‘महाभियोगा’तून ट्रम्प यांची सुटका

06 Feb 2020 12:00:28
trump_1  H x W:







सत्तेचा दुरुपयोग केल्याचा आरोप सिनेटकडून फेटाळण्यात आला
 
 
वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची महाभियोगाच्या प्रक्रियेतून सुटका झाली आहे. त्यांना पदावरुन दूर करण्याची प्रक्रिया काल सिनेटच्या निर्णयानंतर संपुष्टात आली. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पार्टीचे सिनेटमध्ये बहुमत आहे. ट्रम्प यांच्यावर असलेला सत्तेचा दुरुपयोग केल्याचा आरोप ५२ विरुद्ध ४८ मतांनी, तर काँग्रेसचे काम स्थगित केल्याचा आरोप ५३ विरुद्ध ४७ मतांनी फेटाळण्यात आला.


संभाव्य विरोधी उमेदवाराची बदनामी करण्यासाठी युक्रेनवर दबाव आणल्याला ट्रम्प यांच्यावर आरोप होता. हा आरोप डेमोक्रॅट खासदारांनी ठेवला होता. अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका नोव्हेंबरमध्ये होणार आहेत. बुधवारी सिनेटमध्ये झालेल्या मतदानात राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना पदावरुन दूर करू नये असा कौल मिळाला.


युक्रेन संबंधांमध्ये त्यांनी आपल्या बळाचा दुरुपयोग केला असा आरोप त्यांच्यावर होता. ट्रम्प यांच्यावरचा कोणताही आरोप सिद्ध झाला असता तर त्यांना आपला कार्यभार उपराष्ट्रपती माइक स्पेन्स यांच्याकडे सोपवावा लागला असता.


डेमोक्रॅट पक्षाचे बहुमत असलेल्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हजनी १८ डिसेंबर रोजी महाभियोगाला मंजुरी दिली होती. दुसऱ्यांदा निवडणूक लढवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या ट्रम्प यांनी आपल्यावरचे आरोप नेहमीच फेटाळले होते. त्यांच्या निवडणूक कार्यालयाने जाहीर केलेल्या एका पत्रकामध्ये 'राष्ट्रपती ट्रम्प पूर्णपणे यातून बाहेर आले आहेत आता त्यांना अमेरिकन नागरिकांची पुन्हा सेवा करण्यासाठी वेळ उपलब्ध आहे,' असे म्हंटले आहे.


'ट्रम्प यांना पराभूत करता येणार नाही हे रिकामटेकड्या डेमोक्रॅट्सना माहित असल्यामुळेच ते ट्रम्प यांना अशापद्धतीने पदच्युत करण्यासाठी महाभियोगाचा प्रस्ताव आणला गेला. ही एक अवघड परीक्षा होती आणि डेमोक्रॅट पक्षाची ही एक निरर्थक निवडणूक मोहीम होती. महाभियोगाचे हे नाटक अमेरिकेच्या राजकीय इतिहासातील एक वाईट घटना ठरेल,’ असेही त्यात म्हटले आहे.


ट्रम्प यावर गुरुवारी प्रतिक्रिया देणार आहेत. गॅलप संस्थेने जाहीर केलेल्या अहवालात या आठवड्यामध्ये अमेरिकन मतदारांचा कौल सर्वांत जास्त ट्रम्प यांना आहे. त्यांना राष्ट्राध्यक्ष म्हणून स्वीकारण्याचा दर ४९ टक्के इतका झाला आहे.
Powered By Sangraha 9.0