स्वागत आणि अपेक्षा

09 Feb 2020 20:58:32


raj thackeray_1 &nbs



आम्ही म्हणू तेच खरे आणि केंद्र सरकार जे सांगते ते खोटे, या मानसिक विकृतीने बरबटलेल्या सीएएविरोधी आंदोलन-आंदोलक व बेताल शहाण्यांना त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर देण्याची आवश्यकता होतीच. तेच राज ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना तसेच त्यांच्या मोर्चात सहभागी झालेल्या प्रत्येकाने केल्याचे स्पष्ट होते.


केंद्र सरकारने १९५५ सालच्या नागरिकत्व कायद्यात केलेल्या सुधारणेला पाठिंबा देत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी मुंबईत भव्य मोर्चा काढला
. तथापि, राज ठाकरे यांच्या मोर्चाला पार्श्वभूमी होती ती नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात (सीएए) गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून देशभरात केल्या गेलेल्या हिंसक आंदोलनांची. जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ, अलीगढ मुस्लीम विद्यापीठ, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ ते आताच्या दिल्लीतील शाहीनबागेतील धरणे, या प्रत्येकवेळी आंदोलकांनी अराजकीय परिस्थिती निर्माण केली. तसेच या सगळ्याच जाळपोळ, दगडफेक आणि देशविघातक कारस्थानांना काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, कम्युनिस्ट पक्ष, आम आदमी पक्ष आणि तमाम विरोधकांचे समर्थन होतेच. ‘सीएए’मुळे सक्रिय झालेल्या तुकडे तुकडे गँगने या आंदोलनरूपी वळवळीला भरघोस पाठिंबा दिला आणि देशात फूट पाडण्याची खेळीही चालू केली.



पाकिस्तान
, बांगलादेश आणि अफगाणिस्तानातून भारतात येणार्‍या हिंदूंसह अन्य अल्पसंख्याकांनाच फक्त देशाचे नागरिकत्व का द्यायचे? मुस्लिमांचा त्यात समावेश का नाही? आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी पुस्तिकेच्या (एनआरसी) माध्यमातून इथल्या मुस्लीम-दलितांना देशाबाहेर घालवून देण्याचा कट असल्याचे म्हणत या लोकांनी काहूर माजवले. मनसेचा रविवारचा मोर्चा वरील सर्वच अफवांना, आंदोलनांना, मोर्चांना उत्तर आणि घुसखोरांना देश सोडण्यासाठीचा इशारा होता. सर्वप्रथम राज ठाकरे यांनी ‘सीएए-एनआरसी’ आणि घुसखोरांबाबत घेतलेल्या भूमिकेचे स्वागत आणि अभिनंदन! आम्ही म्हणू तेच खरे आणि केंद्र सरकार जे सांगते ते खोटे, या मानसिक विकृतीने बरबटलेल्या सीएएविरोधी आंदोलन-आंदोलक व बेताल शहाण्यांना त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर देण्याची आवश्यकता होतीच. तेच राज ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना तसेच त्यांच्या मोर्चात सहभागी झालेल्या प्रत्येकाने केल्याचे स्पष्ट होते.



राज ठाकरे यांनी आपल्या भाषणातून
, “नागरिकत्व कायद्याबद्दल माहिती नसणारेच त्याबद्दल का बोलतात?,” हा प्रश्न विचारला. त्यांचा मुद्दा योग्यच आहे, कारण सीएएविरोधी आंदोलनात सामील झालेल्या कित्येकांना आपण त्यात भाग का घेतला, याचेच पुरेसे ज्ञान नसल्याचे यापूर्वीच उघड झाले आहे. स्वतःला बुद्धीजीवी, विचारवंत आणि अभ्यासक म्हणवून घेणार्‍यांनी आपल्या स्वार्थासाठी त्यांना फितवून त्यात आणल्याचेही आढळले. विरोधाच्या बाजारात भीती विकणार्‍या अप्पलपोट्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी मुस्लिमांच्या डोक्यात विष कालवून कायदा-सुव्यवस्थेला आव्हान दिले. त्यावर टीका करतानाच राज ठाकरे यांनी पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानातील अल्पसंख्य हिंदू समाजाने धार्मिक अत्याचारामुळे भारतात येण्याचे समर्थन व तिकडच्या मुस्लिमांचा विरोध केला. वरील तीनही देशांत इस्लामी धर्मांध हिंदूंसह शीख वगैरे अल्पसंख्याकांच्या जीवावर उठल्याचे वृत्त नेहमीच समोर येत असते. परिणामी, त्यांना आपला देश सोडून भारतात येणे भागच, कारण भारत ही जगातल्या प्रत्येक हिंदूंची जन्मभूमी, मातृभूमी किंवा ‘होमलॅण्ड’.



आताच्या
‘सीएए’विरोधी आंदोलकांनी मात्र यालाच आक्षेप घेतला, पण त्यांच्या आक्षेपाला देशभरातल्या हिंदूंनीही हिंदू म्हणून विरोध करणे गरजेचे होते. आपापल्या जाती-पंथ वगैरे ओळखी बाजूला ठेऊन हिंदू म्हणून एक होऊन शेजारील देशातल्या आपल्याच धर्मबांधवांना खंबीर साथ देणे आवश्यक होते. राज ठाकरे यांनी आपल्या मोर्चाच्या माध्यमातून तेच केले. देशात सीएएला जोडून एनआरसीचा विरोधही मोठ्या प्रमाणावर होताना दिसतो. केंद्रीय गृहमंत्रालयाने सध्यातरी देशभरात एनआरसी राबवणार नसल्याचे स्पष्ट केले असले, तरी ती कधीतरी अमलात आणावीच लागणार आहे. कारण, पाकिस्तान आणि बांगलादेशातून घुसखोरी करणार्‍यांनी देशातल्या कितीतरी ठिकाणी समस्या, संकटे, अडचणी निर्माण करून ठेवल्या आहेत. आपल्या देशात जे जगण्याला मोताद झाले होते, ते भारतात घुसखोरी करून, इथलेच अन्न खाऊन दादागिरी, गुंडगिरी आणि दहशतवाद्यांसाठी स्लीपर सेल म्हणून काम करतानाही आढळतात. म्हणूनच भारतात घुसलेल्या अशा सर्वच बेकायदेशीर घुसखोरांना पिटाळून लावण्याची निकड आहे. भारत धर्मशाळा नाही, एकतर आपल्या देशात जा किंवा तुरुंगात पडा, असे त्यांना ठणकावून सांगितलेच पाहिजे.



तसेच कोणी मानवाधिकाराच्या नावाने बोंबा ठोकल्या तर माणुसकीचा ठेका भारताने घेतला नसल्याचे सुनावणेही अत्यावश्यकच
. एनआरसी हा या सगळ्या साफसफाईसाठी समर्थ उपाय आणि राज ठाकरे यांनी त्यालाही पाठिंब्याची भूमिका घेतली, हे बरेच झाले. राज ठाकरे यांनी सरतेशेवटी दगडाला दगडाने आणि तलवारीला तलवारीने उत्तर देण्याची भाषा केली. तथापि, राज ठाकरेंच्या बोलण्याचा जसाच्या तसा किंवा शाब्दिक अर्थ न घेता त्यातला मथितार्थ पाहायला हवा. ‘सीएए’ वा ‘एनआरसी’वरून कोणी विशिष्ट समुदायाला चिथावणी देत असेल, त्यांच्या भावना भडकावत असेल तर आम्ही शांत बसणार नाही, त्याला आम्हीही हिंदू म्हणून, एक देशप्रेमी म्हणून जशास तसे उत्तर देऊ आणि खोटारड्या आंदोलनांचा पर्दाफाश करू, त्यांना उघडे पाडू, हा त्यातला आशय आहे. दरम्यान, राज ठाकरे यांचा मोर्चा आणि भाषण हिंदुत्ववाद्यांच्या आणि राष्ट्रभक्तांच्या एकदेशीय म्हणून अपेक्षा उंचावणारे असल्याचेही दिसते.



हिंदुत्वाला केंद्रीभूत मानून राजकारण करणार्‍यांनी नेहमी राष्ट्रहिताला प्राधान्य दिले
. आपल्या विचारांना तिलांजली देऊन फुकट काही मिळत असेल तर ते घेण्याची इच्छा त्यांनी कधीही बाळगली नाही. ‘हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व’ या भावनेने ही सर्वच मंडळी देशहिताची भूमिका घेणार्‍यांच्या मागे खंबीरपणे उभी राहत आली. आजच्या मोर्चातही केवळ मनसे कार्यकर्तेच नव्हे तर समाजमाध्यमांवरील पोस्टस जर बघितल्या तर मी हिंदू म्हणून, मी राष्ट्रभक्त म्हणून सामील होत असल्याचे सांगणारीही कितीतरी उदाहरणे दिसतील. ते का? कारण त्या सर्वांनाच राज ठाकरे आणि मनसेकडून अपेक्षा आहेत, त्या कसल्या? तर हिंदुत्वाचा, राष्ट्रीयत्वाचा पुकारा करणारे, विरोधकांच्या आरे ला कारे करणारे नेतृत्व आपल्यापुढे असावे, या. राज ठाकरे यांनी आपल्या मोर्चा व भाषणातून आपण त्याच दिशेने पावले उचलत असल्याचे तर दाखवून दिले. मात्र, आगामी काळात राज ठाकरे यांनी आपल्या भूमिकेत सातत्य राखले तरच त्यांच्याकडून अपेक्षा ठेवणार्‍यांना त्यांनी न्याय दिल्यासारखे होईल.

Powered By Sangraha 9.0