वर्धात निषेध मोर्चा : आरोपीला आमच्या हवाली करा अशी मागणी

    दिनांक  06-Feb-2020 13:19:45

wardha_1  H x W

वर्धामधील मोर्चामध्ये शेकडो महिलांचा समावेश

वर्धा : हिंगणघाट येथे शिक्षेकेला भर रस्त्यात पेटवून दिले. तसेच, औरंगाबादमधील सिल्लोड येथेदेखील महिलेला जाळण्याचा प्रकार घडला. यामध्ये तिचा बुधवारी रात्री मृत्यू झाला. यासर्वांचा निषेध म्हणून वर्धामध्ये बंद पुकारला आहे. तसेच वायगाव या गावातून शेकडो महिला, तरुण-तरुणींनी निषेध मोर्चा काढला. यामध्ये पीडितेला योग्य न्याय मिळावा यासाठी मागणी करण्यात आली. तसेच, नेहमी आम्हीच का जळायचे? आमच्या बहिणी सुरक्षित आहेत का? अशा प्रकारचे पोस्टर घेऊन महिलांनी निषेध व्यक्त केला.
 
सकाळी ११ वाजल्यापासून हा मोर्चा निघाला. यावेळी महिलांनी त्या आरोपीला आमच्या हातात द्या, आम्ही त्याला धडा शिकवू अशा संतप्त भावना व्यक्त केल्या. यावेळी पालकांनीही या मोर्चामध्ये सहभाग घेतला. अंधारी येथे पेटवण्यात आलेल्या महिलेचा रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तिच्यावर शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. ही महिला आगीमध्ये ९५ टक्के भाजली होती. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी संतोष सखाराम मोहिते याला अटक केली आहे. तसेच, हिंगणघाटमधील तरुणीची प्रकृती स्थिर असली तरी अजूनही चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.