आर्टलॅण्ड

    दिनांक  13-Mar-2020 19:51:06
|


artland_1  H x'आर्टलॅण्ड' या नावाप्रमाणेच भारतीय चित्रकारांच्या कलाकृतींची बीजे रुजविणारी 'कला जमीन' अर्थात 'आर्टलॅण्ड.' या संस्थेने संग्रही ठेवलेल्या कलाकृतींना जहांगिरच्या कलाव्यासपीठावर प्रदर्शित केले आहे. सध्या हा सप्ताह फारच अमूल्य ठरला आहे. भारतातील विविध ठिकाणच्या प्रथितयश कलाकरांच्या कलाकृती या प्रदर्शनात मांडण्यात आलेल्या आहेत. एकूण १०० कलाकृती या प्रदर्शनात पाहता येतील. जहांगिर कलादालनाच्या तीनही दालनांमध्ये 'आर्टलॅण्ड'चे संचालक सुनील चौहान यांनी एकूण ६० सुप्रसिद्ध चित्रकारांना एकत्र आणण्याची किमया घडवून आणली आहे. 'ऑर्टलॅण्ड' ही कलाकारांच्या कलाकृतींना 'कॉर्पोरेट' जगतात आणून एकप्रकारे समृद्ध आणि सुजाण 'कॉर्पोरेट' चेहरा प्राप्त करवून देणारी प्रथितयश संस्था आहे, असे सुनील चौहान सांगत होते.

 
 

प्रथितयश चित्रकार सुहास रॉय, संजय भट्टाचार्य, गुरुचरण सिंग, विजेंद्र शर्मा, अजय डे, सुब्रोतो गंगोपाध्याय, आनंद पांचाळ, निलाद्री, विवेक कुमावत, निशांत डांगे, अनिल गायकवाड, शिवानीमाथुर, मनोज पातूरकर अशा उमद्या प्रतिभाशक्तीच्या ६० कलाकारांच्या १०० कलाकृती पाहायला मिळणं हीच फार मोठी संधी आहे. विजेंद्र शर्मा या दिल्लीच्या कलाकाराने अतिशय प्रभावी वास्तवादी शैलीत केलेले काम थक्क करून टाकते. अत्यंत लयदारी तंत्र आणि शैली. ब्रशने फटकारे, फटकार्‍यांमधील गतिमानता, रंगातील एकमेकांमध्ये एकरुप होण्याचे अद्भुत परिणाम या आणि अशा अनेक वैशिष्ट्यांसह या शंभर कलाकृती पाहण्याची मजा व आनंद लुटता येतो. सच्चा कलारसिक मंत्रमुग्ध न झाला तरच नवल...! 'आर्टलॅण्ड'चे 'कलर' दि. १६ मार्चपर्यंत जहांगिर कलादालनात पाहता येतील.

 
 

दरम्यान, याच जहांगिरच्या 'सर्क्युलर गॅलरी'मध्ये तीन कन्नडीगांच्या कलाकृती प्रदर्शित झालेल्या आहेत. कर्नाटकातील मंगळुरू येथील या प्रथितयश आणि हौशी कलाकारांमध्ये ज्येष्ठ कानडी पेंटर सोमैयाजी गणेशा बी. यांच्या कलाकृती सर्वसामान्यांना भावणार्‍या वास्तववादी शैलीत आहेत. निसर्गचित्रणे, काही फिगरेटिव्ह, दृश्यचित्रणे आणि आशयगर्भता असलेली 'रिअ‍ॅलिस्टीक पिक्टोरियल्स' हुकमतीने चितारलेली आहेत. सार्थ होला (Holla) यांच्याही काही 'क्रिएटीव्ह पेंटिंग्ज' शैलीतील कलाकृती सोडल्या तर बरंच काम हे रिअ‍ॅलिस्टीक लॅण्डस्केप्स, अलंकारिक शैलीतील पारंपरिक चित्रांकने अशा स्वरुपात आहे. गिलीयाल जयराम भट यांच्या कलाकृती अमूर्त शैलीतील आहे. रंगांचा स्वैर स्वैर वापर ही वैशिष्ट्ये या प्रदर्शनातील कलाकृतींमध्ये पाहायला मिळतात. या तिघांचे प्रदर्शन दि. १६ मार्चपर्यंत जहांगिरमध्ये सुरू राहणार आहे.

 
 

- प्रा. गजानन शेपाळ

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.