अंत पाहू नका...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Feb-2020   
Total Views |

amit shah narendra modi_1



सीएएविरोधाच्या नावाखाली मोदी – शाह पुन्हा लक्ष्य ?




नवी दिल्ली : गेल्या दोन ते अडिच महिन्यांपासून सुधारित नागरिकत्व कायद्यास विरोध करण्याच्या नावाखाली शांतिप्रिय अशी ओळख सांगणाऱ्या समुदायाकडून देशाच्या राजधानीला वेठीस धरण्यात आले आहे. त्याचा कडेलोट झाला तो जाफराबाद परिसरात. जाळपोळ, पोलिसांसह सुमारे २० जणांच्या हत्या, दगडफेक आणि हे करणाऱ्या अराजकतावाद्यांची बाजू घेणारे लोक, असे विदारक चित्र राजधानीमध्ये सध्या दिसते आहे. या कथित आंदोलनाचे हिंसक स्वरूप पाहता हा काँग्रेसचा पुन्हा एकदा हिंदुत्व चळवळीस बदनाम करण्याचा डाव तर नव्हे ना, अशी शंका उत्पन्न होते.
सुमारे गेल्या एक महिन्यापासून दिल्लीतील जाफराबाद परिसरातही शाहीनबागप्रमाणे रस्त्याच्या कडेला तंबू वगैरे लावून आंदोलन सुरु होते. आंदोलक शनिवारी रात्री अचानक रस्त्यांवर आले आणि रस्ते रोखून धरण्याचा शाहीनबाग पॅटर्न राबविण्यास प्रारंभ केला. अखेर या प्रकाराला कंटाळून मौजपूर परिसरातील नागरिकांनी सुधारित नागरिकत्व कायद्यास पाठींबा द्यायची भूमिका घेतली आणि आंदोलकांचा विरोध करण्यासाठी तेदेखील रस्त्यावर बसले. यामुळे कायद्याचा विरोध करणारे आणि कायद्यास पाठींबा देणारे गट समोरासमोर आले, माजी आमदार कपिल मिश्रादेखील त्यांच्यासोबत होते.

कपिल मिश्रांमुळे भडकला हिंसाचार ?


माजी आमदार कपिल मिश्रा यांच्या कथित प्रक्षोभक वक्तव्यामुळे हा सर्व हिंसाचार भडकल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यात तथ्य आहे की नाही, हे पोलिस तपासात आणि न्यायालयात सिद्ध होईलच. मात्र, कपिल मिश्रा हे कबीर नगर परिसरातील नागरिकांसोबत उभे होते आणि सीएएविरोधकांनी अडवलेला रस्ता मोकळा करावा अशी त्यांची मागणी होती. मात्र, आमच्याविरोधात आंदोलन करताच कसे, अशा उन्मादात वावरणाऱ्या सीएएविरोधकांकडून अचानक दगडफेक सुरू झाली. म्हणजे आम्ही आंदोलने करणार, आम्ही रस्ते अडवणार, आम्ही न्यायालयाचा, संसदेचा अपमान करणार; मात्र आमच्याविरोधात कोणी काहीही करावयाचे नाही अशा जिहादी मानसिकतेत ही मंडळी आहेत काय, याचा विचार होणे गरजेचे वाटते.

हिंसक आंदोलन पूर्वनियोजित ?


जाफ्राबाद परिसरातील हिंसक आंदोलन पाहता ते पूर्वनियोजित होते का, अशी शंका येते. कारण ज्या पद्धतीने दगडं, सोडा वॉटरच्या बाटल्या, पेट्रोल बॉम्ब याचा त्यात वापर झाला आहे, ते पाहिल्यावर हे सर्व ठरवून केल्याचा संशय येतो. या आंदोलनात दिल्ली पोलिसांचे हेड कॉन्स्टेबल रतनलाल, गुप्तचर खात्याचे (आयबी) अंकीत मिश्रा यांची हत्या करण्यात आली आहे. भीषण प्रकार म्हणजे अंकीत मिश्रा यांचे शव हे गटारात सापडले असून त्यांना मारहाणीसोबत गोळीही घालण्यात आल्याचे समोर आले आहे. चांदबाग भागातील नेहरू नगरचे नगरसेवक ताहिर हुसेन हे मिश्रा यांच्या हत्येस जबाबदार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचप्रमाणे हुसेन यांच्याच घरातून मोठ्या प्रमाणावर दगडफेक करण्यात आल्याचेही त्या भागातील रहिवाशांनी सांगितले आहे.

खरे लक्ष्य मोदी – शाह ?


सुधारित नागरिकत्व कायद्याच्या आड पुन्हा एकदा मोदी – शाह यांना लक्ष्य करण्याचा काँग्रेसचा हा डाव आहे का, असा महत्वाचा प्रश्न यानिमित्ताने निर्माण होतो. यासाठी भूतकाळातील काही घटना आठविणे आवश्यक ठरते. नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना अमित शाह त्यांचे अतिशय विश्वासू मंत्री होते. मोदी यांना काँग्रेसने २००२ पासून सातत्याने मुस्लिमविरोधी ठरवित त्यांचे प्रतिमाभंजन करण्याचा प्रयत्न अगदी २०१४ पर्यंत केला. त्याचवेळी अमित शाह यांना अनेक खोट्या प्रकरणांमध्ये अडकविले, अगदी अलिकडेच न्यायमूर्ती लोया मृत्यूप्रकरणातही शाह यांना अडकविण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा मोदी – शाह ही जोडी अनुक्रमे पंतप्रधान आणि गृहमंत्री अशा सर्वोच्च पदांवर विराजमान आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शाह यांना लक्ष्य करून त्याचा दबाव मोदींवर टाकण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून होत आहे. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पत्रकारपरिषदेत शाह यांच्या राजीनाम्याची केलेली मागणी, हे त्याचेच निदर्शक आहे. ज्याप्रमाणे मोदी यांना २००२ पासून बदनाम करण्यात आले, अल्पसंख्यांक समुदायाच्या मनात त्यांच्याविषयी भय निर्माण करण्याचा प्रयत्न झाला; अगदी तसेच आता शाह यांच्याविरोधात केले जात आहे. काँग्रेसने मोदी – शाह जोडीचा धसका घेतला आहे, कारण गृहमंत्री म्हणून शाह यांनी अतिशय चमकदार कामगिरी केली आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे २००२ पासून मोदी आणि हिंदुत्व चळवळीला बदनाम करण्याचे प्रयत्न काँग्रेसने केले, तसेच प्रयत्न आता शाह यांना लक्ष्य करून करण्यात येत आहेत, असे म्हणण्यास वाव आहे. त्यासाठीच सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध करण्याची ढाल वापरण्यात येत आहे.

ना लाज, ना शरम...


सुधारित नागरिकत्व कायद्यास विरोध करण्याच्या नावाखाली राजरोसपणे पिस्तुलातून फैरी झाडणारा शाहरुख नावाचा गुंड आणि त्याचा निडरपणे सामना करणारे दिल्ली पोलिस, असे चित्र संपूर्ण देशाने पाहिले. विशेष म्हणजे त्याचे नाव जाहिर झाले नव्हते, तोपर्यंत हिंसक आंदोलनास शांतिपूर्वक आंदोलन ठरविणाऱ्या काही निवडक माध्यमांनी आणि पुरोगामी अशी ओळख सांगणाऱ्यांनी त्याविरोधात लगेच रान उठविण्यास प्रारंभ केला होता. मात्र, गोळीबार करणारा शाहरूख आहे, असे समजताच त्यांच्या अजेंड्यातून हा विषय गायब झाला. अर्थात त्यानंतर सुरू झाली तो हिंदूंनीच कसा हिंसाचार केला, हे सांगण्याची अहमहमिका. त्यामध्ये सर्व प्रकारच्या प्रसारमाध्यमांमध्ये कार्यरत मंडळींनी महत्वाची भूमिका बजाविली. विशेष म्हणजे या मंडळींना शांतिप्रिय समुदायाकडून होत असलेले हिंसक प्रकार, घडविण्यात येत असलेल्या हत्या, पोलिसांवर होणारे हल्ले यापैकी कशावरही बोलणे महत्वाचे वाटत नाही.

विशेष म्हणजे या हिंसाचाराचे टायमिंग बघणे अतिशय महत्वाचे ठरते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षांच्या भारत दौऱ्याची वेळ साधूनच आंदोलनांकडून हिंसाचार सुरू करण्यात आला. यामागे त्यांचे दोन हेतू असू शकतात- पहिला म्हणजे अमेरिकी राष्ट्राध्यक्षांच्या दौऱ्यास गालबोट लावणे. मात्र, पहिला हेतू अजिबात साध्य न झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दुसरा हेतू म्हणजे सीएएविषयी सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या पुढील सुनावणीत या कायद्यामुळे हिंसाचार होत आहे, त्यामुळे कायद्यास स्थगिती द्यावी अथवा तो रद्द करावा असा युक्तीवाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अर्थात, तसे होईल की नाही, हे सुनावणीवेळी स्पष्ट होईलच.
@@AUTHORINFO_V1@@