
मुंबई : वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील जळीत प्रकरणातील पीडित तरुणीच्या उपचारांचा खर्च उचलण्याची तयारी उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी दाखवली आहे. 'पीडित तरुणीला वा तिच्या कुटुंबीयांना कुणी ओळखत असतील तर कृपया त्यांची माहिती मला द्या,' असे आवाहन आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्विटरवरून केले आहे.
ते ट्विटमध्ये म्हणतात, 'ही क्रूरता कल्पनेच्या पलीकडची आहे. एक आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. वर्तमानपत्रात या संदर्भातील बातमी वाचून सहज पान उलटणे ही त्यापेक्षाही मोठी क्रूरता आहे. तिचे कुटुंब तिच्या उपचारांचा खर्च कसा भागवत असेल, हा प्रश्न मला पडला आहे. कुणालाही या तरुणीबद्दल वा तिच्या कुटुंबीयांबद्दल काही माहिती असेल तर कृपया मला कळवा. मला केवळ वर्तमानपत्राचे पान उलटून पुढे जायचे नाही,' असे ट्विट महिंद्रा यांनी केले आहे.
काही दिवसांपूर्वी हिंगणघाट येथे एकतर्फी प्रेमातून शिक्षक तरुणीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिले होते. पीडित तरुणी कॉलेजच्या दिशेने जात असताना नगराळे याने हल्ला केला होता. त्यात ही तरुणी बरीच भाजली आहे. तिच्यावर सध्या नागपूर येथील ऑरेंज सिटी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तज्ज्ञ डॉक्टरांची टीम तिच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी म्हणून शर्थीचे प्रयत्न करत आहे. या घटनेमुळे राज्यभरात संताप आहे. पीडित तरुणीच्या प्रकृतीसाठी ठिकठिकाणी प्रार्थना होत असून आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा देण्यात यावी
, अशी मागणी होत आहे. त्यासाठी मोर्चे, निदर्शने सुरू आहेत. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पीडितेवर अद्यावत रुग्णालयात उपचार करावे अशी मागणी राज्य सरकारकडे केली होती. याच पार्श्वभूमीवर उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी हिंगणघाट घटनेवर भाष्य केले.