उस्मानाबादमध्ये शिवसेनेला जोरदार धक्का; प्रामाणिक कार्य करूनही पक्षात न्याय मिळत नसल्याचा केला आरोप
उस्मानाबाद : शिवसेनेचे माजी बंडखोर उपजिल्हाप्रमुख अजित पिंगळे यांनी आपल्या अनेक समर्थकांसह गुरुवारी भाजपमध्ये प्रवेश केला. शिवसेनेचे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून अजित पिंगळे यांची ओळख होती. मात्र प्रामाणिक कार्य करूनही पक्षात न्याय मिळत नसल्याचा आरोप करत पिंगळे यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली होती.
अजित पिंगळे यांनी आता शिवसेनेला सोडचिठ्ठी देत गुरुवारी मुंबईमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी भाजपाचे मुख्य प्रतोद आमदार सुजितसिंह ठाकुर, तुळजापुरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील, भाजपा जिल्हाअध्यक्ष नितीन काळे हे उपस्थित होते.
निवडणुकीनंतर पिंगळे सेनेत राहावेत यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी विशेष प्रयत्न केला होता, अशी चर्चा होती. मात्र नाराज अजित पिंगळे यांनी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे समर्थन करत भाजप प्रवेश केला. त्यामुळेच हा पक्षप्रवेश शिवसेनेसाठी आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासाठी मोठा धक्का असल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू झाली आहे. पिंगळे यांच्या प्रवेशामुळे भाजपला उस्मानाबाद कळंब मतदार संघात मोठे बळ मिळणार आहे.