थैलायवाची राजकारणात दमदार एंट्री

12 Mar 2020 12:11:07


rajanikant_1  H



चेन्नई : दक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी आपल्या स्वतंत्र राजकीय पक्षाची घोषणा केली. चेन्नईतील लीला पॅलेस या हॉटेलमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत याबाबत त्यांनी घोषणा केली. जो पक्षाचा नेता असेल तो मुख्यमंत्री बनणार नाही आणि जो मुख्यमंत्री असेल तो पक्षाचा प्रमुख नसेल असे आपण ठरवलयाचे थलैवा रजनीकांत यांनी सांगितले. आपण तामिळनाडूत नवे नेतृत्व तयार करण्याचे काम करणार असल्याचेही ते म्हणाले. याच कारणामुळे आपण स्वत: मुख्यमंत्री न बनण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.



आम्ही आमची योजना पुढे नेऊ

आमचा पक्ष हा स्वत: सरकारला प्रश्न विचारेल. काही चूक झाली तर पक्ष चूक करणाऱ्यावर कारवाई करेल, अशी भूमिका रजनीकांत यांनी जाहीर केली आहे. आम्ही समांतर सरकार चालवणार नाही, असेही त्यांनी आवर्जून सांगितले. आमच्याकडे मर्यादित संख्येने लोक आहेत.आम्ही त्यांचा योग्य वापर करू. तामिळनाडूच्या लोकांसाठी आमच्याकडे योजना आहे. या योजनेबाबत आम्ही लोकांमध्ये जाऊन चर्चा करू. या बाबत आम्ही नेते, पत्रकार आणि अधिकाऱ्यांशीही बोललो आहोत, मात्र कुणीही या योजनेवर सहमती दर्शवलेली नाही, असे रजनीकांत म्हणाले. मात्र आम्ही आमची योजना पुढे नेऊ, असे रजनीकांत यांनी ठामपणे सांगितले.



तामिळनाडूतील अस्थिर राजकीय परिस्थिती पाहून पक्ष स्थापनेचा निर्णय


तामिळनाडूतील अस्थिर राजकीय परिस्थिती पाहून पक्ष स्थापनेचा निर्णय घेतल्याचे रजनीकांत यांनी सांगितले. २०१६पासून राज्यातील राजकीय वातावरणात स्थिरता नाही. निवडणुकांआधी जी आश्वासने आणि चेहरे घेऊन राजकीय पक्ष सत्तेत येतात ती पूर्ण केली जात नाहीत. माझ्या पक्षात तरुण, सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी, सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल. ६० ते ६५ टक्के संधी तरुणांनी देण्यात येणार असल्याची माहिती रजनीकांत यांनी दिली.मी केवळ पक्षाचा अध्यक्ष म्हणून काम पाहिले, मुख्यमंत्री पदाची मला अपेक्षा नाही. १९९६ मध्येही मला दोनदा मुख्यमंत्रीपदासाठी विचारण्यात आले होते, तेव्हाही मी नकारच दिला होता, असेही रजनीकांत यांनी सांगितले.




 

Powered By Sangraha 9.0