नवीन ‘कोरोना’ विषाणू : प्रतिबंध आणि नियंत्रण

06 Feb 2020 21:05:11


corona virus _1 &nbs


चीनमधील ‘कोरोना’ विषाणूमुळे मृत्युमुखी पडणार्‍यांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला असून ही बाब निश्चितच चिंताजनक आहे. तेव्हा, नेमका काय आहे हा विषाणू आणि त्यावरील प्रतिबंध, नियंत्रण याची माहिती देणारा हा लेख...



‘कोरोना’ विषाणूचे कुळ मोठे असून प्रामुख्याने हा विषाणू प्राण्यांमध्ये आढळतो. काही कोरोना विषाणू प्राण्यांकडून माणसांकडे संक्रमित होतात. या विषाणूच्या संसर्गाने साधी सर्दी ते गंभीर, तीव्र, घातक आजार माणसांमध्ये उद्भवतो. काही वर्षांपूर्वी ‘मिडल ईस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम’ (मर्स) आणि ‘सीव्हीअर अ‍ॅक्युट रेस्पिरेटरी सिंड्रोम’ (सार्स) या दोन ‘कोरोना’ विषाणूजन्य आजारांची साथ उद्भवली होती. सध्या चीनमध्ये उद्भवलेल्या साथीस कारणीभूत ठरलेला नवा (नोव्हेल कोरोना विषाणू २०१९) ‘कोरोना’ विषाणू आणि ‘सार्स’ व ‘मर्स’चा विषाणू ‘कोरोना’ परिवारातील आहेत. ‘कोरोना’ विषाणूच्या संसर्गामध्ये श्वसनसंस्थेसंबंधी सौम्य ते तीव्र स्वरूपाची लक्षणे, चिन्हे आणि गुंतागुंती उद्भवतात. त्यामध्ये श्वास घेण्यास त्रास होणे, ताप, सर्दी, खोकला ते अतिगंभीर फुफ्फुसदाह, अतिसार, मूत्रपिंड निकामी होणे, ‘अ‍ॅक्युट रेस्पिरेटरी सिंड्रोम’ आणि शेवटी मृत्यू अशा समस्या उद्भवतात. वृद्ध माणसे, मुले आणि ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे, अशांना संसर्ग होण्याचा धोका अधिक संभवतो. सध्या चीनमध्ये ज्या ‘कोरोना’ विषाणूच्या रोगाची साथ उद्भवली आहे, तो प्रकार माणसांमध्ये पूर्वी कधी आढळला नव्हता. या विषाणूची जनुकीय रचनादेखील पूर्णपणे नवीन आहे. म्हणून या विषाणूला ‘नोव्हेल (नवीन) कोरोना विषाणू’ नाव दिले आहे. पर्यावरणीय असमतोल, जागतिकीकरण, दळणवळण, बदलती जीवनशैली इत्यादी कारणे अशा विषाणूजन्य संसर्गाच्या उद्रेकास कारणीभूत ठरत आहेत.



चीनमधील नवीन
‘कोरोना’ विषाणू प्राण्यांकडून माणसांकडे संक्रमित झाला असावा, असा अंदाज बांधण्यात आला. नंतर हा विषाणू माणसांकडून माणसांकडे पसरला, असे शास्त्रज्ञांचे मत आहे. असाच प्रसार ‘मर्स’ आणि ‘सार्स’च्या बाबतीत झाला होता. ३१ डिसेंबर, २०१९ रोजी मध्य चीनमधील ‘वुहान’ शहरात पहिल्यांदा या विषाणूने बाधित फुफ्फुसदाहचा रुग्ण आढळला आणि सर्वत्र भीती पसरली, सुरुवातीला मासे आणि मांस विकण्यात येणार्‍या अस्वच्छ फूड मार्केटशी या संसर्गाचा संबंध जोडला गेला. मार्केटमध्ये विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या मांसाशी संपर्क आल्याने अथवा त्याच्या सेवनाने संसर्ग पसरला, असे मानले गेले. त्यामुळे मार्केट बंद करण्यात आले. परंतु, नंतर सदर संसर्गजन्य आजाराचे अनेक रुग्ण आसपासच्या भागात आढळले. त्यातले अनेकजण या मार्केटमध्ये खरेदी करण्यासाठी आले नव्हते. त्यामुळे वरील फूड मार्केटशी सदर संसर्गाचा संबंध नाही, असे लक्षात आले. हा संसर्ग माणसांकडून माणसांकडे पसरत नाही, असे सुरुवातीला वाटले. परंतु, नंतर नंतर हा संसर्ग संसर्गग्रस्त माणसांकडून माणसांकडे पसरत असल्याचे लक्षात आले. दरम्यान, थायलंड, जपान, अमेरिका, दक्षिण कोरिया इत्यादी देशांमध्येदेखील या आजाराचे रुग्ण आढळले. ‘कोरोना’ विषाणू प्राणीजन्य आजार असला तरी नवीन विषाणू नक्की कोणत्या प्राण्याच्या संपर्कापासून पसरतो, याबद्दल निश्चित माहिती उपलब्ध नाही. याबाबत संशोधन सुरू आहे.



पुढे खोकणे
, शिंकणे, रुग्णाशी संपर्क, संसर्गबाधित वस्तूंना स्पर्श इत्यादी मार्गांनी सदर संसर्ग पसरतो, असे माहिती झाले. या आजाराचे चीनमध्ये अनेक रुग्ण आढळले, त्यातले काही दगावले. संसर्ग रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न होऊ लागले. आजारासंबंधी आरोग्य शिक्षण, पर्यावरणीय स्वच्छता, वैयक्तिक काळजी आणि जबाबदारी, आजाराचे त्वरित निदान आणि उपचार इत्यादी उपाययोजना प्रभावीपणे देशोदेशी राबविण्यात येत आहेत. संसर्ग भारतात पसरू नये म्हणून आंतरराष्ट्रीय विमानतळांवर बाधित देशांमधून येणार्‍या प्रवाशांचे ‘स्क्रिनिंग’ जातीने केले जात आहे. अशा प्रवाशांमधून आढळलेल्या संशयित रुग्णांचा व त्यांच्या निकट सहवासितांचा पाठपुरावा आणि आवश्यक कार्यवाही एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रमांतर्गत केली जात आहे. या विषाणूजन्य आजाराच्या निदानाची सोय पुणे येथील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत उपलब्ध आहे.



सदर नवीन
‘कोरोना’ विषाणूंचा प्रादुर्भाव आपल्या देशात केरळमध्ये आढळला असून आतापर्यंत दोन रुग्णांची नोंद झाली आहे. साथ रोखण्यासाठी सर्वेक्षण, आरोग्य शिक्षण, निदान आणि उपचार व्यवस्था सक्षम बनवण्यात आली आहे. सर्वेक्षणासाठी सर्व स्तरावरील सार्वजनिक आरोग्य संस्था, खाजगी वैद्यकीय व्यावसायिक, समाजसेवक आणि समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींची मदत घेण्यात येत आहे. वर उल्लेख केल्याप्रमाणे प्रयोगशाळा निदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. संसर्गाचा प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी लोकांना आरोग्य शिक्षण, वैयक्तिक स्वच्छता, जैव-वैद्यकीय कचर्‍याची सुयोग्य पद्धतीने विल्हेवाट, तसेच रुग्णालयांची तयारी, विलगीकरण कक्ष, गंभीर रुग्णांसाठी व्हेंटिलेटर आणि जीवनावश्यक प्रणाली सुविधा सक्षमपणे कार्यरत राहतील, याची दक्षता घेण्यात येत आहे. रुग्णांनी आणि नातेवाईकांनी घ्यावयाची काळजी याबाबत जनतेचे प्रबोधन होण्यासाठी ‘आरोग्य शिक्षण’ कार्यक्रम राबविण्यात येत आहे.



नवीन
‘कोरोना’ विषाणूकरिता प्रतिबंधात्मक लस अथवा विशिष्ट प्रतिविषाणू औषध उपलब्ध नाही. लक्षणांवर आधारित उपचार आणि गुंतागुंतीचे योग्य व्यवस्थापन इथे फार महत्त्वाचे आहे. सदर विषाणूचा उद्रेक कसा झाला आणि त्याचा प्रसार कसा होतो, यासंबंधी अपुरी माहिती उपलब्ध असल्याने, या संदर्भात ठराविक प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवणे कठीण असले तरी सर्वसाधारणपणे आजाराचे स्वरूप लक्षात घेता आजार होऊ नये म्हणून रुग्णांशी निकट सहवास टाळणे, हातांची नियमित स्वच्छता, कच्चे अथवा अपुरे शिजवलेले मांस न खाणे, फळे व भाज्या धुवून खाणे, खोकताना व शिंकताना नाका-तोंडावर रुमाल धरणे इत्यादी प्रतिबंधात्मक खबरदारी घेणे आवश्यक आहे. श्वसनसंस्थेसंबंधी लक्षणे असलेल्या, संसर्गग्रस्त देशांमधून आलेल्या तसेच रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्या आजारी व्यक्ती आणि ज्यांनी नुकताच नवीन ‘कोरोना’ विषाणूबाधित देशात प्रवास केला आहे, अशा व्यक्तींनी विनाविलंब वैद्यकीय सल्ला घ्यायला हवा. गंभीर आजार असणार्‍या रुग्णांना रुग्णालयात भरती करून योग्य उपचार मिळण्यासाठी व्यवस्था करायला हवी. रुग्णांना उपचार देणार्‍या डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर आरोग्य कर्मचार्‍यांना सदर आजाराचा प्रादुर्भाव होऊ शकतो. म्हणून संबंधितांनी काळजी घ्यायला हवी. अशाप्रकारे ‘कोरोना’विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक आणि नियंत्रणात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबवणे गरजेचे आहे.



जागतिक आरोग्य संघटना’ आणि ‘सीडीसी’ नवीन ‘कोरोना’ विषाणू साथीच्या स्थितीवर नजर ठेवून आहेत. या दोन संस्थांची भूमिका साथ आटोक्यात आणण्याकामी फार महत्त्वाची आहे. सदर साथ वेगाने पसरते. असे असले तरी, यामध्ये मृत्यूचे प्रमाण कमी असते. साथीवर नियंत्रण प्राप्त करण्यासाठी योजलेल्या उपाययोजनांमध्ये सामाजिक सहभागाची फार गरज आहे. सदर विषाणूसंसर्ग ’जागतिक आरोग्य आणीबाणी’म्हणून घोषित झाली आहे. तिची तीव्रता वाढू नये म्हणून खबरदारी घ्यायला हवी.

- डॉ. रवींद्र गुरव

Powered By Sangraha 9.0