इमरानी मुक्ताफळे

01 Mar 2020 20:05:19

Imran Khan _1  



आयबी अधिकार्‍याची हत्या ही साधी घटना अजिबात नाही आणि इथेच दंगलखोरांनी सीमेपलीकडच्यांशीही हातमिळवणी केली होती का, याची शंका येते. म्हणूनच आता इमरान खान त्यांच्या बचावासाठी रा. स्व. संघ आणि भारत सरकारविरोधातच गरळ ओकताना दिसतात.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हिंदुत्वाचा अजेंडा १९३० च्या दशकात हिटलरने ज्यूंविरोधात राबविलेल्या नाझीवादाप्रमाणेच आहे. मुख्यमंत्रिपदी असताना मोदींनी गुजरातमध्ये मुस्लिमांविरोधात जे काम केले, तेच आज दिल्लीतही होताना दिसते. भारतातील २० कोटी मुस्लीम संकटात असून त्यांना लक्ष्य केले जात आहे. नाझीवादातून प्रेरणा घेणार्‍या रा. स्व. संघाच्या कार्यकर्त्यांनी अण्वस्त्रसंपन्न भारतावर कब्जा केला असून जागतिक समुदायाने यावर लवकरात लवकर कारवाई केली पाहिजे. भूत बाटलीतून बाहेर आले तर रक्ताचा सडा पडेल, हे मी आधीच सांगितले होते, काश्मीर ही फक्त त्याची सुरुवात होती.” अशी मुक्ताफळे पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी उधळली.

 

दिल्लीतील हिंसाचार आणि दंगलीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही विधाने केली. भारतात काश्मिरचा मुद्दा असो वा आताचा नागरिकत्व सुधारणा कायद्याचा; पाकिस्तानकडून प्रतिक्रिया येतेच आणि ती नेमकी इथले भाजप व मोदीविरोधक ज्या सुरात बोलतात तशीच असते. आताची दिल्लीतील सीएएविरोधकांनी केलेल्या हिंसाचारावरील इमरान खान यांची प्रतिक्रियादेखील काँग्रेस व डाव्यांच्या मतांशी जुळणारीच आहे. कारण काँग्रेससह कम्युनिस्ट पक्ष, समाजवादी पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, बहुजन समाज पक्ष आणि आम आदमी पक्ष या सगळ्यांनीच वेळोवेळी नरेंद्र मोदी, अमित शाह, भाजप आणि रा. स्व. संघाबद्दल सातत्याने अशीच विधाने केलेली आहेत. तसेच देशातील कथित बुद्धीजीवी, विचारवंत, अभ्यासक, पुरोगामी-धर्मनिरपेक्षवादी, उदारमतवादी लोकांच्या तोंडातले शब्द आणि इमरान खान यांच्या आताच्या विधानात कमालीचे साम्य आढळते. दंगलीच्या माध्यमातून इथल्या सरकारविरोधकांनी मिळेल त्या मंचावरून देशाची बदनामी चालवलीच आहे, तेच काम इमरान खानही करत असल्याचे दिसते.

 

उल्लेखनीय म्हणजे दिल्लीतील दंगलीत मोठ्या प्रमाणावर पिस्तुली, बंदुकी आणि इतरही घातक हत्यारांचा वापर करण्यात आला. हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्या आणि जखमी झालेल्या अनेकांना गोळ्या लागल्याचेही समोर आले. ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ ही कट्टर इस्लामी संघटना आणि भीम आर्मीचे नाव या दंगलीशी जोडले गेले तसेच आम आदमी पक्षाच्या ताहीर हुसैनच्या घरात प्रचंड शस्त्रसाठा सापडला. सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे आयबीचे अधिकारी अंकित शर्मा यांचा गोळ्या घालून व ४०० वेळा सुरा खुपसून केलेला खून! आयबी अधिकार्‍याची हत्या ही साधी घटना अजिबात नाही आणि इथेच दंगलखोरांनी सीमेपलीकडच्यांशीही हातमिळवणी केली होती का, याची शंका येते. म्हणूनच आता इमरान खान त्यांच्या बचावासाठी रा. स्व. संघ आणि भारत सरकारविरोधातच गरळ ओकताना दिसतात.

 

दुसर्‍या बाजूला पाकिस्तानची आजची अवस्था हाती कटोरा घेऊन श्रीमंतांच्या दाराशी आशाळभूतपणे उभ्या राहणार्‍या भिकार्‍याहून कमी नाही. आज खायला मिळाले तर फार झाले, उद्या मिळेल की नाही, याची शाश्वती नाही, अशी त्या देशाची परिस्थिती. म्हणूनच दिवाळखोरीकडे वाटचाल करणार्‍या पाकिस्तानने आधी आपल्या देशातल्या जनतेचे प्रश्न सोडवावे, इतरांच्या प्रश्नांत नाक खुपसू नये. आर्थिकदृष्ट्या पाकिस्तान दयनीय आहेच, पण तिथल्या अल्पसंख्याकांचे काय? स्वतः धार्मिक व जिहादी आगीत तो देश सदान्कदा होरपळताना दिसतो.

 

मुसलमान हिंदूंचा गळा घोटायला हपापलेला तसाच तो बौद्ध, शीख, जैन, पारशी आणि ख्रिस्त्यांचा बळी घ्यायलाही टपलेला. हिंदू व अन्य अल्पसंख्याक समुदायाच्या मुली-महिलांच्या शरीरावर तर तिथल्या बहुसंख्य इस्लामी धर्मांध आणि जिहाद्यांचे डोळे सदैव रोखलेले. अल्पवयीन हिंदू मुलींना जबरदस्तीने पळवून नेऊन, धर्मांतर करून त्यांच्याशी धर्मांधांनी निकाह लावल्याची तर कितीतरी उदाहरणे पाकिस्तानात आढळतात. हिंदूंची मंदिरे आणि शिखांचे गुरुद्वारे तर मुस्लीम दहशतवाद्यांच्या हल्ल्यात नेहमीच उद्ध्वस्त होत आले. गेल्या दोन-तीन महिन्यांत अशा कितीतरी घटना घडल्या. शनिवारी तर पाकिस्तानातील मुस्लिमांनी अहमदिया पंथीय मुस्लिमांच्या कबरी उखडल्या. म्हणजेच पाकिस्तानातील अहमदिया मुस्लीम कबरीतही सुरक्षित नाही, हे सिद्ध झाले. बलुची, पश्तूनी मुस्लिमांवर पाकिस्तानी सरकार, लष्कर आणि दहशतवाद्यांकडून होणार्‍या अन्यायाचीही कितीतरी प्रकरणे आहेत.

 

आपल्यावरील अत्याचारांची दाद मागण्यासाठी त्यांनी जगभरात निदर्शने केल्याचे, मदतीची, साह्याची मागणी केल्याचेही दिसते. परंतु, इमरान खान यांनी कधी आपल्या देशातील अल्पसंख्याकांच्या दमनावर एक शब्दही उच्चारला नाही. तेव्हा त्यांनी तोंडाला कुलूप लावले नि डोळ्यावर पट्टी बांधून कानात बोळे कोंबले. अशा विदूषकाने भारताची चिंता करू नये, भारत स्वतःच्या जनतेचे संरक्षण करायला सक्षम आहे. तसेच इमरान खान यांनी गुजरात दंगलीचा जो संदर्भ दिला, ती गोध्रा येथे साबरमती एक्सप्रेसमधील कारसेवकांचा डबा जाळल्याची प्रतिक्रिया होती. दिल्लीतही असे काही झाले असेल तर त्याचा क्रमही असाच असेल आणि क्रियेची प्रतिक्रिया उमटणारच.

 

आणखी एक मुद्दा म्हणजे आज भारतातील मुस्लिमांवर होणार्‍या कथित अन्यायावर बोलणार्‍या इमरान खान यांचे थोबाड चीनसमोर का बंद होते? चीनमध्येही उघूर मुस्लीम आहेत आणि तो देश तर त्यांच्यावर अनन्वित अत्याचार करताना दिसतो. उघूर मुस्लिमांना शिबिरांत डांबल्याचे, मशिदी-मदरसे बंद केल्याचे वृत्तही बाहेर येते, पण तेव्हा इमरान खान मला काही माहिती नाही, असे म्हणतात. त्या उघूर मुस्लिमांची इमरान खानना का कधी काळजी वाटत नाही? तीच गत सीपेक प्रकल्पाशी निगडित चिनी कामगारांना पाकिस्तानी मुली पुरवण्याची! इथेही इमरान खान यांना त्या मुलींबद्दल सहानुभूती वाटत नाही. म्यानमारमधून रोहिंग्या मुस्लिमांना हुसकावून लावले तर इमरान खान यांनी त्यांच्यासाठी पाकिस्तानच्या सीमा खुल्या केल्या नाहीत. मुस्लिमांबद्दल एवढाच कंठ दाटून येत असेल तर इमरान खान यांनी भारतातील मुस्लिमांवरील कथित अन्यायाचे भांडवल करू नये.
 
 
 

उलट इराण, इराक, सीरिया, लिबिया, चीन, म्यानमार वगैरे वगैरे देशांतील मुस्लिमांना पाकिस्तानात बोलावून घ्यावे. म्हणजे त्यांचे इस्लामप्रेमाचे उद्योगही व्यवस्थित चालतील. शेवटचा मुद्दा-दिल्लीतील दंगल कोणी भडकावली, कोणी चिथावणी दिली, हे तपास यंत्रणा शोधून काढतीलच आणि त्यात कोणीही दोषी आढळले तर त्यांचा धर्म कोणता हे न पाहता त्यांना शिक्षाही होईलच. कारण धर्माच्या नावावरून शिक्षा सुनावणारा देश भारत नाही, पाकिस्तानचे मात्र अस्तित्वच त्यावरून आहे. इमरान खान यांनी त्याची चिंता करावी.



Powered By Sangraha 9.0