खंजीर एक, पाठी अनेक...

11 Mar 2020 19:20:33


sanjay raut_1  



मध्य प्रदेशचा व्हायरस महाराष्ट्रात येणार नाही; इथे आलाच तर आमच्यासारखे सर्जन बसले आहेत. आम्ही मागे बायपास करून राज्यात सरकार आणले आहे. आणले आहे का? हो हो, आणले आहेच. इतका मोठा कार्यक्रम घेतला आम्ही. आम्ही म्हणजे महाविकास आघाडी सरकारने हो. त्यात 'आम्ही' पण आहोत. लोक उगीचच काही पण अफवा उठवतात. पुन्हा येणार, गोड बातमी येणार, सरकार कोसळणार याच त्या अफवा! यांच्यावर ना बंदीच घालायला हवी. आता तर काय, मध्य प्रदेशमध्ये वादळ उठलेय. त्याचा धुरळा इथे उडतोय. धुळवड आहे, चालायचंच. हो, होळीच्या निमित्ताने आठवलं, कोण कसे रंग बदलेल, सांगता येत नाही हो. आता हेच बघा ना, मोठे साहेब आणि छोटे राजकुमार यांना अजिबात जनतेच्या नजरेत येऊ न देता, बारामतीच्या काकांशी आणि दिल्लीच्या मावशीशी मीच वाटाघाटी केल्या. त्यावेळी 'सैनिक' म्हणून आयुष्यभर जे कमावले, ते क्षणार्धात गमावले, असा महाराष्ट्राने माझ्या बाबतीत कौल दिला. कालपर्यंत मी पुढे होतो. एक क्षण तर मला वाटले, मीच सीएम बनणार की काय? पण हाय! कशी नशिबाने थट्टा मांडली. त्यानंतर काय झाले, हे तुम्ही पाहिलेच. एक हौस पुरवा महाराज, म्हणून मी स्वत:साठी काय मागितले होते का? पण, जी इच्छा होती ती सुद्धा पूर्ण झाली नाही. ही सर्जरी कशी विसरेन मी? काय म्हणता, "सत्तेसाठी यावेळी सगळ्याच सत्ताधाऱ्यांनी आपआपल्या प्रामाणिक विचारधारेवर स्वार्थाची आणि फसवणुकीची सर्जरी केली आहे." अहो, हे करावे लागतेच. महाराष्ट्रात पाठीत खंजीर खुपसण्याची परंपरा फार जुनी आहे. पण, आता इथे असे काही होणार नाही. लक्षात ठेवा. इथे सर्जन बसलेत. असे म्हणतोय खरे, पण काळजी घ्यायला हवी. कारण, कमळधार्जिणे नतद्रष्ट म्हणे सांगत आहेत की, "सत्तेसाठी दल बदलणारे, एकमेकांच्या पाठीत खंजीर खुपसणारे सगळेच एकत्र आले आहेत. त्यामुळे खंजीर एक आणि पाठी अनेक असे अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे सत्तेसाठी खंजीर मारून घेणाऱ्या किती पाठी स्वत:हून तयार होतील?" थोडक्यात, ते कमळवाले पुन्हा यायच्या तयारीत आहेत वाटते. असे होईल का? छे, अंदाज करवत नाही. असे जर झाले तर त्यावेळी सर्जन काय करणार?

 
 

थप्पड... कुणावर?

 
 
 

'थप्पड' या सिनेमात नक्की काय आहे? या सिनेमात अनेक महिला पात्रं आहेत, त्यांची दुःखे आणि संघर्ष आहे. सिनेमाची नायिका आहे अमृता. ती कुटुंबासाठी अहोरात्र स्वत:हून झिजते. एके दिवशी तिचा पती तिला ऑफिसच्या टेन्शनच्या ओघात भर पार्टीत नातेवाईक, पाहुणे, मित्रमंडळींसमोर एक 'थप्पड' मारतो. त्यानंतर अमृताला वाटते की, या संसारामध्ये, घरात आणि नवऱ्याच्या लेखीही आपली किंमत शून्य आहे. तिला वाटते की, आता तिचे तिच्या पतीवर प्रेम नाही, तसेच संसार, पती वगैरेंच्या पाठी लागून आपले वैयक्तिक स्वत्वच ती गमावून बसली आहे. पतीने आयुष्यात पहिल्यांदा का होईना 'थप्पड' का मारली? त्याला हा अधिकार दिला तरी कुणी? तिचा पती, सासर आणि माहेरचेही तिला परोपरीने विनवतात. मात्र, ती घटस्फोट घ्यायचा निर्णय घेते. तिच्या निर्णयामुळे सासरचे माहेरचे कोलमडून पडतात. अमृताला या नात्यात एकाएकी स्वारस्यच वाटेनासे होते. स्त्री-पुरुष या दुर्बिणीतून न पाहता, तटस्थ भूमिकेमधून पाहिले तर जाणवते की, नायिकेचे पतीवरचे प्रेम एका 'थप्पड'ने विरून जाते का? तसेच स्वत:ची प्रगती, प्रतिमा वगैरे घरदार सोडूनच करता येते का? छोट्या गोष्टींचा बाऊ करून आयुष्याला वैराण करणे म्हणजेच स्वत्व निर्माण करणे आहे का? समजूतदारपणा, समन्वय साधणे, आपल्या जोडीदाराला एकदा तरी माफ करण्याचा मनाचा मोठेपणा दाखवणे या गोष्टी स्त्री काय, पुरुष काय, यांच्या माणूसपणासाठी बाधक आहेत का? मी, माझे विश्व, माझी प्रतिमा, माझा मान, माझा अहंकार बस...! त्यापुढे सगळे शून्य. ही भूमिका स्त्री काय, पुरुष काय, कुणासाठीही योग्य नाहीच. पण, 'थप्पड'मध्ये याच भावनेला अतिशय बेंगरूळ मुलामा दिला आहे. दुसरीकडे एक विधवा महिला आणि तिची १३ वर्षांची मुलगीही सिनेमात आहे. मात्र, सिनेमाच्या शेवटी १३ वर्षांची मुलगी तिच्याच वयाच्या मुलाच्या खांद्यावर डोके ठेवून झोपलेली असते. तिची आई म्हणते, "मी तर लग्न करणार नाही, पण तुझ्यासाठी मुलगा पाहिला आहे." बालविवाहाला कायद्याने बंदी आहे. मात्र, लहान मुलीला तिच्या मित्राच्या आधारावर सोडून खुश असणारी आई या सिनेमात आहे. या दृश्याच्या तारतम्याचा नेमका कोणता अर्थ प्रेक्षकांनी घेणे अपेक्षित आहे, ते दिग्दर्शकच जाणो!

 
 
Powered By Sangraha 9.0