चित्रपट आस्वादाची नवी 'दिठी' देणारा आशियाई चित्रपट महोत्सव

    दिनांक  14-Mar-2020 19:51:02
|


film and festival_1 


मुंबईतील 'एशियन फिल्म फाऊंडेशन'ने प्रभात चित्रमंडळ, महाराष्ट्र शासन यांच्या सहकार्याने अठरावा आशियाई चित्रपट महोत्सव नुकताच १ ते ६ मार्चपर्यंत प्रभादेवीच्या रवींद्र नाट्यमंदिरच्या पु. ल. देशपांडे प्रेक्षागारात संपन्न झाला. त्यानिमित्ताने या चित्रपट महोत्सवातील काही हृदयस्पर्शी चित्रपटांचा घेतलेला हा थोडक्यात धांडोळा...


'आयुष्यभरात एकही चित्रपट पाहिलेला नाही, असा भारतीय माणूस दाखवा आणि एक लाख रुपये कमवा' अशी घोषणा कोणी केली, तर त्या घोषणाकर्त्याचे ते लाखभर रुपये खर्च करण्याची वेळ त्याच्यावर तहहयात कधीच येणार नाही! ही काळ्या दगडावरची रेष मानण्याइतपत 'सिनेमावेड' श्रीमंतातील श्रीमंत ते गरिबातील गरीब भारतीय माणसामध्ये बालपणापासून रुजलेले असते. हां! प्रेक्षक म्हणून तुमच्यात दोन प्रकार पडतात, एक असतो तो खिशातून सिनेमाच्या तिकिटासाठी टाकलेले शंभर-दीडशे रुपये भरपूर मनोरंजनातून वसूल होऊन चांगला 'टाईमपास' व्हावा, इतकीच अपेक्षा असणाऱ्यांचा गट, जो बऱ्यापैकी मोठा असतो; तर दुसरा गट असतो, तो चित्रपटाला एक प्रभावी कलामाध्यम मानणारा!असं कलामाध्यम, जे दिग्दर्शकाचं मानवी जीवनाचं आकलन आपल्याला तरलपणे दाखवून, आपलंही जीवनभान भावसमृद्ध करावं, आपल्याला अधिक चांगला माणूस बनवावं, अशी अपेक्षा करणाऱ्यांचा, ज्यांना चित्रपट महोत्सव हवेहवेसे वाटतात. आमच्यासारख्या ६०-७० वर्षांपूर्वी जन्मलेल्या लोकांसाठी चित्रपट पाहायचा असेल तर चित्रपटागृहात जाणे अपरिहार्य असे. पण, २०-२२ वर्षांपूर्वी प्रत्येकाच्या हातात मोबाईल आला आणि एचबीओ, नेटफ्लिक्स, यूट्युब इत्यादी साधनांमार्गे हवा तो, हवा तिथे, हवा त्यावेळी चित्रपट बघणे सहज शक्य झाले. त्यामुळे तरुण पिढीला 'फिल्म सोसायट्यां'ची गरज भासेनाशी झाली. पण, शेवटी ही उपलब्धी म्हणजे 'दुधाची तहान ताकावरती' भागवण्यासारखं असते. रसिकांनी भरलेल्या प्रेक्षागारात मोठ्या पडद्यावर चित्रकथा उलगडताना बघण्याचा आनंद काही वेगळाच असतो. त्यामुळेच 'इफ्फी', 'मामि' आणि 'एशियन फिल्म फेस्टिव्हल' जाहीर झाले की, चोखंदळ रसिकांची पावलं तिकडे वळतातच...

 

अठरावा आशियाई महोत्सव

 

मुंबईतील 'एशियन फिल्म फाऊंडेशन'ने प्रभात चित्रमंडळ, महाराष्ट्र शासन यांच्या सहकार्याने अठरावा आशियाई चित्रपट महोत्सव नुकताच १ ते ६ मार्चपर्यंत प्रभादेवीच्या रवींद्र नाट्यमंदिरच्या पु. ल. देशपांडे प्रेक्षागारात सादर केला. महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यात फाऊंडेशनचे अध्यक्ष किरण शांताराम यांनी खुलासा केला की, खरेतर हा महोत्सव नेहमी १९ डिसेंबरच्या सुमारास प्रतिष्ठान महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने दरवर्षी भरवते. पण, २०१९चा डिसेंबर महाराष्ट्राला राजकीय अस्थिरतेचा ठरल्यामुळे, महोत्सव वेळेवर घेणे प्रतिष्ठानला शक्य झाले नाही. पण, यंदाचा २०२०चा एकोणिसावा महोत्सव प्रतिष्ठान येत्या डिसेंबरमध्ये निश्चित घेईल. या महोत्सवात इराण, नेपाळ, भूतान, कुर्दिस्तान, कझाकिस्तान, चीन, कोरिया, इस्रायल, श्रीलंका, बांगलादेश, सिंगापूरआदी आशियाई देशांतून आलेले तसेच काश्मिरी, आसामी, बंगाली, मणिपुरी, मल्याळी, तेलुगू, तामिळ, कन्नड, पंजाबी, हिंदी व मराठी आदी भारतीय भाषांतील एकूण ३१ चित्रपट व लघुपट दाखवले गेले. सात नव्या-जुन्या मराठी चित्रपटांची हजेरी या महोत्सवात लागली. दाखवल्या गेलेल्या सर्वच चित्रपटांचा कलात्मक दर्जा सर्व साधारणपणे बऱ्यापैकी चांगला होता.

 

प्रथमच स्त्री-दिग्दर्शिकांचा वेध

 

फाऊंडेशनचे महोत्सव संचालक सुधीर नांदगावकर यांनी उद्घाटन सोहळ्यात सांगितल्याप्रमाणे यंदा प्रथमच या महोत्सवात आशियाई महिला दिग्दर्शकांच्या चित्रपटांची स्पर्धा घेण्यात आली. १९८० पर्यंत भारतातीलचित्रपटनिर्मिती दिग्दर्शन क्षेत्र प्रामुख्याने पुरुषकेंद्री होते. पण, त्यानंतर संहितालेखन-संपादन, दिग्दर्शन या क्षेत्रात महिलांनी लक्षणीय मुसंडी मारल्याचे आढळते. म्हणून ही खास महिला विभाग स्पर्धा यंदा घेण्यात आली होती. एकूण सहा महिलांनी दिग्दर्शित केलेले चित्रपट या विभागात उतरले होते. याच गटातील सिंगापूरच्या शिल्पा शुक्ला (३८) यांनी लिहिलेल्या दिग्दर्शिलेल्या 'स्टोअरीज् @ ८' या चित्रपटाला सर्वोत्कृष्टचित्रपटाचे २५ हजार रुपयांचे बक्षीस महोत्सवाच्या समारोप सोहळ्यात घोषित झाले, तेव्हा सर्व उपस्थित चोखंदळ रसिक- समीक्षकांच्या भुवया प्रश्नार्थकपणे उंचावल्या होत्या. म्हणून या गटातील सर्व चित्रपटांचा धावता परिचय आधी करून घ्यावासा वाटतोय.

 

दिठी

 

संयोजकांनी छापलेल्या त्रोटक माहिती देणाऱ्या पुस्तिकेवरून कुठल्याही दिग्दर्शिकेविषयी वय, पूर्वकामगिरी याबाबतचे काहीही तपशील मिळाले नाहीत. पण, प्रथमदर्शनी जाणवले, त्याप्रमाणे आपल्या मराठीच्या सुमित्रा भावे त्या सर्व दिग्दर्शिकांमध्ये सर्वात ज्येष्ठ असाव्यात! म्हणून मला अतिशय आवडलेल्या त्यांच्या (कोल्हापूर चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट ठरलेल्या!) 'दिठी' या चित्रपटापासूनच सुरुवात करते. पहिलं अभिनंदन अशासाठी की, निर्मात्याच्या शोधात ११ वर्षे धडपडून हा काव्यात्मक चित्रपट तयार करताना, सुमित्राबाईंनी मूळ कथालेखक दि. बा. मोकाशी यांच्या 'आता आमोद सुनासी आले' या अभिजात कथेचा पडद्यावर प्रारंभीच ऋणनिर्देश केला होता! हा विशेष निर्देश करायचे कारण असे झाले की, या महोत्सवात दाखवला गेलेल्या 'पांघरुण' या अन्य एका देखण्या मराठी चित्रपटाच्या खेळाचा प्रारंभ या श्रेयनकाराच्या थोड्या कटू चर्चेने झाला होता! 'पांघरुण'चीनिर्मिती महेश मांजरेकरांची होती. प्रारंभीच्या श्रेयमालिकेत त्यांनी स्वत:चा निर्देश 'लेखक -दिग्दर्शक' असा आणि पटकथाकार म्हणून गणेश मतकरी-अमोल परचुरे यांचा उल्लेख केला होता! 'प्रभात'चे संयोजक संतोष पाठारे यांनी, चित्रपट-प्रदर्शनानंतर मांजरेकरांशी संवाद साधायची संधी प्रेक्षकांना दिली. तेव्हा, मराठीचे निवृत्त अध्यापक असलेल्या पंढरीनाथ रेडकरांनी “ती मूळ कथा बा. भ. बोरकर यांची आहे. त्यांचा ऋणनिर्देश न करणे हे वाड्.मयचौर्य ठरते,” असे परखडपणे मांजरेकरांना सुनावले होते. त्यावर “हो, ती मूळ कथा बोरकरांची आहे. आम्ही तसा निर्देशश्रेयमालिकेत केला आहे,' असा गुळमुळीत बचाव मांजरेकरांनी केला होता. पण, निरखून बघूनही बोरकरांचे नाव प्रेक्षकांना पडद्यावर काही दिसले नव्हते!

 

सुमित्राबाईंचं दुसरं अभिनंदन अशासाठी करायचं की, 'दिठी' तयार करताना मूळ कथेचा तरल काव्यात्मक पोत कायम राखण्यासाठी, त्यात त्यांनी उगाच अनावश्यक भरताड भर न टाकता चित्रपटाची लांबी नेमकी ८९ मिनिटांची ठेवली आहे. महोत्सवात सादर झालेले अन्य सर्व मराठी चित्रपटही चांगले असले तरी, आदिनाथ कोठारे यांनी प्रथम दिग्दर्शित केलेला चित्रपट 'पाणी' १४० मिनिटांचा, मांजरेकर दिग्दर्शित 'पांघरुण' १३१ मिनिटांचा, भीमराव मुडे दिग्दर्शित 'बार्डो' १३० मिनिटांचा, पोलिसांच्या खाकीतील गुंडगिरीचा जळजळीत वेध घेणाऱ्या पत्रकार अनंत नारायण महादेवनचा 'माईघाट' १०४ मिनिटांचा, असे बऱ्यापैकी लांबण लावलेले होते. 'अल्पाक्षरं बहुगुणी' हा मंत्र चित्रपट-संपादनाच्या बाबतीत महत्त्वाचा असतो, याचे भान ज्येष्ठत्वातून सुमित्राबाईंनी 'दिठी'चे दिग्दर्शन करताना नेमके ठेवले आहे! मूळ कथेत नसलेले विधवा सुनेचे एकमेव ज्यादा पात्र त्यांनी आपल्या चित्रकथेत आणले आहे. पण, नवप्रसुत विधवा सुनेचे ते पात्र, नदीच्या पुरात एकुलता एक मुलगा बुडून वारल्यामुळे, देवावरची श्रद्धाही तुटून देहमनाने उद्ध्वस्त झालेल्या रामजी लोहाराला, अडलेल्या गाईची सुटका करताना 'जन्म आणि मृत्यू, सुख व दु:ख एकमेकांहून वेगळे नसतात. एकमेकांच्या विरुद्धार्थी वाटणाऱ्या या गोष्टी अखेर एकमेकांमध्ये मिसळून जात असतात आणि एक होत असतात,' या जीवन सातत्याची जाणीव करून देण्यासाठी ते विधवा सुनेचे पात्र पूरकच ठरते. रामजीची भूमिका साकारणाऱ्या किशोर कदम या श्रेष्ठ अभिनेत्याविषयी काय सांगावे? लौकिकार्थाने 'चॉकलेट हिरो'चा चिकना सुपडा चेहरा न लाभलेला, पण 'कवी सौमित्र'ची उपजत तरल प्रतिभा लाभलेला किशोर कदम नेहमीप्रमाणेच अगतिक, उद्ध्वस्त रामजी लोहाराची भूमिका अक्षरश: जगला आहे. दिग्दर्शिकेची आर्थिककोंडी लक्षात घेऊन या चित्रपटाचे निर्माते बनलेले बुजुर्ग अभिनेते मोहन आगाशे, गिरीश कुलकर्णी, अमृता सुभाष असे अनेक नामवंत कलाकार किशोर कदमला साथ द्यायला लहानमोठ्या साहाय्यक भूमिकांमध्ये 'दिठी'त दर्शन देऊन जातात. पण, सुमित्राबाईंचा सुरेख कॅमेरा त्या चित्रकथेत आरंभापासून अंतापर्यंत बदाबदा कोसळणाऱ्या पावासालाही एक प्रमुख पात्र करून जातो आणि या सर्व गुणसमुच्चयाला व्यापून उरतो. त्या मराठी माणसाच्या मर्मबंधातली ठेव असलेल्या ज्ञानेश्वर माऊलींच्या 'अमृतानुभवा'तील अवीट गोडीच्या 'अमृतातेंही पैजां जिंके' अशा काव्यपंक्ती! चित्रपटतंत्राचा अत्युच्च संगम साधणारा 'दिठी' पडद्यावरील पावसाला, शेवटी रसिकांच्या डोळ्यांतील आनंदाश्रूंनी भेटवतो आणि एक अविस्मरणीय कलानुभव देऊन जातो! केवळ सुमित्राबाई या ज्येष्ठ, प्रथितयश दिग्दर्शिका आहेत, म्हणून त्यांचा विचार पारितोषिकासाठी न होणं रसिक-मनाला न पटणारं होतं!

 

ॅन अनफेरीटेल

 

महिला दिग्दर्शिकांच्या या गटातील आणखी एक 'अ‍ॅन अनफेरीटेल(माडाथी)' चित्रपट अविस्मरणीय होता. 'अ‍ॅन अनफेरीटेल (माडाथी)' हा अवघा ९० मिनिटांचा तामिळ चित्रपट! लीना मणिमेकलाइ या दिग्दर्शिकेने चित्रपटारंभी पडद्यावर झळकवलेले 'हा देश कैक देवदेवतांनी बनलेला आहे आणि प्रत्येक देवतेमागे एका स्त्रीअत्याचाराची कथा असते' हे पहिलेच विषयसूत्र वाक्य प्रेक्षकाला खडबडून ताठ बसायला लावते. आणि पडद्यावर समोर येणारी अपारंपरिक अनोळखी विषयाची धक्कादायी हाताळणी काळजीपूर्वक निरखायला लावते. 'पुथिराह वन्नार' ही तामिळनाडूच्या दक्षिण भागात वस्ती करून असणारी एक दलित जमात. इतर दलितांचे, मृतांचे, रज:स्वला स्त्रियांचे कपडे धुण्याचा व्यवसाय समाजाने या जमातीच्या लोकांवर परंपरेने लादला आहे. या जमातीचा माणूस नुसता दृष्टीस पडला तरी तथाकथित उच्चजातीच्या माणसांना विटाळ होतो, असे मानले जाते. त्यामुळे इतरांच्या दृष्टीस आपण पडू नये म्हणून रस्त्याच्या कडेच्या झुडपांच्या जाळीत या वन्नार जमातीच्या लोकांना चाहूल लागताच पळावे लागते! मादथी ही या वन्नारांची देवी! या जमातीतील योस्ना नावाची निरागस मुलगी सामूहिक बलात्काराची शिकार होऊन जमातीची देवता 'माडाथी' म्हणून कशी मानली जाऊ लागली, याची गोष्ट दिग्दर्शिकेने या चित्रपटात अतर्क्य सुरुवात करून इतक्या वेधकपणे सांगितलेली आहे की, दर्दींनाही त्या चित्रकथेच्या भावी वाटावळणांचा अंदाज बांधता येऊ नये! अजमिना कासिम अल्लड योस्ना सुरेख जगली आहे. देशातील प्रत्येक संवेदनशील व्यक्तीला सध्या अस्वस्थ करणारी वाढती सामूहिक बलात्कारांची सामाजिक समस्या इतक्या कलात्मकपणे लीनाने पडद्यावर मांडली की, बघताना थक्क व्हायला होते. एरवी वन्नारांचे दर्शनही अशुभ मानणाऱ्या तथाकथित उच्चवर्णीय प्रतिष्ठित समाजकंटकांच्या विषयवासनेची शिकार व्हावे लागलेल्या योस्नाच्या आईच्या योस्नाच्या आर्जवी किंकाळ्या प्रेक्षकाला हादरवून टाकतात. पण, हाही चित्रपट परीक्षकांना पारितोषिकपात्र वाटला नाही. अपराजिता घोषने दिग्दर्शिलेला 'मिस्टिक मेमॉइर' हा 'रिशू' (अंकित बागची) नावाच्या कुमारवयीन मुलाच्या मनातील वाढत्या वयाच्या भावनिक कल्लोळांचा वेध घेणारा बंगाली चित्रपटही हळुवार हाताळणीचा होता. पण, त्या चित्रपटाची संभाव्य अखेर सहज बांधता येणारी होती! लाइ क्सुई या चिनी दिग्दर्शिकेचा 'द टेस्ट फ्र्रॉम ए हॅप्पी आयलंड' हा चित्रपटही तसाच जीवनेच्छा प्रबळ करणारा होता. सौमित्र चटर्जी, अपर्णा सेन सारखे बुजुर्ग कलावंत घेऊन अनुमिता दासगुप्ताने दिग्दर्शिलेला 'बोहोमन' (फ्लोज फॉर एव्हर) हा बंगाली चित्रपट आपल्या झी-मराठीवरील 'अग्गंबाई सासुबाई' या मालिकेची आठवण करून देणारा होता. विधवा आईने लाडाकोडात वाढविलेल्या तरुण मुलाला आईने उतारवयात केलेले दुसरे लग्न मंजूर नसणे, त्याच्या पुरोगामी विचाराच्या बायकोला मात्र ते रूचणे, हेच विषयसूत्र होते. शेवटी मात्र दिग्दर्शिकेने मुलासाठी धक्कादायक ठरणारी कलाटणी कथानकाला दिली होती. पण, चांगला मानसिक गुंतागुंतीचा विषय असलेला हा चित्रपट संथ लांबण लावलेल्या हाताळणीमुळे तितकासा प्रभावी ठरला नाही. एक स्त्री म्हणून त्यातले एक वाक्य मात्र सर्व स्त्रियांना पटावे - 'ऑलमेन आर बंडल ऑफ प्रॉब्लेम' (पुरुष तेवढे सारे कटकटेच!)

 

स्टोअरीज @ ८

 

या सर्व चित्रपटांच्या पार्श्वभूमीवर सर्वोत्कृष्ट ठरविण्यात आलेला शिल्पा शुक्ला या सिंगापूरस्थित दिग्दर्शिकेचा 'स्टोअरीज @ ८' हा अत्याधुनिक काळाशी सुसंगत नाव असलेला चित्रपट काय होता? थोडक्यात सांगायचे, तर अपारंपरिक रीतीने केलेली ती चित्रटपनिर्मिती होती. आठ भारतीय भाषणांतील छोट्या-छोट्या कथा त्यांतील एक-दोन पत्रांकरवी निवेदन संवाद करून रूपेरी पडद्यावर गुच्छासारख्या गुंफण्यात आल्या होत्या. शिल्पाला सिंगापूरमध्ये राहणारे भिन्नभाषिक भारतीय मित्र जसजसे भेटत गेले, तसतशा त्यांच्याकडून त्या स्वलिखित कथा अभिनित करून ती एकत्र गुंफण्यात गेली. गतवर्षी सिंगापूरला झालेल्या 'साऊथ एशियन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल'मध्ये 'ज्युरी अवॉर्ड' पटकावलेला हा चित्रपट घेऊन शिल्पा शुक्ला व तिचा सहकलाकारांचा चमू सध्या जगभरचे चित्रपट महोत्सव गाजवत फिरत आहेत. या आशियाई महोत्सवाच्या प्रदर्शनालाही शिल्पा शुक्ला वगळता तिचे आठ-दहा सहकलाकार मंचावर उपस्थित होते. मला स्वतःला मात्र अन्य काही जुन्या जाणत्या दर्दी रसिकांप्रमाणे हा चित्रपट पारितोषिकपात्र वाटला नाही. एकतर एकत्र बळेबळे गुंफलेल्या त्या आठ कथांमध्ये कोणतेही समान विषयसूत्र नव्हते. मुळात त्या साऱ्यांचे कथामूल्य अगदी प्राथमिक पातळीवरचे सुमार होते. त्यामुळे चित्रपट संपवल्यानंतर त्यातील एकही कथा प्रेक्षकाच्या मनात घोळत राहत नाही. 'एक ना धड भाराभर चिंध्या' अशी गत! त्यात एक मराठी कथाही होती. तीही स्मरणीय वाटू नये, यावरून बघा! केवळ विदेशस्थित भारतीयांना आपापला मातृभाषेतील कथा ऐकण्या-बघण्याचा अनुभव देणारी एक गंमत एवढेच त्या पारितोषिकपात्र ठरवल्या गेलेल्या चित्रपटाचे वैशिष्ट्य होते. व्यक्तिश: शिल्पा शुक्लाला नाउमेद करण्याचा माझा हेतू इथे नाही. पण, प्रत्येक पारितोषिक हे त्या कलावंताला पुढे-पुढे जाण्याची प्रेरणा देणारे एक सच्चे साधन असावे. त्यामुळे स्वतःच्याप्रतिमेबद्दल भ्रामक कल्पना कलाकाराच्या मनात निर्माण होऊ नयेत. कुठल्याही कलाकृतीचे पारितोषिकासाठीचे मूल्यमापन निखळ कलात्मक निकषांवरच व्हावे, असे मनापासून वाटले म्हणून हा परखड, पण प्रामाणिक अभिप्राय! असो...

 

वार्धक्यकळांचा वेध

 

झालंच तर या महोत्सवात अनिक दत्त लिखित आणि दिग्दर्शित 'क्लासमेट फे्ंरड्स' व अमिताभ चटर्जीच्या 'मनोहर अ‍ॅण्ड आय' हे बंगाली चित्रपट अणि मल्याळी वेणू नायर दिग्दर्शित 'डेथ बाय वॉटर' (जलसमाधी) हे वार्धक्यकळांचा कलात्मक वेध घेणारे संस्मरणीय चित्रपट बघायला मिळाले. सुधारित राहणीमान व वाढत्या वैद्यकीय सुविधा यामुळे अलीकडे भारतात वृद्धांना दीर्घायुष्य लाभत चालले आहे, पण तो शापही कसा ठरू शकतो, याचा कलात्मक वेध घेणारे हे तिन्ही चित्रपट होते. 'जलसमाधी'चा विषय तर चक्रावून टाकणारा होता. यिमाव झांग या विख्यात चिनी दिग्दर्शकाने कलात्मक फ्लॅशबॅकमधून उलगडलेला 'द रोड होम' हा कौटुंबिक चित्रपट आणि त्याची सुभगसुंदर नायिका झियी झांग निर्मळ भाव प्रेक्षकांच्या मनी जागणवणारे होते. तसाच होता डान वोलमन या इस्रायली दिग्दर्शकाचा 'बेन्स बायोग्राफी' हा चित्रपट! त्याचा नायक स्पर्शाला का घाबरायचा? संतोष बाबूसेनन दिग्दर्शित 'सुनेत्रा : द प्रिटी आइड गर्ल' हा मल्याळी क्राईम थ्रिलर हिंसक शेवट बटबटीतपणे पडद्यावर दाखवणे टाळल्यामुळे अभिनंदनीय वाटला, तर सुशांत मिश्राचा 'जोसेफ बॉर्न इन ग्रेस' हा चित्रपट हिमालयाच्या पर्वतमालांच्या नेत्रसुखद सिनेमॅटोग्राफीमुळे मनाचा वेध घेऊन गेला...

 

चुकीचे वेळापत्रक

 

लघुपट स्पर्धेत द्वितीय पारितोषिक पटकावलेला आविष्कार भारद्वाजचा 'विठा' हा हृद्य मराठी चित्रपट, तिसरे पारितोषिक विभागून मिळवलेला कंकना चक्रवर्तीचा 'रिट्न बाय?' हा बंगाली लघुचित्रपट, भारत-पाक सीमेवरील विद्यार्थिनी मनांचा विधायकपणे वेध घेणारा आशिष पांडे दिग्दर्शित 'नुरे' हा काश्मिरी लघुपट यांसारख्या अनेक लघुपटांसह अनेक चांगले चित्रपट या महोत्सवात बघायला मिळाले. पण, कमी दिवसांत महोत्सव उरकून टाकायच्या नादात आयोजकांनी आखलेल्या घाईगर्दीच्या वेळापत्रकामुळे कित्येक चांगल्या चित्रपटांचा आस्वाद घेणे रसिकांना अशक्यप्राय होऊन बसले. मुळात बस-रेल्वे यांच्या दृष्टीने अडचणीच्या ठिकाणी असलेल्या रवींद्र नाट्यमंदिरात, सध्या मेट्रोमुळे ठिकठिकाणी होत असलेल्या वाहतूककोंडीतून सकाळी १० वाजता पहिल्या शोसाठी पोहोचणं ही एक अशक्यप्राय गोष्ट! त्यामुळे बांगलादेशचा 'हळदा', इम्फाळच्या चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट बालचित्रपटाचा सन्मान पटकावेलेला मखौनमनी मोंगसाबा दिग्दर्शित 'ऑन हर लॅप', डॅनिश रेंझू दिग्दर्शित 'हाफ विण्डो', हा काश्मिरी चित्रपट हुकतच राहिले. ते विदेशी कलात्मक चित्रपट कमी लांबीचे असतात अन् सुरुवात बुडाली की रसास्वादात व्यत्यय येतो. म्हणून या महोत्सवाला दिवंगत मोठ्या कलाकारांना मानवंदना म्हणून नेहमी दाखवले जाणारे प्रदीर्घ लांबीचे 'सामना' (डॉ. श्रीराम लागू) , 'संस्कार' (गिरीश कर्नाड), 'शांतता कोर्ट चालू आहे' (सत्यदेव दुबे ; विजय तेंडुलकर) हे जुने मोठाले चित्रपट पहिल्या खेळाच्या वेळी दाखवले जावेत, अशी विनंती चित्रपट समीक्षकगेली १८ वर्षे संयोजकांना करत आले आहेत. पण, 'पालथ्या घड्यावर पाणी...' येत्या डिसेंबरमध्ये होणाऱ्या १९व्या आशियाई चित्रपट महोत्सवात तरी संयोजक या सूचनेची दखल घेतली का हे बघायचं आहे.

 

- नीला उपाध्ये

 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.