अमेरिकेत ‘भारतीय’ मतदार राजा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Mar-2020   
Total Views |

Donald Trump _1 &nbs



 

डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाने अमेरिकेतील मूळ भारतीय वंशाच्या मतदारांसाठी जाहिरात अभियान सुरू केले आहे. समाजमाध्यमांद्वारे भारतीयांसाठी अशाप्रकारे केवळ भारतीय मूलत्व असणार्‍या मतदारांसाठी जाहिरात करण्याची अमेरिकेतील ही पहिलीच वेळ आहे.


अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेला भारत दौरा आणि भारतीयांनी त्यांचे मोठ्या मनाने केलेले स्वागत, तसेच साबरमती आश्रम भेट, ताजमहाल दौरा, ‘नमस्ते ट्रम्प’ हा देदीदप्यमान सोहळा, ट्रम्प यांनी केलेली भारतीयांची स्तुती आणि त्यांचे गाजलेले भाषण सार्‍यांनीच पाहिले. जगातील एका बलाढ्य देशाचा प्रमुख असलेल्या ट्रम्प यांना राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीत पुन्हा निवडून येण्यासाठी या गोष्टी मदत करतील, असे भाकीत अनेक विश्लेषकांनी वर्तवले.

 

साहजिकच या दौर्‍याचा काहीसा परिणाम त्यांना मिळणार्‍या अमेरिकेतील मूळ भारतीय मतदारांवर होईलही. मात्र, इतके करून भागणार नाही, हे खुद्द ट्रम्प आणि त्यांच्या सल्लागार आणि कन्या इव्हांकाही जाणतात. यामुळेच ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाने अमेरिकेतील मूळ भारतीय वंशाच्या मतदारांसाठी जाहिरात अभियान सुरू केले आहे. समाजमाध्यमांद्वारे भारतीयांसाठी अशाप्रकारे केवळ भारतीय मूलत्व असणार्‍या मतदारांसाठी जाहिरात करण्याची अमेरिकेतील ही पहिलीच वेळ आहे.

 

अमेरिकेत मूळ भारतीय मतदार असणार्‍या नागरिकांची संख्या १४ लाखांहून अधिक आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावरील मतदारांकडे दुर्लक्ष करण्याची चूक ट्रम्प करू शकत नाहीत. २०१६च्या निवडणुकांमध्ये एकूण ८४ टक्के भारतीय वंशाच्या मतदारांनी ट्रम्प यांना नाकारले होते. याच मतदारांची मने वळवण्याचा यंदा हा प्रयत्न म्हणावा लागेल. सतत ‘अमेरिका फर्स्ट’ हे धोरण डोळ्यासमोर ठेवणार्‍यांसाठी हे म्हणा एक मोठे आव्हानच. मात्र, तरीही त्यांना प्रयत्न तर करावाच लागेल, असे जाणकारांचे मत आहे. ट्रम्प यांनी आपल्या प्रशासकीय कारभारात आत्तापर्यंत २२ भारतीय वंशांच्या व्यक्तींना स्थान दिले आहे. अमेरिकेच्या इतिहासात इतर देशांतील प्रवासी समूहांना असे स्थान मिळण्याची ही पहिलीच वेळ. निक्की हेली हे युएन अमेरिकेचे राजदूत, मेडिकेअर आणि मेडिकल सेवांच्या प्रशासक सीमा वर्मा, व्हाईट हाऊसचे कम्युनिकेशन डायरेक्टर, तर फेडरल कम्युनिकेशन कमिशनचे अध्यक्ष अजित पाई आदी काही त्यातील महत्त्वाची उदाहरणे. अर्थात, हे भारतीय त्यांच्या कर्तृत्वाने तिथे पोहोचले असतील, हे वेगळे सांगायला नकोच. मात्र, एक चतुर उद्योजक असलेले ट्रम्प यांचा नक्कीच फायदा निवडणुकांवेळी करून घेणार, हे निश्चित.

 

त्यातच १४ लाख हा मतदारांचा टक्का महत्त्वाचा ठरणार आहे. मागील काही काळापासून ट्रम्प यांच्याविरोधात ढवळून निघालेले अमेरिकेतील वातावरण, महाभियोग प्रक्रिया, व्यापार युद्ध आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेवर झालेला परिणाम याचे एकत्रित भांडवल ट्रम्प यांचे विरोधक करणार आहेत. त्यादृष्टीने ट्रम्प यांच्यासाठी ही निवडणूक मोठी आव्हानात्मक असेल. म्हणून ही भारतीयांची एकगठ्ठा मते ट्रम्प यांच्यासाठी महत्त्वाची आहेत. २०१६च्या निवडणुकांमध्ये अमेरिकेतील प्रवासी मतदारांच्या तुलनेत ६२ टक्के मते ही भारतातून अमेरिकेत स्थायिक झालेल्या मतदारांचीच होती. २०१६च्या वेळी भारतीय वंशाचे एकूण मतदार हे १२ लाख होते. आता त्यात वृद्धी होऊन हा आकडा १४ लाखांवर पोहोचल्याची शक्यता आहे.

 

तसेच मागील निवडणुकांमध्ये या सर्व मतदारांनी ट्रम्प यांच्या विरोधात मतदान केले होते. ट्रम्प यांची त्यावेळची सततची वादग्रस्त वक्तव्ये आणि हिलरी क्लिंटन यांची भारतीयांच्या मनात असलेली प्रतिमा याला कारणीभूत ठरली होती. हिलरी यांना १२ लाखांपैकी ८० टक्के मतदारांनी पाठिंबा दर्शवला होता. मात्र, अमेरिकेतील मतदारांनी ट्रम्प यांच्या ध्येयधोरणांना मतदान केले होते. अमेरिकेत भारतीय वंशाच्या खासदारांची संख्या केवळ पाच इतकी आहे. हे सर्व खासदार डेमोक्रेटिक म्हणजेच ट्रम्प यांच्या विरोधी पक्षातील आहेत. ट्रम्प यांच्या बर्‍याच जाहिरातींमध्ये त्यांच्या भारत दौर्‍यातील छायाचित्रे आहेत.

 

ट्रम्प यांचे इव्हांका यांच्यासोबतचे ताजमहाल येथील छायाचित्र आहे, “भारतीय हे व्यवसाय, तंत्रज्ञान, सर्जनशीलता यात तल्लख आहेत. त्यांच्यासाठी मी सदैव संघर्ष करेन,” तर दुसर्‍या जाहिरातीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतचे चित्र आहे. “अमेरिकेचे भारतावर कायम प्रेम असून येत्या काळात दृढ बंध आणि सहकार्यासाठी उत्सुक आहोत,” असा आशय या जाहिरातींवर आहे. सोशल मीडियावरील या जाहिरातींमुळे अमेरिकेत वादंगही उठले आहे. तिथल्या उच्चशिक्षित भारतीय वंशाच्या मतदारांना ट्रम्प यांच्या धोरणाचा फटकाही बसला आहे. म्हणूनच भविष्यात ट्रम्प यांच्या पारड्यात त्यांची मते पडतात का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.



 
@@AUTHORINFO_V1@@