ईशान्य दिल्लीत कलम १४४ लागू ; वातावरण तणावपूर्णच

25 Feb 2020 16:47:45

Delhi_1  H x W:




नवी दिल्ली
: दिल्लीच्या जाफराबाद परिसरात काल (२४ फेब्रुवारी) भडकलेल्या हिंसेनंतर संपूर्ण दिल्लीमध्ये तणावाचे वातावरण आहे. कालच्या हिंसाचारात दिल्लीच्या एका पोलीस शिपायासह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर सुमारे ५० जण जखमी झाले आहेत. हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर ईशान्य दिल्लीत कलम १४४ कायद्याअंतर्गत जमावबंदी लागू करण्यात आली आहे.



दिल्लीच्या जफराबाद, मौजपूर आणि इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलनाला हिंसक वळण लागले. ईशान्य दिल्लीत नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसीला विरोध करण्यासाठी सुरु झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. आज दुसऱ्या दिवशीही दोन गटांमध्ये दगडफेक झाली. त्यानंतर कलम १४४ अर्थात जमावबंदीचं कलम दिल्लीमध्ये लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महिन्याभरासाठी ही जमावबंदी असणार आहे.


दिल्ली हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. शहा यांनी हिंसाचार रोखण्यासाठी काटेकोरपणे पाऊले उचलण्यास सांगितले. दिल्ली पोलिसांना अनेक सूचना दिल्या आहेत. गृहमंत्री अमित शहा यांच्या उच्चस्तरीय बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. हिंसाचार पसरविणाऱ्या संशयितांवर बारीक नजर ठेवण्याचा सल्ला त्यांनी पोलिसांना दिला आहे. सोशल मीडियावर आणि सोशल साइटवर अफवा पसरविणाऱ्या लोकांवर लक्ष ठेवण्यात यावे असे गृहमंत्रालयाने म्हटले आहे.  
Powered By Sangraha 9.0