दिल्ली हिंसाचार : आणखी एक मृतदेह नाल्यात

01 Mar 2020 16:34:05
Gokulpuri_1  H


मृतांचा आकडा ४३ वर


नवी दिल्ली : दिल्ली हिंसाचार प्रकरण थंडावले जरी असले तरीही आता हळूहळू नव्याने माहिती उघड होत आहे. उत्तर-पूर्व भागातून मृतदेह सापडू लागल्याने परिसरात तणाव आहे. रविवार, दि. १ मार्च रोजी गोकुलपुरी भागातून एक मृतदेह आढळला आहे.


मृतदेह नाल्यातून बाहेर काढल्यानंतर आता पोलीसांनी तपास सुरू केला आहे. या व्यक्तीचा मृत्यू हिंसाचारातच झाला आहे का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, यापूर्वी गुप्तचर विभागाचा अधिकारी अंकीत शर्मा याची ज्या प्रकारे हत्या करून मृतदेह नाल्यात फेकला होता, त्याच प्रमाणे हा प्रकार तर नाही ना, अशी शंकेची पाल स्थानिकांच्या मनात चुकचूकते आहे.


नाल्यातील मृतदेह सडल्यानंतर पसरलेल्या दुर्गंधीमुळे स्थानिकांनी तक्रार केली होती. शोध घेतल्यानंतर हा मृतदेह नाल्यात आढळला आहे. मृतदेह आढळल्यानंतर परिसरात मोठा तणाव निर्माण झाला. पोलीसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. दिल्ली हिंसाचारात आतापर्यंत १६७ तक्रारी दाखल झाल्या आहेत. एकूण ३६ खटले दाखल झाले असून ८८५ दिल्लीतील एका हिंसाचारात ४३ जणांचा मृत्यू झाला आहे.


Powered By Sangraha 9.0