दिल्ली हिंसाचारात पोलीस शिपायासह ५ जणांचा मृत्यू

25 Feb 2020 10:08:05

Delhi_1  H x W:
 
 
नवी दिल्ली : नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून ईशान्य दिल्लीमध्ये गेले काही दिवसांपासून हिंसाचार चालू आहे. या हिंसाचारामध्ये आत्तापर्यंत ५ जणांचा मृत्यू झाला असून १०५ पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले आहेत. पोलीस हेड कॉन्टेबल आणि चार नागरिकांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. अनेक ठिकाणी जाळपोळ आणि तोडफोडीच्या घटना घडल्या आहेत. ईशान्य दिल्लीतील सर्व शाळा आज बंद ठेवण्यात आल्या आहेत.
 
 
 
आंदोलकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरसावलेल्या पोलिसांना याचा त्रास सहन करावा लागला. यावेळी अनेक पोलीस जखमी झाले आहेत. जाफराबाद, बाबरपुरी, गोकुलपुरी, जौहरी एनक्लेव्ह आणि शिव विहार येथील मेट्रो स्टेशन बंद ठेवण्यात आले आहेत. सोमवारी एका आंदोलकाने पोलिसांवर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी धरपकड सुरू केली आहे.
 
 
 
 
या हिंसाचाराचे बळी ठरलेल्या जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. यातील एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती देण्यात येत आहे. मौजपूरमध्ये सीएएविरोधात आंदोलन सुरू होते. या आंदोलनाविरोधात एका गटानेही प्रदर्शन करण्यास सुरूवात केली. यादरम्यान, बाचाबाचीचे रुपांतर दगडफेकीमध्ये झाले. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोहोचलेल्या पोलिसांवरही जमावाने जोरदार दगडफेक केली. बंदोबस्तासाठी तैनात असलेले पोलीस उपायुक्त अमित शर्मा यांची प्रकृती गंभीर आहे. या घटनेचे अनेक व्हिडियो समोर आले आहेत.
 
 
 
Powered By Sangraha 9.0