'कुठेही लपा, घुसून मारू' हा संदेश देण्यासाठीच बालाकोट एअर स्ट्राईक

26 Feb 2020 11:13:27

B S Dhanova_1  
नवी दिल्ली : 'कुठेही लपा, घुसून मारू' हा संदेश पाकिस्तानी दहशतवाद्यांना देण्यासाठीच बालाकोट एअर स्ट्राईक केला, अशी प्रतिक्रिया माजी वायूदल प्रमुख बी. एस. धानोवा यांनी दिली. २६ फेब्रुवारीला भारताने बालाकोट येथे एअर स्ट्राईक करून पुलवामा येथील हल्ल्याचा बदल घेतला. या हल्ल्याला एक वर्ष पूर्ण झाले. "तुम्ही कुठेही लपा, आम्ही तुम्हाला घुसून मारू. असा संदेश पाकिस्तानी दहशतवाद्यांना द्यायचा होता. त्यामुळेच पाकिस्तानात घूसन एअर स्ट्राईक केली, अन्यथा आम्ही भारताच्या भूमीवरूनही हल्ला करू शकलो असतो." असे धानोवा यांनी सांगितले.
 
 
 
बालाकोट येथील पाकिस्तानी दहशतवादी तळांवर भारतीय वायू दलाने २६ फेब्रुवारी २०१९ला रात्री हल्ला केला होता. या हवाई हल्ल्यामध्ये २०० पाकिस्तानी दहशतवादी आणि अनेक दहशतवादी तळ उद्ध्वस्थ झाल्याचा दावा भारताने केला होता. मात्र, पाकिस्तानने हा दावा फेटाळला होता. या घटनेनंतर दोन्ही देशामध्ये तणाव वाढून हवाई चकमकही झाली होती. तसेच दोन्ही देश युद्धजन्य परिस्थितीला सामोरे गेले होते. "बालाकोट एअर स्ट्राईकनंतर कोणताही मोठा दहशतवादी हल्ला झाला नाही. अनेक निवडणुका झाल्या मात्र, भारतावर हल्ला झाला नाही. जर दहशतवादी हल्ला केला तर भारतीय लष्कर पुन्हा आपल्यावर कारवाई करणार या भीतीने दहशतवाद्यांनी हल्ला केला नाही," असे धानोवा यांनी सांगितले.
 
 
Powered By Sangraha 9.0