‘सप्तमी’वर पूर्णविराम

24 Feb 2020 20:48:35


india _1  H x W


हा सामना अनिर्णित राहिला तरी कसोटी मालिका न्यूझीलंडच्या पदरात पडणार असून भारताला या दौर्‍यात सलग दुसर्‍यांदा मालिका पराभवाचा सामना करावा लागेल.


सलग पाच
‘टी-२०’ सामने जिंकत न्यूझीलंडला ‘व्हाईटवॉश’ देणार्‍या भारतीय क्रिकेट संघाला कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत तीनही सामन्यांत पराभूत झाल्यानंतर भारतीय संघाने कसोटी मालिकेतील पहिला सामनाही गमावला आहे. यामुळे न्यूझीलंडमध्ये कसोटी मालिका जिंकणे भारताला शक्य होणार नसून ही मालिका वाचविण्यासाठी दुसर्‍या कसोटी सामन्यात भारताला विजय मिळणे आवश्यक असणार आहे. हा सामना अनिर्णित राहिला तरी कसोटी मालिका न्यूझीलंडच्या पदरात पडणार असून भारताला या दौर्‍यात सलग दुसर्‍यांदा मालिका पराभवाचा सामना करावा लागेल. त्यामुळे दुसर्‍या कसोटी सामन्यात भारताला विजय मिळविणे आवश्यक असून मालिका बरोबरी सोडविण्याच्या उद्देशाने भारतीय संघ मैदानात उतरणार, यात शंकाच नाही. पहिल्या सामन्यात पराभव पाहावा लागल्यानंतर मालिकेत पुनरागमन करण्यात भारतीय संघ माहीर आहे.


मालिकेत दमदार पुनरागमन करण्याची क्षमता भारतीय संघाकडे आहे
. याच जोरावर भारताने सलग सात कसोटी सामन्यांमध्ये विजय मिळवत कसोटी संघांच्या क्रमवारीमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात पराभवाचा झटका बसल्याने भारताच्या यशस्वी वाटचालीला सप्तम पदावर पूर्णविराम लागला. मात्र, दमदार पुनरागमन करण्यात माहीर असणारा भारतीय संघ दुसर्‍या कसोटी सामन्यात नक्कीच पुनरागमन करेल, अशी आशा तमाम क्रिकेटप्रेमींना आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली यानेही नुकतेच याबाबत स्पष्ट संकेत दिले आहेत. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना कर्णधार कोहली म्हणाला, “एका पराभवामुळे काही जग संपत नाही. आम्हाला मान्य आहे की, आम्ही चांगला खेळ केला नाही. मात्र आम्ही आमच्या चुका सुधारण्यावर लक्ष केंद्रित करत असून पुढच्या सामन्यात यापेक्षाही चांगला खेळ करून दाखवू.” कर्णधार कोहलीचे हे विधानच सांगत आहे की, भारतीय संघ पुनरागमन करण्यासाठी जोरदार तयारी करत आहे.



दोष नेमका कुणाचा
?



२०२०च्या पहिल्याच कसोटी मालिकेच्या सामन्यामध्ये भारताला पराभवाचा सामना करावा लागला
. सलग सात कसोटी सामने जिंकणार्‍या भारतीय संघाची परदेशी धरतीवर खेळताना दाणादाण उडाली. कसोटी क्रिकेटच्या क्रमवारीत अव्वल स्थानी असणार्‍या भारतीय संघावर डावासह पराभवाची नामुष्की ओढवणार होती. मात्र, अंतिम क्षणी गोलंदाजांनी सावध फलंदाजी केल्याने भारताला डावासह पराभवाची नामुष्की टाळता आली. न्यूझीलंडने भारतावर दहा गडी राखून दणदणीत विजय मिळवला. कसोटी क्रिकेटच्या क्रमवारीत अव्वल स्थानी विराजमान असणार्‍या भारतीय संघाचा असा पराभव होणे, ही लाजिरवाणी बाब आहे. या पराभवासाठी दोष नेमका कुणाचा? याबाबत क्रिकेट वर्तुळात मंथन सुरू असून क्रिकेट समीक्षकांनी विविध मुद्द्यांवर बोट ठेवण्यास सुरुवात केली आहे. पहिल्या डावात भारतीय फलंदाजांनी फक्त १६५ धावा केल्या. सामना झाल्यानंतर कोहलीने मान्य केले की, पहिल्या डावात जर २२०-२३० पर्यंत धावसंख्या केली असती तर बरे झाले असते. आपली कामगिरी व्यवस्थितरित्या पार पडण्यात फलंदाज कमी पडले, हे कोहलीने स्वतःच मान्य केले. दुसर्‍या डावातदेखील भारतीय संघाला १९१ धावा करता आल्या. दोन्ही डावात भारताला २०० चा आकडाही पार करता आला नाही.



सलामीवीर फलंदाज रोहित शर्माच्या जागी पृथ्वी शॉला संधी मिळाली
, पण तो प्रभाव पाडू शकला नाही. पुजारा, कोहली हे अनुभवी फलंदाजदेखील अपयशी ठरले. मयांक आणि अजिंक्य रहाणे यांनीच थोड्या धावा केल्या. मात्र, तेही डाव सावरण्यात अपयशी ठरले. माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मणने कोहलीच्या कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. भारताने सामन्यात न्यूझीलंडवर दबाव ठेवला नाही. नव्या चेंडूचा कोहलीला वापर करता आला नाही. दिवसाच्या सुरुवातीला त्याने जलदगती गोलंदाजांना संधी देणे गरजेचे होते. पण चौथ्याच षटकात त्याने अश्विनला गोलंदाजी दिली. हे चुकीचे आहे, असे मत त्याने व्यक्त केले. पहिल्या डावात न्यूझीलंडच्या सात विकेट २२५ धावांवर गेल्या होत्या. पण त्यानंतर शेवटच्या तीन खेळाडूंनी १२३ धावा केल्या. ९ व्या क्रमांकावर आलेल्या जेमिसनने ४४ तर ट्रेंट बोल्टने ३९ धावा केल्या आणि संघाला १८३ धावांची आघाडी मिळून दिली. जर भारताने १०० धावांनी आघाडी कमी केली असती, तर त्याचा फायदा झाला असता, असेही मत व्यक्त केले जात आहे.



- रामचंद्र नाईक
Powered By Sangraha 9.0