तडाखेबाज वेदा...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Feb-2020   
Total Views |

Veda Krishnamurthi_1 

 


भारतीय महिला क्रिकेटमध्ये सध्या एक नवे नाव तडाखेबाज फलंदाजीमुळे चांगलेच गाजते आहे, ते म्हणजे वेदा कृष्णमूर्ती. तेव्हा भारतीय महिला क्रिकेटमधील या नव्या दमाच्या खेळाडूच्या कारकिर्दीचा घेतलेला हा आढावा...



अंतराळ असो
, राजकारण अथवा क्रीडा, प्रत्येक क्षेत्रातच महिलांनी सातासमुद्रापार भारताचा झेंडा रोवला आहे. सध्या ऑस्ट्रेलिया येथे चालू असलेल्या ‘आयसीसी’ महिला ‘टी-२०’ विश्वचषक स्पर्धेकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. गेली काही वर्षांतील भारतीय महिला क्रिकेट संघाची एकदिवसीय आणि ‘टी २०’ मधील कामगिरी पाहता, भारतीय संघालाच विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानले जात आहे. फलंदाजी, गोलंदाजी तसेच क्षेत्ररक्षणामध्येही भारतीय महिलांची कामगिरी उत्कृष्ट ठरली असून पूनम यादव, शेफाली शर्मा, स्म्रिती मंधाना, कर्णधार हरमनप्रीत कौर अशी अनेक तरुण नावे सध्या भारतीय महिला क्रिकेट संघाचा एक मोठा आधारस्तंभ आहेत. पुरुष क्रिकेट प्रमाणेच आता महिला क्रिकेटदेखील क्रिकेट रसिकांची माने जिंकण्यात यशस्वी ठरत आहेत. सध्या चालू असलेल्या या स्पर्धेमध्ये भारताने बलाढ्य ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मातीमध्ये लोळवून आपली दावेदारी सिद्ध केली आहे. यामध्ये सध्या आणखी एक नाव क्रिकेटप्रेमींच्या ओठांवर आहे आणि ते म्हणजे वेदा कृष्णमूर्ती. मैदानावर क्षेत्ररक्षण करताना कृष्णाची चपळता तसेच फलंदाजीला आल्यानंतर तिच्या तडाखेबाज खेळीने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. आज जाणून घेऊया तिच्या आयुष्याची कहाणी...


वेदाचा जन्म १६ ऑक्टोबर, १९९२ रोजी कर्नाटकमधील कदूर येथे झाला. चार भावंडांमध्ये वेदा सर्वात धाकटी. तिने वयाच्या अवघ्या तिसर्‍याच वर्षी बॅट हातात घेतली. लहानपणी रस्त्यावर क्रिकेट खेळता-खेळता तिने एकदिवस भारतीय संघासाठी क्रिकेट खेळण्याचे स्वप्न पाहिले आणि पुढे ते सत्यातही उतरवले. प्राथमिक शिक्षणासाठी तिला बंगळुरूमधील कॅम्ब्रिज विद्यालयात प्रवेश मिळाला. याचदरम्यान तिच्या पालकांनी तिचे कराटे क्लासमध्ये नाव नोंदवले. वेदाला कराटेमध्ये फारसा रस नव्हता, तरीही वयाच्या बाराव्या वर्षी तिने ‘ब्लॅक बेल्ट’पर्यंत मजल मारली. त्यामुळे अगदी लहान वयात वेदाला मजबूत करण्याचे काम या खेळाने केले. २००५ मध्ये वयाच्या तेराव्या वर्षी तिने कर्नाटकच्या ’इन्स्टिट्यूट ऑफ क्रिकेट’मध्ये क्रिकेटच्या मूलभूत प्रशिक्षणासाठी प्रवेश घेतला.

 
 

तिच्या प्रतिभेची जाणीव होताच, या संस्थेचे संचालक इरफान सैत यांनी तिच्या वडिलांकडे बंगरुळुला घर घेण्याची विनंती केली, जेणेकरून तिच्यातील कलागुण विकसित होण्यासाठी योग्य ते प्रशिक्षण योग्य वेळ घेऊन आणखी समृद्ध करता येईल. अखेर तिच्या खेळातील प्रतिभा पाहून तिचे कुटुंब बंगळुरूला राहायला आले. देशासाठी खेळण्याचे तिचे स्वप्न पूर्ण करण्याकरिता तिचे वडील कर्नाटकमधील चिकमंगळुरु या छोट्या शहरातून बंगळुरूला स्थायिक झाले. वेदा तिच्या आतापर्यंतच्या यशाचे सारे श्रेय तिचे पहिले गुरु इरफान सैत यांनाच देते. वेदाला एका उत्कृष्ट क्रिकेटपटू घडवण्यामागे अपूर्वा शर्मा आणि सुमन शर्मा यांचादेखील खारीचा आहे. लहान असताना वेदाची आदर्श भारतीय महिला क्रिकेटपटू होती मिताली राज महत्त्वाची बाब म्हणजे, जेव्हा वेदा १२ वर्षांची होती तेव्हा मितालीकडून तिचा सत्कारदेखील झाला होता आणि भविष्यात या दोघीही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर एकत्र खेळल्या आहेत. वेदाने पुढे उच्च शिक्षणासाठी बंगळुरूमधील माऊंट कार्मेल महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि कला शाखेतून पदवी शिक्षण घेतले.

 
 
वेदा ही फलंदाजीमध्ये उत्तम होतीच, शिवाय तिने स्वतःच्या क्षेत्ररक्षणावरदेखील अपार मेहनत घेतली. राष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिने सुरुवातीला कर्नाटकचे नेतृत्व केले. ‘कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन’ने आयोजित केलेल्या ’केएससीए अध्यक्ष इलेव्हन’ आणि ’केएससीए सेक्रेटरी इलेव्हन’ यांच्यातील पहिल्या ट्वेन्टी-ट्वेन्टी सामन्यात वेदाने ’अध्यक्ष इलेव्हन’चे नेतृत्व केले होते. ‘कर्नाटक अंडर १९’ संघाची कर्णधार असताना तिने ’दक्षिण विभाग आंतरराज्य चषक’ जिंकून दिला. यामध्ये तिची कामगिरी पाहून तिची आंतरराष्ट्रीय संघामध्ये निवड करण्यात आली. जून २०११ मध्ये वयाच्या अठराव्या वर्षी तिने इंग्लंडविरुद्ध सामन्यात पदार्पण केले. पहिल्याच सामन्यामध्ये तिने ५१ धावांची खेळी करून विक्रम नोंदवला. त्यानंतर तिने कधीही मागे वळून पाहिले नाही.
 
 

ऑक्टोबर २०१७ मध्येमहिला बिग बॅश लीग’मध्ये ’हॉबर्ट हरिकेन’ या संघासोबत तिने करार केला. ‘बिग बॅश लीग’मध्ये खेळणारी ती भारताची तिसरी क्रिकेटपटू ठरली. तसेच, २०१७च्या ‘आयसीसी महिला विश्वचषक’ स्पर्धेमधील न्यूझीलंड विरुद्धच्या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये तिने तडाखेबाज खेळी केली. भारत पराभवाच्या छायेत असताना तिने ३७व्या षटकामध्ये येऊन सात चौकार आणि दोन षटकारांसह अवघ्या ४५ चेंडूंमध्ये ७० धावांची धमाकेदार खेळी केली. तिच्या या खेळीमुळे भारताने विश्वचषक स्पर्धेमध्ये अंतिम सामान्यांपर्यंत मजल मारली होती. २०१७ मध्ये तिला ‘विजया कर्नाटक’ या सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुढे फेब्रुवारी २०१८ मध्ये एक हजार धावा पूर्ण करणारी ती भारतीय महिला, खेळाडूंमध्ये सर्वात तरुण खेळाडू ठरली. तिने आतापर्यंत ४८ एकदिवसीय, तर ७३ ट्वेन्टी-ट्वेन्टी सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. यामध्ये तिने एक हजारांहून अधिक धावा, तर ५० हून अधिक झेल टिपले आहेत. वेदाकडे भारतीय महिला क्रिकेटमधील उगवता तारा म्हणून पहिले जाते. पुढेही तिच्या फलंदाजीतून धावांचा पाऊस बरसत राहो, हीच अपेक्षा.




@@AUTHORINFO_V1@@