मुख्यमंत्र्यांनी देशविरोधी नारे सहन केल्यास जनता माफ करणार नाही : देवेंद्र फडणवीस

    दिनांक  03-Feb-2020 17:35:33
|
uddhav devendra_1 &nनवी दिल्ली :
शिवसेनेने एवढी वर्षे देशहिताचे राजकारण केले आहे, मात्र, आता मतांच्या राजकारणासाठी मुंबईतील आझाद मैदानात देण्यात आलेल्या देशविरोधी नारे मुख्यमंत्र्यांनी सहन केल्यास जनता त्यांना कदापी माफ करणार नाही, असा इशारा राज्याचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला सोमवारी दिल्ली येथे बोलताना दिला.


मुंबईतील आझाद मैदानात एका आंदोलना दरम्यान ‘शरजिल तेरे अरमानों को, हम मंझिल तक पहुचाएंगे’ असे नारे देण्यात आले होते. त्याविषयी बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला कठोर इशारा दिला.


फडणवीस म्हणाले की, लोकशाहीमध्ये विचारांमध्ये भिन्नता असू शकते. मात्र, देशविरोधी नाऱ्यांचे मतांच्या राजकारणासाठी समर्थन करणे योग्य नाही. मुंबईत शरजिल इमामचे समर्थन करणारे शरजिल तेरे अरमानों को, हम मंझिल तक पहुचाएंगे असे नारे देण्यात आले. आसाम आणि ईशान्य भारतास तोडण्याचे मनसुबे असणाऱ्या शरजिल इमामच्या समर्थनार्थ असे देशशविरोधी नारे देण्यात आले आहेत.


काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून आम्हाला कोणतीही अपेक्षा नाही, मतांच्या राजकारणासाठी ते नेहमीच अशा लोकांना पाठीशी घालत असतात. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आजपर्यंत तरी देशहिताचे राजकारण केले आहे. त्यांनी या देशविरोधी नारे देणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. अन्यता जनता त्यांना कधीही माफ करणार नाही. कारवाई न केल्यास भाजपतर्फे तीव्र आंदोलन हाती घेतले जाईल, असा इशाराही फडणवीस यांनी दिला आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.