मुंबई : वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील जळीत प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवला जाणार असून ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. उज्ज्वल निकम हे सरकारच्या वतीने पीडितेची बाजू मांडणार आहेत. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज ही माहिती दिली.
हिंगणघाट येथील जळीत प्रकरणाच्या विरोधात राज्यभरात संताप आहे. पीडित तरुणीच्या प्रकृतीसाठी ठिकठिकाणी प्रार्थना होत असतानाच आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी होत आहे. त्यासाठी मोर्चे, निदर्शनं सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करत म्हंटले की, 'हिंगणघाटमधील जळीत प्रकरणाचा खटला लवकरात लवकर निकाली काढण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यासाठी हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टाकडे दिला जाईल. या खटल्यात पीडितेची बाजू मांडण्यासाठी सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली जाईल, असे गृहमंत्र्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. त्याशिवाय, पीडित तरुणीचा खटल्याचा संपूर्ण खर्च राज्य सरकार करेल,' असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.