भाजप आमदार सुनील राणे यांच्यामुळेच गिरणी कामगारांना कमी किमतीत घरे

01 Mar 2020 19:40:23
Sunil-Rane _1  
 
 
 


विधानसभेत उठवला होता गिरणी कामगारांचा आवाज


मुंबई : बोरिवलीचे भाजप आमदार सुनील राणे यांनी विधानसभेत गिरणी कामगारांच्या बाजूने आवाज उठविल्यामुळे त्यांना कमी किमतीत घरे उपलब्ध होत आहेत. गिरणी कामगारांनी आमदार राणे धन्यवाद दिले आहेत. गिरणी कामगारांसाठी बांधलेल्या घरांची किंमत साडेनऊ लाख रुपये ठरविण्यात आली होती. मात्र त्यात वाढ करत सरकारने ती १८ लाख केली. याविरोधात आमदार सुनील राणे यांनी विधान सभेत आवाज उठवला. पुरवणी मागण्यांवर बोलताना सुनील राणे म्हणाले, की गिरणी कामगारांच्या घराची किंमत साडेनऊ लाख रुपये असताना सरकारने त्यात वाढ करत ती अठरा लाख रुपये केली आहे.
 
किंमत वाढवल्यामुळे गिरणी कामगारांत असंतोषाचे वातावरण आहे. किंमत कमी न केल्यास गिरणी कामगार घरांची सोडत होऊ देणार नाहीत, असा इशाराही राणे यांनी दिला होता. शेवटी राणे यांच्या मागणीचा सरकारला सकारात्मक निर्णय घेणे भाग पडले. गिरणी कामगार संघटनांनीही या संदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. आमदार सुनील राणे आणि गिरणी कामगार यांचे अतूट नाते आहे. ते गिरणगावातच लहानाचे मोठे झाले. गिरणी कामगारांचा त्याग, मुंबईच्या विकासात त्यांचे योगदान राणे यांनी जवळून अनुभवले आहे. त्यामुळे त्यांना रास्त भावात घरे मिळावी यासाठी राणे यांची तळमळ होती. दरम्यान गिरणी कामगारांना सुमारे दीड लाख घरांची आवश्यकता असून आतापर्यंत सुमारे १६ हजार घरांचे वाटप करण्यात आल्याचे गिरणी कामगार आनंद मोरे यांनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0