
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या 'अकॅडमी ऑफ थिएटर आर्टस्' विभागाचा बहुप्रतिक्षित 'राष्ट्रीय वसंत नाट्योत्सव' ०८ फेब्रुवारी पासून सुरू होत आहे. दर्जेदार नाट्यप्रशिक्षण देणारा 'अकॅडमी ऑफ थिएटर आर्टस्' हा पदव्युत्तर पदवी विभाग दरवर्षी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील नाटकांचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा म्हणून देशभरातील नामांकित नाट्यदिग्दर्शकांच्या वैविध्यपूर्ण व आशयसंपन्न नाटकांचा नाट्योत्सव आयोजित करत आला आहे. यंदाचे या नाट्यसोहळ्याचे १२ वे वर्ष आहे. ८ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी दरम्यान होणार हा नाट्यसोहळा नाट्यरसिकांसाठी मोठी पर्वणीच आहे.
नाट्योत्सवाचे उद्घाटन शनिवारी ८ फेब्रुवारीला सायं. ६.३० वा. सुप्रसिध्द अभिनेत्री व दिग्दर्शिका नादिरा जहीर बब्बर यांच्या हस्ते होईल. या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यापीठाचे मा. कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर असतील. या प्रसंगी प्र-कुलगुरू मा. डॉ. रविंद्र कुलकर्णी, प्र. कुलसचिव मा. डॉ. अजय देशमुख आणि मा. डॉ. रश्मी ओझा विशेष अतिथी म्हणून उपस्थिती राहतील. महोत्सवाचा शुभारंभ अभिराम भडकमकर लिखित व प्रसाद वनारसे दिग्दर्शित द्वितीय वर्ष नाट्यशास्त्र विभागाचे विद्यार्थी प्रस्तुत 'अपलक-निद्राहीन' (हिंदी) या अकॅडमीच्या नाटकाने होणार आहे.
यावर्षी संगीत नाटक अकादमी, नवी दिल्ली, पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, उदयपूर आणि दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूर यांच्या सहकार्याने वसंत नाट्योत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. भारतातील विविध राज्यातील नाट्यसंस्था नाट्यप्रयोगाचे सादरीकरण करणार आहेत. विशेषत बिहार, मणिपूर, मध्यप्रदेश आणि कोलकता यांच्यासह महाराष्ट्रातले नावाजलेले नाट्य दिग्दर्शक, नाट्यसंस्था व नाट्यप्रशिक्षण विभागाचे रंगकर्मी आपल्या गाजलेल्या नाटकांच्या सहभागाने '१२वा राष्ट्रीय वसंत नाट्योत्सवा'त सहभागी होणार आहेत. मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसरात हा महोत्सव रंगणार आहे. या नाट्य महोत्सवात विविध राज्यातील व विविध भाषेतील एकूण ११ नाटकांचा समावेश आहे. या नाट्यसोहळ्यास नाट्यरसिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून या सोहळ्याचा भाग व्हावा असे आवाहन नाट्यशास्त्र विभागाचे प्रभारी संचालक डॉ. गणेश चंदनशिवे व १२ व्या नाट्योत्सवाचे निमंत्रक प्रा. मंगेश बनसोड यांनी केले.