चला 'महावृक्ष' वाचवूया!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Mar-2020   
Total Views |
tress_1  H x W:

 

 
‘नवीन झाडे लावली म्हणजे जुनी कितीही तोडली तरी चालतील’ या भ्रमापोटी आज बेसुमार वृक्षतोड आणि निसर्गाचा ऱ्हास सुरू आहे. जुन्या मोठ्या झाडांचे म्हणजेच ‘महावृक्षा’चे महत्त्व ओळखून असे वृक्ष वाचवण्याचे काम पुण्याची ‘अप्लाइड एन्व्हायर्नमेंटल रिसर्च फाऊंडेशन’ (एईआरएफ) ही संस्था गेली अनेक वर्ष करत आहे. या कार्याविषयी जाणून घेऊया संस्थेच्या संस्थापक संचालिका डॉ. अर्चना गोडबोले यांच्या मुलाखतीतून...
 

 
’महावृक्ष’ नेमके कुठल्या प्रकारच्या झाडांना म्हणायचे? ते निसर्गात अशी कुठली महत्त्वाची भूमिका बजावतात, ज्यामुळे ते वाचवायला हवेत?
 
 
महावृक्ष म्हणजे अशी झाडे, जी बघताक्षणी आपल्याला भव्यदिव्य वाटतात. ढोबळमानाने आपण असे म्हणू शकतो की, ज्याची उंची २५-३० फुटांपेक्षा जास्त आहे. ज्याचा पर्णसंभार विस्तृत आहे आणि ज्याचा घेर दोन-तीन मीटरपेक्षा जास्त आहे तो महावृक्ष. हे महावृक्ष किमान ८०-१०० वर्षं जुने असल्याने ते आपल्या आजोबा-पणजोबांसारखेच असतात आणि एका प्रदीर्घ काळाच्या पर्यावरणीय सुस्थितीचे निदर्शक असतात. एक महावृक्ष अनेक प्रकारचे पक्षी, कीटक, खारीसारखे प्राणी, साप अशा जीवजातींना आश्रय देत असतो. ज्यायोगे तो वृक्ष म्हणजे एक परिसंस्थांच असते. महावृक्षांच्या सावलीमुळे जमिनीचे तापमान नियंत्रणात राहून माणसाचे, तसेच पशुपक्ष्यांचे जीवन सुसह्य होते. पुण्यात भिकारदास मारुतीपाशी पूर्वी एक प्रचंड मोठा वड होता. त्या वडाच्या सावलीत अख्खा बसस्टॉप वसलेला होता. हवामान बदलाच्या समस्येचा विचार करता एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या महावृक्षांनी भरपूर प्रमाणात, टनावारी कार्बन वातावरणातून शोषून स्वतःमध्ये साठवून ठेवलेला आहे. ज्या क्षणी असे मोठे झाड तोडले जाते तेव्हा हा कार्बन पुन्हा उत्सर्जित होतो आणि ‘ग्लोबल वॉर्मिंग’ला खतपाणी मिळते.
 
 
 
 

tress_1  H x W: 
 
 
 

‘सेव्ह जायन्ट ट्रीज’ हा आपला उपक्रम कधी आणि कसा सुरू झाला आणि आजपर्यंतची एकंदर वाटचाल कशी आहे?
 
 
आज शहरीकरणामुळे वा रस्ता रुंदीकरणासारख्या कामांमुळे महावृक्ष बिनदिक्कत तोडले जात आहेत. त्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. म्हणून या वृक्षांना वाचवण्याची गरज आम्हाला जाणवली. सह्याद्रीत, विशेषतः कोकणातल्या देवरायांचा अभ्यास करताना असे लक्षात आले की, इथे बेहड्याच्या वृक्षांची संख्या जास्त आहे आणि बर्याच वृक्षांवर धनेशाची (हॉर्नबिल) घरटी आहेत. धनेशाला वनशेतकरी (फॉरेस्ट फार्मर) म्हणतात. कारण, अनेक जंगली झाडांची फळे खाऊन बीजप्रसार करण्याचे आणि जंगल वाढवण्याचे काम धनेश करत असतो. संपूर्ण पश्चिम घाटामध्ये ’ग्रेट पाईड हॉर्नबिल’ आणि ’मलबार पाईड हॉर्नबिल’ या दोन पक्ष्यांनी बीजप्रसारावाटे जंगल राखण्याचे मोठे काम केले आहे. मग ’हॉर्नबिल’ वाचवायचा असेल तर त्याला घरटे बांधायला अनुकूल अशी मोठी झाडंही वाचवली पाहिजेत, याची गरज आम्हाला प्रकर्षाने जाणवायला लागली. महावृक्ष तोडले जाऊ नयेत यासाठी काहीतरी ठोस असा कार्यक्रम हाती घ्यायला हवा असे वाटले. सुरुवातीचा टप्पा म्हणून सह्याद्रीत असे वृक्ष कुठे कुठे आहेत त्यांची नोंद करायला घेतली. पाच वर्षांपूर्वी ‘सेव्ह जायन्ट ट्रीज’ हा उपक्रम सुरू केला. आर्थिक गरजेसाठी, पडून नुकसान होण्याचा धोका टाळण्यासाठी वा विकासकामासाठी लोकांकडून अशा झाडांची तोड होत असते. अशी धोक्यात असलेली झाडे हेरून त्या झाडांवर सूचनाफलक लावणे, झाडाच्या मालकाला थोडाफार आर्थिक मोबदला देणे, झाड न तोडण्याविषयी लेखी करार करणे, झाड वाचवल्याबद्दलचे प्रमाणपत्र देणे अशा शक्य त्या सर्व मार्गांनी आम्ही धोक्यात आलेले महावृक्ष वाचवायचा प्रयत्न करतो. गेली चार-पाच वर्षे आमचा हा उपक्रम सुरू आहे आणि त्याला प्रतिसादही चांगला मिळतोय. आत्तापर्यंत आम्ही साधारण एक हजार महावृक्ष वाचविले आहेत आणि पाच हजारांहून अधिक वृक्षांची माहिती गोळा केली आहे. त्यांना असलेले धोके लक्षात घेऊन प्रधान्य वाचविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. महावृक्ष वाचवण्याचे आमचे काम गेली पाच वर्षे सुरू असून जंगल संवर्धनाचे काम आम्ही गेले २५ वर्षे करत आहोत. या उपक्रमांतर्गत आम्ही बंडीपूर अभयारण्याच्या आसपास काम करणार्या ’जंगल स्केप’ संस्थेबरोबरही महावृक्ष वाचवण्याचे काम करतो.
 
 
 
खासगी आणि सार्वजनिक जमिनी यांमध्ये कुठे संवर्धनाचे काम जास्त सोपे वा अवघड वाटते?
 
 
तसे म्हटलं तर दोन्ही आव्हानात्मक आहे. दोन ठिकाणी कार्यपद्धती वेगवेगळी वापरावी लागते. देवराया सार्वजनिक असतात. अशी सार्वजनिक क्षेत्र राखण्यासाठी संपूर्ण गावाबरोबर काम करावे लागते. ग्रामपंचायतीला विश्वासात घ्यावे लागते. तुलनात्मकदृष्ट्या ही प्रक्रिया थोडीशी दीर्घकालीन असते. खासगी जमिनीच्या बाबतीत फक्त जमीन मालकाशी व्यवहार असतो. त्यातसुद्धा एका सातबार्यावर अनेक नावे असल्यामुळे सगळ्यांची संमती घेणे हे एक आव्हान असते. एखादा खासगी जमीनमालक त्याच्या जमिनीवरचे जंगल न तोडता राखणार असेल तर आम्ही त्याच्याशी दहा वर्षांचा लेखी सामंजस्य करार करून प्रतिएकर काही ठराविक रक्कम बक्षीस/मोबदला म्हणून देतो. हा करार करताना मालकाचा जमिनीवरचा मालकी हक्क कायम राहील, याची स्पष्ट लेखी हमी आम्ही देतो, जेणेकरून त्याच्या मनात काही शंका राहू नये. यामुळे लोक लेखी करार करायला तयार होतात.
वनोपजांचे योग्य मार्केटिंग करून त्याद्वारे जंगलसंवर्धन कसे करता येईल, यासाठीही आमचे प्रयत्न सुरू आहेत. उदाहरणार्थ- माळशेज घाटामध्ये आम्ही एका देवराईच्या बाबतीत ग्रामस्थांशी करार केला आहे. तिथे हिरड्याची बरीच झाडे आहेत आणि हे हिरडे विकून ग्रामस्थांना उत्पन्न मिळण्यासाठी आम्ही मदत केली आहे. 16 देवरायांमध्ये आम्ही ’बेहडा संकलन कार्यक्रम’ राबवतो. यामध्ये निसर्गाला धक्का न लावता शाश्वत पद्धतीने बेहड्याचे संकलन करणे, त्यामधून मिळालेल्या मोबदल्याचे योग्य वाटप करणे यांसंबंधी प्रशिक्षण आम्ही ग्रामस्थांना देतो. वनोपजांचे शाश्वत पद्धतीने संकलन केल्याबद्दल ’फेअरवाईल्ड फाऊंडेशन’ या जागतिक संघटनेकडून अशा वनोपजांना प्रमाणपत्र दिले जाते. 2015 साली आम्ही हिरडा आणि बेहडा या वनोपजांसाठी हे प्रमाणपत्र मिळवण्यात यशस्वी झालो. बेहड्यांच्या मार्केटिंगसाठी आम्ही ’पक्का हर्ब्ज’ या कंपनीबरोबर करार केला आहे.
 
 
 
महावृक्ष वाचवल्याबद्दल गावांना अथवा खासगी मालकांना आपण आर्थिक मोबदला/भरपाई देता. यासाठी निधी उभारणी आपण कशी करता?
 
 
 
निधी उभारणी ही खूप मोठी आव्हानात्मक गोष्ट आहे. बराचसा निधी आम्ही ’ग्लोबल गिव्हिंग’ या संस्थेकडून गोळा करतो. ’ग्लोबल गिव्हिंग’ ही एक जागतिक संस्था आहे जी सामाजिक कार्य करणार्या संस्था आणि सामाजिक कार्याला देणगी द्यायला इच्छुक असणारे लोक यांच्यातील मध्यस्थ म्हणून काम करते. ’ग्लोबल गिव्हिंग’ हा crowd funding platform आहे, ज्याद्वारे अशाप्रकारच्या सामाजिक कार्यासाठी छोट्या तसेच मोठ्या रकमेची आर्थिक मदत मिळू शकते. परंतु, अशी मदत मिळवणे अतिशय आव्हानात्मक आहे. ज्या सामाजिक संस्थांचे काम हे व्यापक स्तरावर आहे, ज्यांचे व्यवहार चोख आणि पारदर्शक आहेत अशा संस्थांनाच ’ग्लोबल गिव्हिंग’तर्फे देणग्या मिळू शकतात. यासाठी संस्थात्मक कामाचा दर्जा आणि शिस्त राखणे हे एक आव्हान असते. संस्थेच्या कामाचा, यशापयशांचा लेखाजोखा व्यवस्थितपणे द्यावा लागतो. आज परिस्थिती अशी आहे की, वाघ अथवा हत्ती अशा लोकप्रिय प्राण्याच्या संरक्षणासाठी काही करायचं म्हटले तर पैसे द्यायला तयार असणारे हजारो लोक आणि संस्था आहेत. परंतु, झाडे वाचवण्यासाठी निधी उभारणी करणे अवघड आहे. तरीही गेली 25 वर्षं आम्ही महावृक्ष आणि जंगलं वाचवण्याचे काम निष्ठेने करत आलो आहोत. आर्थिक नियोजनाचे, पैशाच्या उपलब्धतेचे प्रश्न अधूनमधून आले तरी आम्ही आमचे कार्य बदललेले नाही वा त्यावरची निष्ठा ढळू दिलेली नाही.
 
 
’वृक्षलागवड’ हा शब्द अलीकडे फार प्रतिष्ठित झाला. वृक्षलागवड हा वृक्षतोडीवरचा उपाय होऊ शकतो का?
 
 
मुळात ’वृक्षलागवड’ हा शब्दच चुकीचा आहे. आपण रोपं लावण्याचे काम करतो आणि जर वेळ, श्रम आणि पैसा खर्च करून त्यांची जोपासना केली तर अनेक वर्षांनी त्यांचे वृक्ष होण्याची शक्यता असते. वृक्षलागवडीने वृक्षतोडीची भरपाई मुळीच होऊ शकत नाही. कारण, एका महावृक्षाने वर्षानुवर्षं साठवून ठेवलेला कार्बन तो वृक्ष तोडल्यावर वातावरणात उत्सर्जित होतो. तेवढा कार्बन शोषून घ्यायला नवीन लावलेली झाडे किमान २०-२५ वर्षं मोठी व्हावी लागतात. आज वृक्षतोडीचा वेग प्रचंड आहे. कुठली झाडे कुठे लावायची, कशी लावायची याचे शास्त्र बाजूला ठेवून निव्वळ ’अमुक अमुक कोटी’ इतका आकडा पूर्ण करण्यासाठी रस्त्यांच्या कडेला दोन दोन फुटांवर झाडे लावण्याने कसलेही निसर्गसंवर्धन होत नाही.
 
 
आपल्या संस्थेमार्फत आपण महावृक्ष वाचवण्याचे यशस्वी प्रयत्न करत आहात. हेच काम व्यापक स्तरावर होण्यासाठी काय करता येऊ शकते?
 
 
महावृक्ष वाचवण्याचे काम व्यापक स्तरावर होणे ही काळाची गरजच आहे. पण मला व्यक्तिशः असे वाटते की, सरकारी योजनांपेक्षा खासगी संस्थांच्या माध्यमातूनच हे काम चांगल्या प्रकारे होऊ शकेल. गावागावांमध्ये काम करणार्या विविध छोट्या-मोठ्या सामाजिक संस्थांनी अशा प्रकारचा कार्यक्रम निश्चितपणे हाती घ्यावा. अर्थात, त्यासाठी खूप मेहनत घेण्याची आवश्यकता आहे. गावागावांमध्ये जाऊन अभ्यास करणे, लोकांशी चर्चा करणे, त्यांना विश्वासात घेणे, संस्थेच्या कामकाजात शिस्त आणि पारदर्शकता राखणे, निधी उभारणी हे सगळं करण्यासाठी खूप धडपड, मेहनत आणि संयम आवश्यक आहे. नुसते भावनिक आवाहन पुरेसे नाही.
@@AUTHORINFO_V1@@