एक धर्म, दोन चित्र

    दिनांक  10-Mar-2020 20:20:27
|

Protest against Women's r
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त रविवारी पाकिस्तानमध्ये 'औरत मार्च' वर इस्लामिक कट्टरवाद्यांकडून दगडफेक, चिखलफेक अन् चप्पलफेकही झाली. पण, याउलट भारतातील 'सीएए', 'एनआरसी' विरोधी मोर्चात बुरखादारी महिलाच पोलिसांवर दगडांचा वर्षाव करताना अग्रेसर होत्या. तेव्हा, एकाच धर्मातील दोन राष्ट्रातील या दोन भिन्न चित्रांमागचा अन्वयार्थ समजून घ्यायला हवा.

 
 

रविवारी आंतरराष्ट्रीय 'महिला दिना' निमित्त पाकिस्तानमध्ये महिलांच्या हक्कांसाठी राजधानी इस्लामाबादसह विविध शहरांत आयोजित 'औरत मार्च'वर अल्लाच्या बंद्यांनी अमानुष दगडफेक केली. महिलांच्या तोंडावर चिखल फेकला. चपलांचा वर्षाव करून 'महिलांनो, तुमची लायकी आमच्या पादत्राणाइतकीच' हेच दाखवून नाहक मर्दुमकीचे ढोल पिटले. 'इस्लाम'च्याच नावाखाली आपल्याच आयाबहिणींना 'महिला दिना'च्या दिवशी यथेच्छ शिव्यांची लाखोली वाहिली. या महिलांचा दोष तो काय, त्या ना सरकारविरोधात नारेबाजी करत होत्या, ना कुणा पुरुषाविरोधात. त्यांचा आवाज होता तो केवळ स्वत:च्या हक्कांसाठी...स्वत:च्या शरीरासाठी...

 
 

'मेरा जिस्म, मेरी मर्जी' म्हणत या बुरखेदारी महिलांनी 'माझ्या शरीरावर सर्वस्वी माझाचा अधिकार'चा हुंकार केला. पण, इस्लामचे कडवे विष डोक्यात भिनलेल्या कट्टरवाद्यांना या घोषणा इस्लामविरोधी, अल्लाविरोधी आणि मुख्यत्वे पुरुषी अहंकाराला आव्हान देणार्‍या वाटल्यामुळे त्यांनी 'औरत मोर्चा'चा गळाच आवळला. प्रतिमोर्चा काढून या महिलांची मुस्कटदाबी करण्याचा दुर्देवी प्रकार घडला. पोलीस यंत्रणा, इमरान खान सरकार यांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली आणि महिला दिनीच या 'औरत मोर्चा'ची 'औकात' काढण्यात आली. बुरख्यातील अब्रू बेअब्रू करण्याच्या जाहीर धमक्या देण्यात आल्या.

 
 

'महिलांच्या शरीरावर खुद्द त्यांचाही नाही, तर सर्वस्वी अल्लाचाच अधिकार आहे,' अशी विखारी वक्तव्ये करून हा मोर्चा कसा पाश्चिमात्त्य संस्कृतीच्या दरीत पाकिस्तानला झोकणारा आहे, यावरून गळे काढण्यात आले. फक्त रस्त्यावर नाही, तर पाकिस्तानी वृत्तवाहिनीच्या एका चर्चासत्रातही निवेदिकेला उद्देशूनअगं तुझ्या अंगावरही कुणी थुंकणार नाही,” या प्रकारची अश्लील, नीच पातळीवरची सरेआम शेरेबाजी करेपर्यंत इस्लामिक कट्टरवाद्यांची मजल गेली. यावरून पाकिस्तानमध्ये घरात, दारात आणि एकूणच समाजात महिलांची परिस्थिती किती भीषण आहे, याचा पुनश्च प्रत्यय आलाच.

 
 

महिलांवरील अत्याचाराच्या बाबतीत पाकिस्तानचा जगात सहावा क्रमांक लागतो. मुस्लीम असो अथवा अल्पसंख्याक महिला, त्यांच्यावर होणार्‍या अमानुष अत्याचारांच्या घटनांकडे या देशात साफ दुर्लक्ष केले जाते. न्याय वगैरे तर दूरच! त्यात बालविवाहापासून बहुपत्नीत्वाची समस्या भीषण आहेच. त्याखेरीज महिलांच्या स्वातंत्र्यावर, पेहेरावावर, आवडीनिवडींवर इस्लामिक बंधनांचे जोखडदंड आहेतच. मुलींच्या शिक्षण हक्कांसाठी लढणारी मलाला असो वा पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो, कुठल्याही स्तरातील महिला ना आधी पाकिस्तानात सुरक्षित होती, ना आज आहे.

 
 

पुरुषी वर्चस्वाच्या या इस्लामी बुरख्याआड आहे तो फक्त आणि फक्त काळाकुट्ट अंधार... पाकिस्तानी क्रिकेट संघाचा माजी कर्णधार राहिलेल्या शाहिदी आफ्रिदीचेच उदाहरण वानगीदाखल घ्या. पाच मुलींचा बाप असलेला आफ्रिदीही म्हणतो, “मी माझ्या मुलीला सामाजिक आणि धार्मिक कारणांमुळे कधीही क्रिकेट अथवा कुठलाही मैदानी खेळ खेळू देणार नाही.” आता माजी कप्तानाच्या तोंडीच जर ही असली स्त्रीविरोधी भाषा असेल, तर तिथे तळागाळातल्या पाकिस्तानी महिलांचे हाल कुत्रेही विचारणार नाही, हे वेगळे सांगायला नकोच!

 
 
 

पाकिस्तानातील ही दयनीय परिस्थिती पाहता, हाच प्रश्न पडतो की, भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश एकत्रच स्वतंत्र झाले. पण, आज ७० वर्षांहून अधिक काळ लोटला तरी एकधर्मी अंमल असलेला पाकिस्तान सर्वार्थाने विविध जातीधर्मांचे माहेरघर असलेल्या भारतापेक्षा सर्वच क्षेत्रांमध्ये पिछाडीवर आहे. याचे एकमेव कारण म्हणजे दोन्ही देशांत स्वातंत्र्यानंतर रुजलेले, नांदलेले दोन भिन्न विचारप्रवाह. भारताने 'संविधान' सर्वोपरी मानून स्त्री-पुरुषांना समान अधिकार बहाल केले. पराकोटीचे जातीय, धार्मिक, सामाजिक भेदाभेद असूनही भारत प्रगतीची नवनवीन क्षितिजे पादाक्रांत करत केला. यामध्ये पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिलांनीही आपल्या कर्तृत्वाची विविध क्षेत्रांत छाप उमटवली. इतकेच काय, तर भारताच्या संविधाननिर्मितीतही महिलांचा सहभाग होताच.

 
 

कारण, प्राचीन भारतीय संस्कृतीच मुळी शक्तीपूजक, स्त्रीपूजक परंपरा, प्रथांची पहिलटकरीण. पण, याउलट परिस्थिती ही पाकिस्तानमध्ये. स्वत:ला 'रिपब्लिक' म्हणून मिरवणार्‍या या देशाने कायमच मध्ययुगीन 'इस्लामिक' तत्त्वांचा, नीतीमूल्यांचाच एकांगी अंगीकार केला. 'शरिया' हाच पाकिस्तानच्या सध्या कमजोर पडलेल्या मुळांचा आधार. त्यामुळे या 'शरिया'मधील महिलांचे स्थान, हक्क, अधिकारांची सीमा ही किती संकुचित आहे, हे आपण जाणतोच. एवढेच काय तर खुद्द कुराणची शिकवण सांगते की, महिलांचे स्थान हे कितीही सत्कर्म केले तरी नरकातच! त्यामुळे एकीकडे स्त्रीला 'देवी' मानून तिची पूजा करणार्‍या संस्कृतीचा संपन्न विचारप्रवाह, तर दुसरीकडे स्त्रीला काडीमोलही किंमत न देता उपभोगवादालाच उराशी बाळगणारा विषण्ण समाजप्रवाह, आजही तितक्याच ठळकपणे या दोन्ही देशांना एकमेकांपासून सर्वार्थाने वेगळे ठेवताना दिसतो.

 
 

परंतु, भारतात आज 'सीएए', 'एनआरसी'च्या विरोधात अल्पसंख्याक समाजाच्या महिलादेखील बुरखे घालून पोलिसांवर दगडफेक करतानाचे दारुण चित्र संपूर्ण देशाने पाहिले. शाहीनबाग, मुंबईतील नागपाड्यातही मुस्लीम बुरखाधारी महिलांचा आंदोलनातील हत्यार म्हणून मुद्दाम वापर करण्यात आला. पण, ना त्यांच्यावर दगडफेक झाली ना गोळीबार. त्यांच्या साध्या केसालाही धक्का लागला नाही. उलट या आंदोलनस्थळी पोलिसांचे 24 तास संरक्षण या महिलांना लाभले. तेव्हा, पाकिस्तानचा पुळका आलेल्या अल्पसंख्याक समाजातील महिलांनीही त्या नापाक दगडफेकीतून थोडासा बोध घ्यावा. कारण, याच पाकिस्तानच्या गावखेड्यांमध्ये आजही बलात्कारासाठी महिलांनाच दोषी ठरवून दगडाने ठेचून मारण्यात येते. पण, हा भारत, या देशाचे कायदे शहाबानोपासून ते शायराबानोपर्यंत प्रत्येक महिलेला न्याय देणारे ठरले. 'तिहेरी तलाक'ची अमानुष प्रथा हद्दपार करून मोदी सरकारने ते अल्पसंख्याक महिलांच्या हितासाठी तितकेच कटिबद्ध असल्याचे सिद्धही केले.

 
 

त्यामुळे पाकिस्तानातील 'औरत मार्च'वरील अमानवी हल्ल्याची दुर्देवी घटना पाहिल्यानंतरही जर या अल्पसंख्याक महिलांना पाकिस्तान किंवा इतर कोणताही इस्लामिक देश तरीही तितकाच प्रिय वाटत असेल, तर त्यांनी वेळीच धर्माची झापडं थोडी दूर सारुन डोळे उघडावे आणि भारतात महिलांना मिळणार्या स्वातंत्र्याच्या तुलनेत मुस्लीम जगतातील महिला आज काय परिस्थितीत जीवन व्यतीत करताहेत, त्याचा कानोसा घ्यावा. त्यानंतर तरी कदाचित 'एक धर्म, दोन चित्रां'मागचे हे भीषण वास्तव या महिलांच्या लक्षात येईल, अशी आशा...

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.