रुपेरी पडद्यावर अवतरणार उज्ज्वल निकम यांचा जीवनप्रवास!

    दिनांक  08-Feb-2020 17:31:12
ujjwal nikam_1  
सुप्रसिद्ध सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या जीवनावर तयार होणार चित्रपटमुंबई :
२६/११च्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी कसाबसह ३७ गुन्हेगारांना फासापर्यंत पोहोचवणारे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा जीवनप्रवास आता प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर बघायला मिळणार आहे. ‘ओ माय गॉड’, ‘१०२ नॉट आऊट’ या चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे उमेश शुक्ला उज्ज्वल निकम यांचा बायोपिक घेऊन येत आहेत. या चित्रपटाचे नाव ‘निकम’ असे असणारआहे. लवकरच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे.


ही कथा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेता लेखक भावेश मंडलिया आणि गैरव शुक्ला यांनी लिहिली आहे. तर उमेश शुक्ला, सेजल शाह, आशिष वाघ, गौरव शुक्ला आणि भावेश मंडलिया चित्रपटाचे निर्माते आहेत. बायोपिकविषयी उज्ज्वल निकम म्हणाले, “माझ्यावर पुस्तक आणि चित्रपट तयार करण्यासाठी काही वर्षांपासून अनेकजण मागे लागले आहेत. यासाठी माझी बिलकूल इच्छा नव्हती. कारण माझ्यावर अनेक पीडित लोकांची मोठी जबाबदारी आहे. पण प्रतिभाशाली टीमसोबत भेट झाल्यावर मी या चित्रपटासाठी तयार झालो. मला विश्वास आहे की, माझी कथा व्यवस्थित या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर मांडली जाईल.” उज्ज्वल निकम यांनी आपल्या ३० वर्षांच्या करिअरमध्ये ६२८ आरोपींना जन्मठेप आणि ३७ आरोपींना फाशीची शिक्षा दिली आहे. त्यांना दहशतवादी प्रकरणातील मास्टर समजले जाते. बऱ्याचदा निकम यांना अंडरवर्ल्ड आणि दहशतवाद्यांकडून धमकी मिळालेली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने त्यांना झेड प्लस सुरक्षा दिली आहे. अशी सुरक्षा मिळणारे निकम हे देशातील एकमेव वकील आहेत.