मनुष्यनिर्मितीचे विद्यापीठ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Feb-2020
Total Views |
Balasaheb Dixit _1 &



एक परिपूर्ण व हजारो कार्यकर्त्यांना प्रेरक ठरेल, असे दीर्घायुष्य जगून बाळासाहेब दीक्षितांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या स्मृतींना उजाळा देणारा हा लेख...


गेल्या वर्षी २१ नोव्हेंबरला पूजनीय सरसंघचालक बाळासाहेबांना खास भेटण्यासाठी नाशिकच्या कार्यालयात आले होते. त्यावेळी गप्पा मारताना ते सहज बोलून गेले होते. "बाळासाहेब, आपला संघ आता खूप मोठा झाला आहे. तुमच्यासारख्या जुन्या काळातील प्रचारकांनी अमाप कष्ट केल्यानेच हे दिवस आले आहेत."

 

एका अर्थाने बाळासाहेबांचा म्हणजेच अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कार्य केलेल्या एकूणच सर्व प्रचारकांचा केलेला हा गौरवतसे पाहायला गेले तर आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यावर असताना ज्या हिंदुत्वाची विचारधारा आयुष्यभर आपण खांद्यावर घेतली, ज्याच्यासाठी घरदार सोडले, एक-एक माणूस जोडण्यासाठी व त्याला या विचारधारेत गुंफण्यासाठी आयुष्यभर वणवण केली, त्या संघाचे व संघाच्या विचारधारेचे 'विश्वरूपदर्शन' घेणे आणि हे दर्शन संपूर्ण जगाला घडविणार्‍या संघासारख्या एका बलाढ्य संघटनेचा सर्वोच्च नेता आपल्या भेटीसाठी येणे आणि 'तुमच्या कष्टांमुळेच हे घडले' अशी कौतुकाची थाप त्याने पाठीवर देणे, यापेक्षा एखाद्या कार्यकर्त्याच्या दृष्टीने गौरवाचा क्षण तो काय असू शकतो?

 

बाळासाहेबांनी आयुष्याच्या अखेरच्या काळात गौरवाचा हा क्षण अनुभवला. हा क्षण अनुभवताना त्यांच्या चेहर्‍यावरील कृतकृत्यतेचा भाव, ती चमक आज देहरूपाने ते आपल्यात नसतानाही जशीच्या तशी समोर येते आहे. एकमात्र खरेच आहे की, आयुष्याच्या प्रारंभी घेतलेल्या जीवनव्रताच्या वेळी असलेली मनस्थिती आयुष्याच्या अखेरच्या क्षणालाही कायम ठेवणे यासाठी एक फार मोठी साधना लागते. ही सिद्धी प्राप्त करण्यासाठी बाळासाहेबांना ना कुणी देवपूजा करताना पाहिले, ना ध्यान लावून बसलेले. ना त्यांनी देवदर्शनात वेळ घालवला, ना त्यांना परिक्रमा करण्याची गरज भासली. आस्तिक-नास्तिकतेचे अवडंबर न माजवताही समाजरूपी परमेश्वराची आराधना करता येऊ शकते, हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले. आयुष्यभरासाठी 'व्रत' म्हणून स्वीकारलेल्या कार्यात सतत कार्यमग्न राहणे, हीच एका अर्थाने त्यांची साधना होती.त्यामुळेच असेल कदाचित की, आपल्या ध्येयप्राप्तीसाठी विचलित झालेले वा त्यासाठी संघर्ष करताना डळमळीत झालेले बाळासाहेब कुणी कधीच बघितले नाही.

 

बाळासाहेबांनी संपूर्ण आयुष्यभर मनुष्यनिर्मितीचा ध्यास घेतला. प्रचारक या नात्याने त्यांनी तब्बल ७० वर्षे मनुष्य निर्माणाचे कार्य केले. समाज घडवायचा असेल तर अगोदर कार्यकर्ता घडवावा लागेल. केवळ कार्यकर्ता घडवून चालणार नाही, तर त्याला समाजनिर्मितीचे एक उपकरण म्हणून घडवावे लागेल. मात्र, हे करत असताना कार्यकर्तादेखील एक 'माणूस' आहे हे न विसरता त्याच्यातील 'माणूसपण' विकसित करण्यावर त्यांचा भर होता. त्यामुळेच 'कार्यकर्ता विकास' हा त्यांच्या लेखी महत्त्वाचा विषय असे. कार्यकर्त्यांबाबतच्या त्यांच्या या भूमिकेमुळेच कार्यकर्त्यांच्या मनातील खळबळ, त्याच्या मनात निर्माण होणारे विचारांचे तरंग लगेच ओळखण्याची विलक्षण हातोटी त्यांना लाभली होती. त्यातूनच कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याची एक विशिष्ट शैली त्यांनी विकसित केली होती.

 

संकेत, व्यवस्था यापेक्षाही कार्यकर्ता फुलला, विकसित झाला, मोकळेपणी आपले विचार मांडण्याइतपत त्याच्यात हिंमत निर्माण झाली, तर तो चांगल्या पद्धतीने कार्यक्षेत्रात काम करेल असा त्यांचा विश्वास होता. त्यामुळे अनेक कार्यकर्त्यांच्या दृष्टीने 'आपल्या भावना, राग, संताप, दु:ख व्यक्त करण्याचे एक हक्काचे ठिकाण म्हणजे बाळासाहेब' असे समीकरणच होऊन गेले होते. एक अत्यंत कर्मठ, प्रखर ध्येयनिष्ठ, काहीसा रूक्ष, २४ तास संघ जगणारा अशी संघाच्या प्रचारकाची एक प्रतिमा आहे. बाळासाहेबांचे वेगळेपण असे होते की, त्यांनी 'प्रचारकी' दडपणापायी आपल्या वागण्या-बोलण्यात वा स्वभावात कधीही रूक्षता येऊ दिली नाही. याच कारणामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व कायमच टवटवीत, हवेहवेसे वाटणारे राहिले.
 

बाळासाहेब कार्यकर्त्यांशी कधी संघटनमंत्री वा प्रचारक म्हणून कधीच वावरले नाही. कुठल्याही वयोगटातील व्यक्तीशी मैत्री करण्याची अद्भुत कला त्यांनी अवगत केली होती. बाळासाहेबांच्या लेखी असलेल्या कार्यकर्त्याला साहित्य, संगीत, संस्कृती, कला, वक्तृत्व यांसारख्या कुठल्याच विषयाचे वावडे नसे. पुस्तकांना तर त्यांनी मनुष्याच्या जडणघडणीतील सर्वात महत्त्वाचे उपकरण मानले होते. साहित्यामध्ये त्यांनी कधीही आपली विचारधारा आडवी येऊ दिली नाही. सर्व प्रकारचे साहित्य कार्यकर्त्यांनी वाचले पाहिजे असा त्यांचा आग्रह होता.त्यांच्या या पुस्तकप्रेमापायीच अडगळीत गेलेला 'अल्बर्ट श्वाईट्झर' पुन्हा बाहेर आला. कल्याण आश्रमातदेखील अनेक लेखक तयार करण्यात त्यांना यश आले.

 

बाळासाहेबांची जवळपास १७ वर्षे त्यावेळेसच्या धाराशिव जिल्ह्यात प्रचारक म्हणून गेली. संघ एका विशिष्ट जातीचा असल्याची टीका संघाच्या विरोधकांकडून सातत्याने होत असतानाच धाराशिव जिल्ह्यातील कार्य मात्र त्याला अपवाद आहे, असे समाजवादी चळवळीतील कार्यकर्त्यांनीदेखील मान्य केले होते. वंचित समाजाच्या वेदना बाळासाहेबांनी प्रत्यक्ष अनुभवल्या असल्याने ऐकूणच उपेक्षित समाजाविषयी त्यांच्या मनात असलेली तळमळ कायम दिसत असे.

 

आणीबाणी उठल्यानंतर एकूणच सर्वत्र उलथापालथ झाली होती. त्यापूर्वी बाळासाहेब काही वर्षे कुलाबा जिल्ह्यात व नंतर वर्षभर मुंबईत प्रचारक होते. आणीबाणीच्या काळात सार्‍या व्यवस्थेत बराच विस्कळीतपणा आला होता. एके दिवशी बाबा भिडे यांनी बाळासाहेबांना बोलावून घेतले व वनवासी कल्याण आश्रमाचे काम महाराष्ट्रात सुरू करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. संस्थेची नोंदणी, नवीन घटना, कार्यालय, आर्थिक व्यवस्था, या विषयासाठी कार्यकर्ते जोडणे, वनवासी क्षेत्रात प्रत्यक्ष सेवाकार्यांचा प्रारंभ करणे अशा शेकडो कामांचा डोंगर त्यावेळी पडला होता. प्रांत संघटनमंत्री म्हणून बाळासाहेबांचा एका नव्या क्षेत्रात प्रवास सुरू झाला. वनवासी समाजाचे जवळून अवलोकन करणे, त्यांच्या समस्या समजावून घेणे, त्या समस्यांची जाणीव शहरी क्षेत्रातील कार्यकर्त्यांना करून देणे व त्यांना या कामासाठी प्रेरित करण्याचे काम त्यांना अन्य सहकार्‍यांच्या मदतीने करावे लागले. आज कल्याण आश्रमाचे जे स्वरूप पाहण्यास मिळते, त्यामागे बाळासाहेबांनी घेतलेल्या परिश्रमाचा मोठाच वाटा आहे.
 
 

कल्याण आश्रमाचे काम करताना कार्यकर्त्यांना एवढे थरारक अनुभव येत असतात की, ते कार्यकर्त्यांनी शब्दबद्ध केले पाहिजेत, त्यासाठी नियमित दैनंदिनी लिहिली पाहिजे, असा त्यांचा कायम आग्रह असे. प्रकाशनासाठी नसले तरी आपल्या स्वत:च्याच मूल्यमापनासाठी व विकासासाठी ते आवश्यक आहे, असे ते म्हणत. बाळासाहेबांकडे कार्यकर्त्यांसाठी भरपूर वेळ उपलब्ध असे. बाळासाहेबांना कुणी रिकामे बसलेले क्वचितच पाहिले असेल. एक तर ते कुणाशी बोलत असतील, पत्रलिखाण करत असतील वा पुस्तक वाचत असतील. बाळासाहेब गेल्या काही वर्षांपासून तसे अंथरूणावरच होते. मात्र, त्यांनी आपले मन कधीच पंगू होऊ दिले नाही. कार्यकर्त्यांना सकारात्मक ऊर्जा देण्याचे, त्याच्यात कार्याची प्रेरणा भरण्याचे काम त्यांचे अखेरपर्यंत चालूच होते. बाळासाहेबांची खोली म्हणजे सकारात्मक ऊर्जेचे एक भांडार होते. या खोलीत नुसते जाऊन क्षणभर त्यांच्यासमोर बसून आले तरी एक वेगळा अनुभव प्राप्त होत असे. गेल्या दोन महिन्यांपर्यंत काहीतरी नवीन वाचायला आणून देण्याची ते मागणी करत. पण, बाळासाहेबांनी वय आणि शिक्षण याची अनावश्यक सांगड घालण्याचा कधीच प्रयत्न केला नाही. त्यामुळेच ते कायमच तरुण राहिले. विचाराने आणि मनानेही!

 
 

'माणूसपण' जपणारे हजारो कार्यकर्ते घडवत असताना बाळासाहेब मनुष्यनिर्माण करणारे एक विद्यापीठ कधी झाले हेच कळले नाही. केवळ संघजीवनातीलच नव्हे, तर समाजजीवनातील ७० वर्षांची जडणघडण अगदी जवळून पाहणारे, एवढेच नव्हे तर प्रचारक या नात्याने या जडणघडणीत खूप मोठे योगदान देणारे एक चारित्र्यसंपन्न व ऋषितुल्य व्यक्तित्त्व आज बाळासाहेबांच्या रूपाने आपल्यातून निघून गेले आहे. खूप वर्षांपूर्वी मनाच्या एका दोलायमान स्थितीत बाळासाहेबांचे एक उभारी देणारे पत्र आले होते. त्या पत्रात बाळासाहेबांनी सुरेश भटांच्या गझलीतील चार ओळी उद्धृृत केल्या होत्या. त्या आजही जशाच्या तशा समोर दिसत आहेत-

 
 

समजाऊनि व्यथेला समजावता न आले।

मज दोन आसवांना हुलकावता न आले।

 
 

आज कार्यकर्त्यांच्या या व्यथा समजावून घेणारे व ज्याच्याजवळ न हुलकावता दोन आसवे गळू द्यावीत, असे हक्काचे ठिकाणच हरपले आहे...

 
                                                                           - महेश काळे

९८२२११४७५३

@@AUTHORINFO_V1@@