इस्लामाबाद : तालिबानी जिहादींनी अमेरिकेची अवस्था शेपटी तुटलेल्या कोल्ह्यासारखी केली, असे जहाल वक्तव्य केलेल्या जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरला पाकिस्तानने बहावलपूर येथून रावळपिंडीला हलवले आहे. अमेरिकेच्या विरोधात केलेले हे वक्तव्य अंगलट येण्याची शक्यता असल्यानेच त्याच्या सुरक्षेसाठी ही काळजी घेण्यात आली, असा निष्कर्ष यातून काढण्यात येत आहे.
ट्रम्प प्रशासनाच्या दबावापोटी रावळपिंडी जनरल मुख्यालयाने (जीएचक्यू) मसूदला नेमके कुठे दडवून ठेवले याची माहिती मात्र प्राप्त झालेली नाही. मसूद आणि त्याचा भाऊ रौफ असघर आणि मौलना अम्मर या तिघांना जीएचक्यूने तातडीने हजर राहण्याचे आदेश दिले. त्यानंतर ३ मार्च रोजी त्याला रावळपिंडीतील सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले, अशी माहिती आहे.