महाविकास आघाडीचे आव्हान नाही : भाजप नेते नरेंद्र पवार यांची स्पष्टोक्ती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Feb-2020
Total Views |


narendra pawar 1 _1 


 

सर्वसामान्यांसाठी झटणारा नेता म्हणून भाजप नेते नरेंद्र पवार यांची सर्वत्र ओळख आहे. कल्याण पश्चिम विधानसभेचे आमदार म्हणून नरेंद्र पवार यांनी २०१४ ते २०१९ या काळात उत्तम काम केले आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत युती धर्मानुसार कल्याण पश्चिमेची जागा शिवसेनेला सोडल्यानंतर अपक्ष निवडणूक लढवत त्यांनी या मतदारसंघात ४४ हजारांपेक्षा जास्त मते घेतली. आपल्या आमदारकीच्या कार्यकाळात विविध कार्यक्रमांच्या व उपक्रमांच्या माध्यमातून महाराष्ट्रभर चांगले काम केले आहे. यासोबतच संपूर्ण महाराष्ट्रभर पक्षवाढीचे कामही त्यांनी केले आहे. 'दै. मुंबई तरुण भारत'चे प्रतिनिधी अजय शेलार यांनी विविध मुद्द्यांवर त्यांच्याशी केलेली ही खास बातचीत...

 
 

कल्याणमधील बहुचर्चित डम्पिंगच्या गंभीर मुद्द्याबाबत आपले मत काय?

 

निश्चितच. डम्पिंगचा मुद्दा हा गंभीरच आहे. अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांची अनास्था यामुळे हा प्रश्न अजूनही तसाच आहे. यात असलेले आर्थिक साटेलोटे, काम न करता निघणारी बिले, यातून मिळणारा मलिदा यासाठी हे काम काहीजणांना करू द्यायचे नाही. मात्र मी हा प्रश्न मार्गी लागावा, यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करून निधी आणला. या कामाला गती आणली. हा प्रश्न मार्गी लावण्यात भरपूर यशही मला आलेले आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून १२२ कोटी रुपये मिळवण्यात यश आले आहे. टेंडर पोझिशन, प्लान पोझिशन, ज्या कंपनीला टेंडर दिले आहे, त्यांच्या कामाची गती यामुळे हा प्रश्न मार्गी लागण्यात अडचणी येत होत्या, मात्र एका वर्षभरात हे काम पूर्णत्वास जाईल, ही ग्वाही मी कल्याणकरांना देऊ इच्छितो आणि मला खात्री आहे की, नागरिक याच्यावर विश्वास ठेवतील, कारण मी या प्रश्नावर केलेल्या पाठपुराव्याचे ते साक्षीदार आहेत. त्यामुळे डम्पिंगचा प्रश्न मार्गी लागला की प्रदूषणाचा प्रश्नही संपेल.

 

वाहतूककोंडीच्या समस्येवर मार्ग काढण्यासाठी नेमक्या काय उपाययोजना केल्या पाहिजेत?

 

पत्रीपूल, गांधारी पूल, दुर्गाडी, शहाड यांसारखे काही पूल अत्यंत जुने झाले आहेत. यातील गांधारी पूल, शहाड ब्रिजच्या कामांसाठी मी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे, तर काही पुलांचा सर्व्हे होऊन त्याला पर्यायी मार्ग उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. ज्यामुळे भविष्यात वाहतूककोंडीच्या समस्येचे निवारण करता येईल. त्याचबरोबर अंतर्गत रस्त्यांवरचे अतिक्रमण हटवून ते मोकळे करणे गरजेचे आहे. महत्त्वाचे म्हणजे सिग्नल यंत्रणा सक्षम होणे गरजेचे आहे. त्याला प्राधान्य देणे, हे माझ्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. तसेच काँक्रिटीकरण रस्त्यांमुळे खड्ड्यांचा प्रश्न मार्गी लागेल आणि त्यासाठी प्रकर्षाने आग्रही भूमिकेत मी असेन.

 

फेरीवाल्यांचे वाढते अतिक्रमण रोखण्यासाठी काय केले पाहिजे?

 

फेरीवाल्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून दिल्यास ते रस्त्यावर बसणार नाहीत. त्यांना हटविण्यासाठी कारवाई होते, पण ती तात्पुरती असल्याने पुन्हा हे अतिक्रमण वाढते, यासाठी मी काही पर्याय सुचवले आहेत. पण अधिकारीवर्गाची अनास्था याला कारणीभूत आहे.

 

२७ गावांबाबत तुमची नेमकी भूमिका काय?

 

याबाबत माझी भूमिका अशी आहे की, त्यांची स्वतंत्र नगरपालिका झाली पाहिजे. कल्याण पश्चिममध्ये असलेल्या उंबर्डे, सापर्डे, वाडेघर, अटाळी, टिटवाळा-मांडा, अटाळी यांसारखी महानगरपालिकेत असलेली गावे यांचा अद्याप हवा तसा विकास झाला नाही. तर नवीन आणखी गावे घेऊन कसा विकास साधणार आहात? त्यामुळे स्वतंत्र नगरपालिका झाली तरच या २७ गावांचा विकास होईल. त्यामुळे स्वतंत्र नगरपालिका झाली पाहिजे, या मताशी मी ठाम आहे.

 

पालिकेचे अधिकारी लोकप्रतिनिधींना जुमानत नाहीत, याविषयी आपले काय मत आहे.?

 

महापालिकेला लागलेले लाचखोरीचे ग्रहण आणि अधिकारीवर्गाची मुजोरशाही यामुळे येथील विकासाला खीळ बसली आहे. माझ्या मते एका ठराविक काळानंतर त्यांच्या बदल्या वेगळ्या शहरात करणे गरजेचे आहे. जेणेकरून चुकीचे काम करणारी बिल्डर लॉबी, ठेकेदार आणि त्यांच्यावर अंकुश ठेवणे लोकप्रतिनिधींना शक्य होईल. त्याचबरोबर लोकहिताच्या कामांसाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी एकत्रच असायला हवे, तरच तुमची जरब या कामचुकार अधिकाऱ्यांवर राहील, असे माझे मत आहे.

 

भाजप-मनसे युतीबाबत काय सांगाल?

 

तो सर्वस्वी पक्षश्रेष्ठींचा निर्णय असेल, मात्र माझ्या मते तळागाळात उतरून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या जीवावर उभा राहिलेला, लोकांशी नाळ असलेला आणि विचारधारेशी प्रामाणिक असलेला भाजप हा सक्षम पक्ष आहे. या युतीची गरज आम्हाला लागणार नाही.

 

महाविकास आघाडीचे भवितव्याबाबत तुमचे मत काय?

 

भाजपला यामुळे फरक पडेल असे वाटत नाही. काँग्रेस, राष्ट्रवादीला जनतेने नाकारलेलेच आहे. ही काही युतीतून आलेली सत्ता नाही. ती खुर्चीसाठी एकत्र येऊन विचारधारेला मूठमाती देऊन स्थापन केलेली ही महाविकास आघाडी आहे. भाजप हा केवळ सत्ताकारण घेऊन राजकारण करत नाही, विचारधारेवर चालणारा आमचा पक्ष आहे. विचारधारेशी प्रमाणिक नसलेली लोक फार काळ टिकत नाहीत. खरं तर विचारधारेवर नैतिकता अवलंबून असते. माझ्या मते विचारधारा आणि नैतिकता या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि जेव्हा याला डावलून तुमची कृती होते. तेव्हा ते नाण राहत नाही ते वाईसर म्हणून लोक वापरतात आणि त्याला खिळा ठोकतात. त्यामुळे येणाऱ्या काळात त्याचे परिणाम दिसून येतील. त्यामुळे हे आमच्यासाठी आव्हान नाही.

 

पक्षसंघटनेने आपला राजीनामा नामंजूर करण्याचा निर्णय घेतला, त्याविषयी काय सांगाल?

 

मी घेतलेला निर्णय हा कल्याण पश्चिम विधानसभा अपक्ष निवडणूक लढवत असताना आपल्यामुळे भारतीय जनता पक्ष अडचणीत येऊ नये म्हणून भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. मात्र, पक्षाने तो नामंजूर करून पुन्हा मला सक्रिय होण्यास सांगितले आहे. मी सक्रिय होतो आणि आहेच. माझे काम कुठेही थांबलेले नाही. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर लगेच पुन्हा दुसऱ्याच दिवशी मी काम सुरू केले. माझ्याकडे आजही लोकांचा राबता तेवढाच आहे, माझा संपर्क कुठेही कमी झालेला नाही. माझी लोकांप्रती काम करण्याची तळमळ याच्याशी आजही मी तितकाच प्रमाणिक आहे. निवडणुकीत माझ्याविरोधात ज्यांनी काम केले, त्यांच्याबद्दल कुठलाही आकस माझ्या मनात नाही. त्यांनी त्यांचा युतीधर्म पाळला. त्यामुळे जे सोबत होते, तेही माझेच आणि विरोधात गेले तेही माझेच. मी माझी हार विसरलो आहे आणि पक्षवाढीच्या दृष्टीने कार्यकर्त्यांना घेऊन पुन्हा जोमाने काम सुरूही केले आहे.

 

फडणवीस सरकारच्या काळात केलेल्या कामांचा फायदा यंदाच्या स्थानिक निवडणुकीत कसा होईल?

 

नक्कीच याचा सकारात्मक प्रभाव पडेल. डम्पिंगची समस्या असेल, विविध ब्रिजची समस्या असेल, त्यासाठी लागणारा निधी, मेट्रोचा प्रकल्प असेल, स्मार्ट सिटीचा प्रकल्प असेल. एमएमआरडीएची काही कामे असतील, त्याचबरोबर कल्याणचा कायापालट करण्याच्या दृष्टीने अनेक महत्त्वाची कामेही मार्गी लागणार आहेत. त्यांनी राबविलेल्या योजना या लोकांपर्यंत आम्ही घेऊन जाऊ आणि त्याचा निश्चितच फायदा होणार आहे. त्यामुळे अनेक मार्गी लावलेले महत्त्वपूर्ण प्रकल्प, प्रामाणिक राहून विकासाची दूरदृष्टी ठेवून फडणवीस सरकारने केलेली कामेही लोक नक्की लक्षात ठेवतील, असा ठाम विश्वास आहे.

 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@