केवळ दिनच साजरा करणार काय?

27 Feb 2020 22:00:03


मराठी भाषा _1  



मराठी भाषा समृद्ध आहेच. तिचा जागर तिच्यातील गुणवैशिष्ट्यांनी होत असतोच. मात्र, गरज आहे ती मराठी जिवंत ठेवण्याची. त्यामुळे आपण केवळ दिन साजरा न करता मराठी जगविण्याचा निर्धार यानिमित्ताने करणे आवश्यक आहे.



काल दि
. २७ फेब्रुवारी रोजी नाशिकचे भूमिपुत्र ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक वि. वा. शिरवाडकर उपाख्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा दिन’ म्हणून साजरा झाला. मराठी भाषा दिन म्हणून कालचा दिवस साजरा होण्यास अनेक वर्ष लोटली आहे. मात्र, आजही मराठीच्या स्थितीत फारसा फरक नाहीच. ’मायमराठी भाषा जीर्ण वस्त्रे लेऊन मंत्रालयाच्या दारात कटोरा घेऊन उभी आहे,’ अशी मराठी भाषेची दैन्यावस्था त्याकाळी कुसुमाग्रजांनी मांडली होती. तीन दशके त्यांच्या या वाक्याला लोटली गेली. पण, स्थितीत काय सुधारणा झाली, हाच सवाल आहे. आजही अभिजात भाषेच्या दर्जा मिळावा, या प्रतिक्षेत मराठी भाषा आहे. या भाषेविषयी तळमळ बाळगणार्‍यांच्या हाती काही ठोस लागले आहे काय? याची माहितीदेखील सर्वसामन्यांकडे उपलब्ध नाही. मराठी भाषा वैभवसंपन्न बनून पैठणी नेसून उभी असलेली दिसेल, अशी आश्वासने आजवर आपण अनेकदा ऐकली.



वर्षातून एकदा मराठीचा जागर तिच्या
‘दिना’ला होतो. मात्र, ‘दीन’ अवस्थेतून बाहेर काढण्यासाठी मराठीबाबत काय कार्य केले जाते, हाही एक सतावणारा प्रश्नच आहे. कालबद्ध नियोजन आणि त्याच्या अंमलबजावणीअभावी ते ’शब्द बापडे, केवळ वारा’ ठरले आहेत, अशीच म्हणण्याची वेळ आजही येत आहे. राज्यातील मराठी शाळांची स्थिती दयनीय आहे. ज्या सुस्थितीत आहेत, त्या बहुतेक शाळा इंग्रजीसह मराठी हा पर्याय स्वीकारत आहेत. मराठी भाषेतील ज्ञान कारकिर्दीला (करिअर) पूरक ठरत नाही, ती ज्ञानाची आणि उदरनिर्वाहाची भाषा नाही, अशी ओळख मराठीजनांनी निर्माण करणे सुरू केल्याचे समाजात वावरताना दिसते. अशा वेळी केवळ एक दिवसाचा गौरव हा मराठीला मान मिळवून देईल काय, याचा विचार होणे आवश्यक आहे. कोणतीही भाषा ही बोलली गेली, व्यवहारात वापरली गेली आणि ती रुजवली गेली तर तिचे महत्त्व हे वाढत असते. मराठी भाषा समृद्ध आहेच. तिचा जागर तिच्यातील गुणवैशिष्ट्यांनी होत असतोच. मात्र, गरज आहे ती मराठी जिवंत ठेवण्याची. त्यामुळे आपण केवळ दिन साजरा न करता मराठी जगविण्याचा निर्धार यानिमित्ताने करणे आवश्यक आहे.



मराठीसाठी हवा निःस्वार्थ भाव
...



मराठी भाषेत ज्ञानार्जन केल्यावर आधुनिक समाजात व्यावहारिक संधी तोकड्या पडतात किंवा उपलब्ध होत नाहीत
, असा आजच्या तरुणाईचा (गैर) समज आहे. हा समज कसा गैर आहे, हे सरकार आणि समाज यांनी तरुणाईला सप्रमाण सिद्ध करून देण्याची निकड आज आहे. केवळ उसना कळवळा आणून हे होणार नाही. याचे भान मनी असणे निश्चितच आवश्यक. ‘आगामी आयुष्यात उदरनिर्वाहाच्या संधीच नसतील तर मराठी भाषेतून का शिकावे?’ या तरुणाईच्या प्रश्नाचे उत्तर देण्याची जबाबदारी ही समाज व सरकारची आहे. त्यासाठी मराठीतील संवाद वाढविणे, हा एक पर्याय नक्कीच असू शकतो. आजच्या काळात आपल्या जीवनावर दुर्दैवाने अर्थकारणाचा प्रभाव आहे. त्यामुळे मातृभाषेसारख्या अतिमहत्त्वाच्या गोष्टी या दुय्यम स्थानावर जात आहेत. त्यातूनच मराठीबाबत प्रश्नचिन्ह जन्मास येत आहे.



अशा स्थितीत मराठीसाठी ठोस आणि कालबद्ध कार्यक्रम हाती घेत जागर होणे केव्हाही क्रमप्राप्त
. सध्या सुरू असणारे प्रयत्न हे त्या मानाने तोकडे असेच म्हणावे लागतील. त्यामुळे हे प्रयत्न त्याच्या ध्येयप्राप्तीपर्यंत पोहोचण्यात किती यशस्वी ठरतील, हादेखील एक प्रश्नच आहे. मराठी भाषा दिन साजरा होत असूनही मराठी भाषेची घसरगुंडी थांबलेली नाही, हे वास्तव समाजात वावरताना सहज दिसून येते. मराठी ही राज्यातील बहुतांशी नागरिकाची मातृभाषा आहे. त्यामुळे ती वाचविणे, मोठी करणे, समृद्ध करणे हे न केवळ सरकारची तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. त्यामुळे जे काही उपाय करायचे ते सरकारने करावेत, असा दृष्टीकोनदेखील मराठीसाठी घातकच. राज्याच्या सांस्कृतिक धोरणांत मराठी भाषाविकासासाठी अनेक उपाययोजना अंतर्भूत आहेत. त्यांची काटेकोर अंमलबजावणी झाल्यास मराठीची दैनावस्था संपुष्टात येण्यास नक्कीच मदत होईल. असे अनेकांनी यापूर्वीदेखील सुचविले आहे. राज्यात मराठी ही अनिवार्य असावी, सरकारी कार्यालयात मराठीचाच वापर हवा, असे धोरण सरकारचे आहे. मात्र ते केवळ एक टोक आहे. संपूर्ण पाया रचणे आणि तो मजबूत करणे, ही नागरिकांची जबाबदारी आहे. यासाठी निःस्वार्थ भावनेने झोकून देऊन कार्य करण्याची गरज या निमित्ताने प्रतिपादित होत आहे.

Powered By Sangraha 9.0