एनआरसी देशभरात लागू करण्याबाबत अद्याप निर्णय नाही : केंद्र सरकार

04 Feb 2020 17:12:31


NRC_1  H x W: 0


नवी दिल्ली : “राष्ट्रीय नागरिक नोंदणी अर्थात एनआरसी देशभरात लागू करण्यासाठी अद्याप निर्णय झालेला नाही,” असे स्पष्टीकरण केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी मंगळवारी लोकसभेत आपल्या लेखी उत्तरात दिले आहे. नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि एनआरसीला विरोध करण्यासाठी देशभरात सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाच्या या उत्तरास महत्त्व प्राप्त झाले आहे.


“राष्ट्रीय नागरिक नोंदणी अर्थात एनआरसी देशभरात लागू करण्यासंबंधीचा काही निर्णय झाला आहे काय, त्यासंबंधी काही योजना आहे काय?,” असा प्रश्न लोकसभेत विचारण्यात आला होता. केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी त्यास लेखी उत्तर दिले. “अद्याप राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीविषयी कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्याचप्रमाणे राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीची देशव्यापी अंमलबजावणी करण्याविषयीदेखील अद्याप कोणत्याही प्रकारचा निर्णय घेण्यात आलेला नाही,” असे राय यांनी आपल्या लेखी उत्तरात म्हटले आहे. देशभरात सध्या नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीविरोधात काही गट आंदोलने करीत आहेत. काही आंदोलनांना हिंसक वळणदेखील लागले आहे. त्याचप्रमाणे संसदेतही काँग्रेससह अन्य विरोधी पक्ष सीएए व एनआरसीवरून गदारोळ घालत आहेत. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने मंगळवारी लेखी उत्तर दिले.
हेगडेंच्या वक्तव्यावरून गदारोळ, भाजप-काँग्रेस आमनेसामने
माजी केंद्रीय मंत्री आणि कर्नाटकमधील भाजप खासदार अनंतकुमार हेगडे यांनी महात्मा गांधींविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे जोरदार पडसाद लोकसभेत उमटले. काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते अधीररंजन चौधरी यांनी त्यावरून भाजपवर टीका केली. ते म्हणाले की, “महात्मा गांधींना संपूर्ण जग पितृतुल्य मानते, मात्र, भाजपच्या हेगडे यांनी त्यांचा अपमान केला आहे. महात्मा गांधींविषयी आक्षेपार्ह शब्द वापरत रामाचे पुजारी असलेल्या महात्मा गांधींचा अपमान केला जात आहे.” यावेळी चौधरी यांनी वापरलेल्या आक्षेपार्ह शब्दास कामकाजातून काढून टाकण्यात आले.
चौधरी यांना केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी जोरदार प्रत्युत्तर देत काँग्रेस नकली गांधींचे अनुयायी असल्याचा हल्ला चढविला. ते म्हणाले की, “भाजप हाच महात्मा गांधींचा खरा अनुयायी आहे, तर काँग्रेस म्हणजे सोनिया गांधी आणि राहुल गांधी या नकली गांधींचा अनुयायी आहे. हेगडे यांचे वक्तव्य अजिबात समर्थनीय नाही, त्याविषयी त्यांना जाणीव करून देण्यात आलेली आहे.” त्यामुळे काँग्रेस आता अनावश्यक मुद्द्यांवर गोंधळ करीत असल्याचे जोशी म्हणाले. यानंतर अधीररंजन चौधरी यांनी काँग्रेस सभात्याग करीत असल्याचे सांगितले.
निर्भया प्रकरणावरून जावडेकर - संजय सिंह यांच्यात खडाजंगी
निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषींच्या फाशीच्या शिक्षेच्या अंमलबजावणीस होत असलेल्या विलंबाचा मुद्दा राज्यसभेत गाजला. त्यावरून केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि आम आदमी पक्षाचे सदस्य संजय सिंह यांच्यात खडाजंगी झाली. राष्ट्रपती आणि सर्वोच्च न्यायालयाने निर्भयाच्या दोषींना लवकरात लवकर फासावर चढवावे. त्यासाठी तातडीने हस्तक्षेप करण्यात यावा, असे संजय सिंह म्हणाले. केंद्रीय मंत्री जावडेकर यांनी त्यास प्रत्युत्तर देताना म्हटले की, “सर्वोच्च न्यायालयाने प्रकरणातील दोषींचे अपील २०१७ सालीच फेटाळले होते. त्यानंतर तुरुंग प्रशासनाकडून दोषींना त्याविषयी सूचित करण्यामध्ये एक वर्षापेक्षा जास्त कालावधी लागला. हा विलंब दिल्ली राज्य सरकारमुळे होत आहे,” असे जावडेकर म्हणाले.

Powered By Sangraha 9.0