पालिका शाळा हायटेक होणार ; शिक्षण विभागाचा अर्थसंकल्प सादर

    दिनांक  04-Feb-2020 16:48:23
|

mumbai edu budget_1 
 
 
मुंबई : मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी मंगळवारी स्थायी समितीसमोर अर्थसंकल्प सादर केला. मुंबई महापालिका शिक्षण समिती अर्थसंकल्पात २९४४.५९ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तसेच, पालिका शाळांचा ढासळलेला दर्जा सुधारण्यासाठी अर्थसंकल्पात विशेष भर देण्यात आला आहे. गुणवत्ता वाढवण्यासाठी मुख्याध्यापकांना विशेष अधिकार, छोटी वेधशाळा, विद्यार्थ्याना हात धुण्यासाठी हँडसॅनिटायझर, पिण्याच्या पाण्याची आठवण करून देण्यासाठी शाळेची घंटा आदी महत्वाच्या तरतुदी अर्थसंकल्पात करण्यात आल्या आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत २१०.८२ कोटीने वाढला आहे.
 
यंदाच्या अर्थसंकल्पात काही महत्वाच्या योजनांवर भर देण्यात आला आहे. शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रशासनाने महत्वपूर्ण निर्णय घेऊन शाळांच्या मुख्याध्यापकांना विशेष अधिकार बहाल करण्यात आले आहेत. विद्यार्थ्याना अवकाश विज्ञानाचा अनुभव देण्यासाठी पालिकेच्या विज्ञान कुतूहल भवन केंद्रामध्ये डिजीटल दुर्बीण बसवून छोटी वेधशाळा स्थापन केली जाणार आहे. विद्यार्थ्याना हात स्वच्छ धुण्यासाठी १७ विशेष मुलांच्या शाळांमध्ये हँड सॅनिटायझर बसवले जाणार आहेत. यामुळे आजाराना आळा बसणार आहे. केरळच्या धर्तीवर मुलांना एका सत्रात तीन वेळा घंटा वाजवून पाणी पिण्याची आठवण करून दिली जाणार आहे. शाळांमध्ये 'सीबीएसई', 'आयसीएसई' बोर्डाच्या शाळांची निर्मिती आदी विशेष योजना रावबल्या जाणार असून त्यासाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे.
 
सरकारकडून १०३१.९२ कोटी येणे बाकी
 
१ एप्रिल २०१६ पासून पालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झाला आहे. ७ व्या वेतन आयोगाच्या थकबाकीपोटी राज्य सरकारकडून ८०० कोटी रुपये येणे अपेक्षित आहे. प्राथमिक शाळांच्या खर्चापोटी राज्य सरकारकडून ५० टक्के अनुदान दिले जाते. २०२०- २१ मध्ये या अनुदानाचे २३१.९२ कोटी रुपये अपेक्षित आहेत. ही सर्व रक्कम मिळून पालिकेला सरकारकडून महसुली उत्पन्नापोटी १०३१.९२ कोटी येणे अपेक्षित असल्याचे सहआयुक्त आशुतोष सलिल यांनी सांगितले.
 
महत्वाच्या तरतुदी -
 
> डिजिटल क्लासरूम - २९ कोटी
> व्हर्चुअल क्लासरूम - ११.५९ कोटी
> रस्ता सुरक्षा दल (एसआरपी) - १२ लाख
> चित्रकला स्पर्धा - ३५ लाख
> शाररिक शिक्षण - १.९४ कोटी
> वार्षिक सहल - ४.६१ कोटी
> शाळांचे बांधकाम - ३४६ कोटी
> शाळा माहिती व्यवस्थापन - १ कोटी
> हाऊस किपिंग - ७६.०३ कोटी
> शालेय वस्तूंचा पुरवठा - १११.८२ कोटी
> शाळांचे मूल्यमापण - २० लाख
> शाळेत इंटरनेटसाठी - ४८ लाख
> विद्यार्थिनी मुदत ठेव योजना - ७. ८६ कोटी
> विद्यार्थ्यांना मोफत बस - १७.७० कोटी
> दिव्यांग विद्यार्थी उपस्थिती भत्ता - ८.०७ कोटी
> मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयासाठी - १ कोटी
> महापौर पुरस्कार - १३ लाख
> बालकोत्सव - २५ लाख
> पथनाट्य स्पर्धा - ११ लाख
> टिंकरींग लॅब - २.२७ कोटी
> विद्यार्थ्यांचे समुपदेशन - १ कोटी
> ई. लायब्ररी - १.५४ कोटी
> माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सहाय्य - ५० लाख
> डिजिटल दुर्बीण - २६ लाख
> हॅन्ड सॅनिटायझर - १.८४ कोटी
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.