त्यांनी बाळासाहेबांना टेबल-खुर्चीवर बसा असे सांगितले. पण, असा भेदभाव त्यांना पटत नसल्याने ते कार्यकर्त्यांबरोबर चटईवरच बसले. परंतु, जेवण झाल्यावर उठताना पाय सटकला, ते खाली पडले व कंबरेला, हाडाला फ्रॅक्चर झाले व ते अपंग झाले. पुढचा सारा इतिहास आहे.

 

देव, देवपूजा व इतर कर्मकांडे यांवर त्यांचा विश्वास नव्हता. प्रत्येक माणसात देवत्वाचा अंश असतो. त्यामुळे मानवाची सेवा म्हणजेच देवपूजा असे त्यांना वाटायचे. (आपण नाही का म्हणूनच दुसऱ्याला पाय लागला की नमस्कार करतो.) संघ व 'वनवासी कल्याण आश्रमा'चा राजकारणाशी संबंध नाही. परंतु, तरीही त्यांची राजकारणाची जाण पक्की होती. आपण शिवसेनेशी का एवढा संबंध ठेवतो, हे त्यांनी मला अनेक वेळा म्हटले होते. शिवसेनेकडे राजकीय चंचलता आहे. ही विश्वासार्ह संघटना नाही. कॅलिडोस्कोपप्रमाणे त्यांच्या भूमिका बदलतात. नंतर शिवसेनेने भाजप विरुद्ध काँग्रेसच्या प्रतिभा पाटील व नंतर प्रणव मुखर्जींना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत पाठिंबा दिला, तेव्हा त्यांचे म्हणणे बरोबर ठरले. शिवाय १०० दिवसांपूर्वी युतीला पूर्ण बहुमताचा जनादेश मिळूनही शिवसेनेने भाजपची साथ सोडून हिंदुत्वद्वेष्ट्या, रामाला काल्पनिक व्यक्ती मानणाऱ्या व स्वा. सावरकरांना 'देशद्रोही' म्हणणाऱ्या काँग्रेसचा हात हातात घेतला. काँग्रेसने देशावर लादलेल्या आणीबाणीला शिवसेनेने पाठिंबाच दिला ना! बाळासाहेब हे राजकीय द्रष्टे ठरले. ते 'सायलेंट वर्कर' होते. आपल्या कामाची प्रसिद्धी त्यांनी केली नाही. ते पुढे-पुढे करायचे नाहीत. त्यांनी आम्हाला बोलायचे कसे हे शिकवले, असेही काहीजण म्हणाले. अशा तऱ्हेचे बाळासाहेब मला वडील बंधू म्हणून लाभले हे माझे परमभाग्यच! त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो!

 

- रंगनाथ दीक्षित

 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.