
मुंबई : दि. २७ फेब्रुवारी रोजी ‘मराठी भाषादिना’निमित्त शिवसेनाप्रणित स्थानिय लोकाधिकार समिती महासंघाकडून मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिर येथे आयोजित करण्यात आलेला ‘अथांग सावरकर’ हा कार्यक्रम अचानक रद्द करण्यात आला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांवर आधारित ‘अथांग सावरकर’ हा कार्यक्रम मनोरंजन होत नाही म्हणून रद्द करण्यात आला असल्याची सबब देणारे पत्र महासंघाने अभिनेते शरद पोंक्षे यांना पाठवले आहे.
महासंघाने लिहिलेल्या पत्रात म्हटले की, “दि. २७ फेब्रुवारी रोजी ’मराठी भाषा दिवसाच्या’ कार्यक्रमासंबंधी समिती महासंघाच्या कार्यकारिणी बैठकीत सर्वच सदस्यांनी यंदाच्या वर्षी भाषा दिवसाच्या निमित्ताने मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित करावा, अशी इच्छा व्यक्त केली. परंतु, आपल्यासोबत चर्चा झाल्यानुसार आपला ’अथांग सावरकर’ हा कार्यक्रम ठेवणे शक्य नाही. महासंघाचे सरचिटणीस अनिल देसाई यांनादेखील आपला कार्यक्रम अपेक्षित होता परंतु समिती सदस्यांच्या मागणीनुसार तो ठेवणे शक्य होत नसल्यामुळे आम्ही हा कार्यक्रम रद्द करत आहोत.”

भविष्यात कार्यक्रम करण्याचे आश्वासन
दरम्यान, स्थानिय लोकाधिकार समिती महासंघाचे चिटणीस वामन भोसले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी शरद पोंक्षे यांना पत्र लिहिले असल्याचे सांगितले. भोसले म्हणाले की, “मराठी भाषा दिवसानिमित्त येत्या २७ तारखेला विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तसेच राज्य सरकारमधील अनेक मंत्री या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. परंतु, समिती सदस्यांची इच्छा यंदा मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित करण्याची असल्याने आम्ही शरद पोंक्षे यांचा ‘अथांग सावरकर’ हा कार्यक्रम रद्द केला. तसेच भविष्यात सावरकरांवरील एखादा कार्यक्रम आयोजित करु, असेही पोंक्षे यांना सांगितले,” असे भोसले म्हणाले.