‘टाईमलेस पंकज उधास’मधून साजरी होणार सांगीतिक प्रवासाची ‘चाळीशी’!

    दिनांक  06-Feb-2020 16:05:00
pankaj udhas_1  
मैफिलीतून उलगडणार संगीतामय प्रवास


मुंबई : प्रख्यात गझल गायक पंकज उधास यांनी २०२०मध्ये त्यांच्या सांगीतिक प्रवासाची ४० वर्षे पूर्ण केली आहेत. गेली चार दशके ते रसिकांना गझलांनी आणि कवितांनी आनंद देत आले आहेत. त्यांचा हा प्रवास साजरा करण्यासाठी पद्मश्री पुरस्काराने गौरविल्या गेलेल्या या गायकाच्या सन्मानार्थ ‘टाईमलेस पंकज उधास’ या लाईव्ह कार्यक्रमाचे आयोजन केले गेले आहे. शनिवारी १५ फेब्रुवारी २०२० रोजी वरळी येथील नेहरू सेंटर सभागृहात सायंकाळी ७ वाजता ही मैफल रंगणार आहे.


‘टाईमलेस पंकज उधास’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून अत्यंत ख्यातकीर्त असा हा गायक श्रोत्यांना त्यांच्या ४० वर्षांच्या प्रवासातील गाण्यांची झलक दाखविणार आहे. त्यासाठी दृक-श्राव्य सादरीकरण करण्यात येणार असून त्या जोडीला अनेक किस्से आणि आत्तापर्यंत माहित नसलेल्या अनेक गोष्टी ऐकण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. स्वतः उधास त्या ऐकवणार आहेत. या प्रवासामध्ये ते त्यांच्या हृदयाला स्पर्श करणाऱ्या, रोमँटीक आणि काळातीत गझला सादर करणार आहेत. त्यांत ‘चांदी जैसा रंग है तेरा..’, ‘चिट्ठी आयी है...’, ‘और आहिस्ता किजीये बाते...’, ‘जिये तो जिये...’, ‘ना कजरे कि धार...’, ‘चुपके चुपके’ आणि इतरही अनेक गाजलेल्या गझलांचा समावेश असेल. हा कार्यक्रम म्हणजे संगीतप्रेमींसाठी एक पर्वणी असणार आहे. या कार्यक्रमात रसिक त्यांच्या फर्माईशी नोंदवू शकतात आणि त्या उधास यांच्याकडून पूर्ण केल्या जाणार आहेत. हेच या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य आहे.


“मला अजूनही पटत नाही की मी माझ्या गायन कारकिर्दीची ४० वर्षे पूर्ण केली आहेत. मला माझा पहिला अल्बम ‘आहट’ कल-परवा ध्वनिमुद्रीत केल्यासारखे वाटते. हा माझा प्रवास खूप घटनांनी भरलेला आहे, पण जगभरातील संगीतप्रेमींनी जे बिनशर्त प्रेम मला दिले त्यामुळे हा प्रवास सुखाचा झाला आहे. माझ्या कारकीर्दीमध्ये ज्यांनी हातभार लावला आणि माझ्या यशामध्ये आपले योगदान दिले त्या सर्वांचा मी आभारी आहे. सर्व संगीतकार, कवी, तंत्रज्ञ, ऑडीओ कंपन्या, प्रिंट आणि इलेक्ट्रॉनीक माध्यमे आणि सर्वात म्हणजे माझ्यावर प्रेम करणारे रसिक या सर्वांचाच मी आभारी आहे. त्यांच्याकडे एकच मागणी आहे की, तुमचे हे प्रेम माझ्यावर असेच बरसत ठेवा आणि मला कारकिर्दीची ५० वर्षे पूर्ण करण्याची शक्ती मिळावी यासाठी प्रार्थना करा व आशीर्वाद द्या,” असे उद्गार गझल गायक पंकज उधास यांनी काढले.


पंकज उधास यांच्याकडे गझल लोकप्रिय करण्याचे श्रेय जाते. हा प्रकार लुप्त होत असताना त्यांनी हे कार्य यशस्वीपणे पार पाडले आहे. आज उच्चरवातील संगीताचा जमाना असतानाही संगीत रसिकांमध्ये गझलची जादू जगभरात कायम ठेवण्याचे काम त्यांनी केले आहे. शिवाय संगीत कोणत्याही वाद्यातून येणारे नसून ते कलाकाराच्या आत्म्यातून बाहेर पडते, हे त्यांनी सिद्ध केले.


‘चिट्ठी आई है’ या ‘नाम’ चित्रपटातील गाण्याने १९८६ साली त्यांना प्रसिद्धी मिळवून दिली. एका रात्रीत त्यांना राष्ट्रीय स्तरावरील लोकप्रियता मिळाली. या हिट गाण्यानंतर त्यांनी बॉलीवूडमध्ये अनेक लोकप्रिय गाणी गायली आणि ती अनंत काळापर्यंत रसिकांच्या मनावर गारुड करून राहतील.


भारतातील गझलगायन क्षेत्रातील ते महत्वाचे आधारस्तंभ मानले जातात. त्यांनी या संगीतप्रकाराला एक वेगळी शैली मिळवून दिली. त्यांनी आणि त्यांच्याबरोबरच्या कलाकारांनी भारतात गझलगायनाला एक नवसंजीवनी मिळवून दिली. त्यांनी कित्येक अल्बम आणि गाणी ध्वनिमुद्रित केली आहेत आणि आज त्यांना भारतातील एक महान गझलगायक मानले जाते.