बालाकोट अजूनही सक्रिय? दहशतवादी भारतावर हल्ल्याच्या तयारीत

07 Feb 2020 12:42:35

balakot_1  H x
 
नवी दिल्ली : भारताने २६ फेब्रवारी २०१९ रोजी पाकिस्तानच्या बालाकोट दहशतवादी तळांवर हल्ला करत दहशतवाद्यांचे कंबरडे मोडले होते. भारताच्या वायूसेनेने येथील दहशतवादी तळांवर हवाई हल्ले करून उद्धवस्त केले होते. आता या घटनेला एक वर्ष पूर्ण होतील. परंतु, काही महिने शांत राहिल्यानंतर पुन्हा एकदा बालाकोट तळांवर दहशतवाद्यांचे प्रशिक्षण सुरु झाल्याची माहिती समोर आली आहे. या तळांवर २७ दहशतवाद्यांचा एक गट प्रशिक्षण घेऊन तयार असून तो भारतात दहशतवादी हल्ले घडवून आणू शकतो अशी शक्यता गुप्तचर सूत्रांनी व्यक्त केली आहे. तसेच, येथे होत असलेल्या हालचालींची माहिती भारतीय सुरक्षा यंत्रणांकडे असून कुठल्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी लष्कर सज्ज असल्याचे भारतीय सैन्याकडून सांगितले जात आहे.
 
 
 
वर्षभरापूर्वी भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये २०० ते ३०० दहशतवादी मारले गेल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. पाकव्याप्त काश्मीरमध्ये बालाकोट असून तिथल्या पर्वतांवर जैश ए मोहम्मद तर्फे हे प्रशिक्षणतळ चालवले जात होते. पुलवामा हल्ल्यानंतर भारताने धाडसी कारवाई करत हे तळ उद्धवस्त केले होते. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला होता. या कारवाईनंतर काही महिने शांत राहिल्यानंतर पाकिस्तानने पुन्हा हे तळ सुरू केल्याची माहितीही सुरक्षा यंत्रणांकडे होती. जैश ए मोहम्मदचा मोऱ्हक्या मौलाना मसुद अजहर याचा पुतण्या युसूफ अजहर हा हे ट्रेनिंग कॅम्प सांभाळत असून त्यानेच २७ दहशतवाद्यांना ट्रेनिंग दिले आहे असे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
Powered By Sangraha 9.0