‘सड्यां’वर सावट

    दिनांक  24-Feb-2020 12:06:34
|

pletaue _1  H x


कोकणातील सड्यांवर (कातळ पठार) विकास प्रकल्पांचे सावट आहे. येणारे प्रत्येक नवीन सरकार या सड्यांवर विकास प्रकल्पाचे नियोजन करतेच. त्यानंतर सुरू होतो तो संघर्ष. विद्यमान मुख्यमंत्र्यांनी नुकतेच रत्नागिरी शहरातील चपक मैदानाच्या सड्यावर ‘मरिन’ किंवा ‘मँगो’ पार्क उभारण्याची घोषणा केली आहे. त्याविषयी...


सड्यावरच्या रानफुलांचे म्हणणे...

सहज फुलू द्यावे फूल,

सहज दरवळावा वास

अधिक काही मिळवण्याचा,

करू नये अट्टहास

सुवास, पाकळ्या, पराग, देठ,

फूल इतकीच देते ग्वाही

अलग अलग करू आता,

हाती काहीच उरत नाही...१९९२ ची गोष्ट आहे. रत्नागिरी शहराच्या किनारी भागातील २०० हेक्टर जमीन ‘महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळा’ने (एमआयडीसी) ‘स्टरलाईट’ कंपनीला ‘कॉपर स्मेल्टिंग प्लान्ट’ उभारण्यासाठी दिली. सुमारे ७०० कोटी रुपयांच्या या प्रकल्पाची क्षमता वर्षभरात ६० हजार टन तांबे निर्माण करण्याची होती. माडाच्या बागा, समुद्राच्या सान्निध्यात रमणार्‍या कोकणी माणसाला हा प्रकल्प फारसा काही रुचला नाही. आंबा, काजू आणि मासेमारीवर अवलंबून असणार्‍या व्यापार्‍यांनी या प्रकल्पाला विरोध करायला सुरुवात केली. प्रस्तावित मिर्‍या बंदरामुळे किनार्‍याची धूप होणार हे लक्षात आल्यावर सगळे रत्नागिरीकर आंदोलनात सहभागी होऊ लागले. या प्रकल्पामुळे जैवविविधतेचे नेमके काय नुकसान होईल, यासंबंधीची वैज्ञानिक माहिती त्यावेळी आंदोलन करणार्‍यांकडे उपलब्ध नव्हती. आंबा, काजूच्या पिकावर तापमानाचा परिणाम होणार आणि उत्पादन कमी होणार अशी केवळ अटकळ होती. प्रस्तावित मिर्‍या बंदरामुळे ‘ब्रेक वॉल’ बांधावी लागणार आणि पाण्याचा प्रवाह बदलून मासेमारी प्रभावित होईल, असे जुन्या जाणत्या माणसांचे म्हणणे होते. स्थानिक ग्रामपंचायतीने कंपनीला काम करण्याची परवानगी नाकारली आणि संघर्षाची ठिणगी पडली. त्यानंतर कोर्टाच्या पायर्‍या झिजवण्याचे काम सुरू झाले. दरम्यानच्या काळात प्रकल्पाचा पर्यावरणीय अहवालही करून घेण्यात आला. यात किनारपट्टीची होणारी धूप, प्रकल्पामुळे निर्माण होणारे प्रदूषण आणि त्याचा इथल्या बागायतीवर होणारा दुष्परिणाम अधोरेखित करण्यात आला होता. एके दिवशी अशाच जमलेल्या जमावाने कंपनीचे काम बंद पाडले. त्याचा परिणाम म्हणून तत्कालीन जिल्हाधिकार्‍यांनी प्रकल्प स्थगित करत असल्याचे घोषित केले आणि कंपनीने इथून आपला गाशा गुंडाळला. अशा पद्धतीने प्रदूषणकारी प्रकल्प कोकणातून हद्दपार करण्यात लोकांना यश आले.

यानंतर ही जागा पडूनच होती. या जागेची भौगोलिक रचना पाहिली, तर डोळ्यासमोर येते ते कातळाचे सपाट मैदान. त्यामध्ये असलेली पाणथळ तळी आणि विस्तीर्ण गवताळ कुरणे. नगर परिषदने यामधील एका बाजूचा डम्पिंग ग्राऊंड म्हणून वापर केला. बाकी सगळ्या जागा झुडुपी जंगलाने आणि गवताने वेढल्या. दरवर्षी पावसाळ्यात या विस्तीर्ण कातळावर एखादी रंगीबेरंगी चादर पांघरावी, तशी कातळ फुले उगवू लागली आणि तळ्यांमध्ये स्थलांतरित पक्ष्यांनी येणे सुरू केले. या प्रक्रियेमुळे काही वर्षांमध्ये येथील संपूर्ण परिसरात एकमेकांवर अवलंबून असणारी परिपूर्ण ‘इकोसिस्टीम’ तयार झाली.

आता या सगळ्याची आठवण होण्याचे कारण म्हणजे, मुख्यमंत्र्यांच्या नुकत्याच पार पडलेल्या सिंधुदुर्ग दौर्‍यामध्ये त्यांनी या जागेवर ‘मरिन’ किंवा ‘मँगो’ पार्क उभारण्याची केलेली घोषणा. कोकणामध्ये सध्या रोजगार निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावर विविध प्रकल्पांना आमंत्रित करण्याचे काम सुरू आहे. त्यामध्ये नाणारची रिफायनरी असेल किंवा जिंदालचा औष्णिक विद्युत प्रकल्प. या प्रकल्पांना स्थानिक जनतेकडून मोठ्या प्रमाणावर विरोध होत आहे. इथल्या लोकांचा विकासाला विरोध मुळीच विरोध नाही. याउलट हे विनाशकरी प्रकल्प ज्या पद्धतीने येथील स्थानिकांच्या माथ्यावर लादले जात आहेत त्याला विरोध आहे. खरेतर इथले समुद्रकिनारे आणि इतर पर्यटन स्थळांचा विकास करून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होऊ शकते. मात्र, अशा प्रकारचे प्रकल्प राबविण्यापेक्षा विनाशकारी प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू आहे.

गेल्या काही वर्षांपासून रत्नागिरीतील ‘लेन्स आर्ट ग्रुप’ चंपक मैदान आणि सभोवतालच्या परिसरातील जैवविविधतेचे चित्रण करत आहे. त्यांनी केलेल्या चित्रणातून येथील जैवविविधता आज सर्वांसमोर आली आहे. रत्नागिरीमध्ये कोल्हापूर महामार्ग ज्या ठिकाणी सुरू होतो तिथे आपण पोहोचल्यावर समोर येतो तो हा चंपक मैदानाचा परिसर. साध्या नजरेला ही कातळ जमीन उजाड आणि वैराण वाटते. सुकलेले गवत, आटलेले पाणी आणि भाजणार्‍या उन्हाच्या झळा या परिसराचे रूपांतर वाळवंटात करतात. अशाच तप्त वातावरणात वर्षा ऋतूची चाहूल लागते आणि पहिल्या सरी या कातळावर बरसतात. इथूनच एका रुपांतरणाला सुरुवात होते. सीतेची आसवं आषाढ हबेआमरी, दीपकाडी यांसारख्या वनस्पती कातळ फोडून प्रकट होतात. जांभळ्या, पांढर्‍या, गुलाबी रंगाची उधळण करत कातळ पठार अचानक इंद्रधनुष्यासारखा रंगीबेरंगी होतो. तुतारी, सोनकी, कुर्डू, भारंगी, तेरडा अशा एकाहून एक वनस्पती आणि त्यांची रंगीबेरंगी फुले पाहण्यात मन हरवून जाते. सातार्‍यातल्या कास पठाराशी स्पर्धा करेल एवढ्या जातीच्या फुलांचा गालिचा याठिकाणी पसरला जातो. त्यानंतर स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन होते. लेसर व्हिस्टलिंग टील, पिंटेल यांसारखी बदके, चातक, पावश्यासारखेककु इथे दिसू लागतात. घारी, गाय बगळे, करकोचे, टिटव्या, ल्हावे, वेडा राघूसारखे पक्षी इथले कायमचे रहिवासी. कोतवाल, मैना, पोपट, मोर, खाटीक डोळ्याला सहज दिसतात.

श्रावण मासातील इथली हिरवळ आणि रंगीबेरंगी फुले यांचा संयोग अचंबित करणारा असतो. गवत वाढायला लागले की, मग ‘हॅरियर इगलआणि ससाणे इथे घिरट्या घालू लागतात. गेल्या काही वर्षात ‘रेड नेकड फाल्कन’, ‘शाहीन फाल्कन’, ‘पेरिग्रिन फाल्कन’, ‘अमुर फाल्कन’ इथे आढळून आले आहेत. ‘स्नाईप प्लोवरसारखे किनारी पक्षीदेखील या परिसरात आपली हजेरी लावतात. असे तब्बल ९० पेक्षा जास्त प्रकारचे पक्षी, ४० हून अधिक प्रकारची कातळ फुले, कोल्हे, साळिंदरसारखे प्राणी आणि फुलपाखरांच्या ३० हून अधिक प्रजाती या कातळावर आढळल्याची नोंद आहे. असा हा जैवविविधतेने नटलेला परिसर लवकरच एखाद्या प्रकल्पाच्या उभारणीसाठी वापरला जाणार आहे. कोकणाला विकासाची गरज आहे, हे खरेच आहे. परंतु, तो विकास हा चिरस्थायी असावा असे याप्रसंगी वाटते. ही सर्व जैवविविधता नष्ट न करता काही मार्ग काढता येईल का, याची चाचपणी होणे गरजेचे आहे. सद्यस्थितीत सरकारने इथल्या जैवविविधतेचे मूल्यमापन करून योजना ठरवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. ‘कास’च्या धर्तीवर या परिसरात पर्यावरण पर्यटन करणे शक्य असल्यास प्रसंगी तो मार्गही अवलंबला जावा. ‘एमआयडीसी’ने यामधील पर्यावरणीय संवेदनशील भाग संरक्षित करावा आणि कोकणाचा अनमोल ठेवा जपावा, हीच काय ती मागणी.


सडा एक परिसंस्था

‘परिसंस्था’ म्हणून एखाद्या प्रदेशाचा विचार केल्यास तेथील भूरूप आणि तिथे वाढलेला निसर्ग (वनस्पती, प्राणी इ.) या दोन्ही गोष्टी त्यामध्ये दगड, दगडांमधल्या भेगा आणि खाचखळगे, त्यात साचणारी माती, पावसाळी तळी अशा अनेक छोट्या-छोट्या अधिवासांनी आणि त्यावरील रानफुलोरा, गवतवर्गीय वनस्पती, कीटक आणि प्राणी यांनी मिळून ‘सडा’ ही एक परिसंस्था तयार होते. सड्यावरच्या प्रत्येक छोट्या अधिवासात असणारी जैवविविधता वेगळी आहे. ‘जांभा दगड’ हे सड्याचे मुख्य वैशिष्ट्य. शिवाय सड्यावर पडणारे पावसाचं पाणी, त्यात मिसळणारी सूक्ष्मद्रव्य (मायक्रोन्युट्रियन्स) आणि त्यांचे पाण्याद्वारे होणारे वहन, तसेच सड्यांवर परागीभवन करणार्‍या कीटकांची होणारी पैदास या सगळ्या प्रक्रिया ‘सडा’ या परिसंस्थेचा अविभाज्य भाग आहेत.


सड्यांचे महत्त्व काय ?

सड्यांना ‘ग्रासलॅण्ड’ म्हणण्यापेक्षा ‘आऊटक्रॉप इकोस्टिटीम’ म्हणणे योग्य ठरते. ज्या भूभागावर ‘गवत’ हीच प्रामुख्याने आढळणारी वनस्पती प्रजाती असते त्या भूभागाला सर्वसाधारणपणे गवताळ प्रदेश म्हटले जाते. सड्यांवरही वर्षातला काहीकाळ गवत भरपूर उगवत असल्यामुळे भारतात अधिवासाचे वर्गीकरण करताना सड्याला गवताळ प्रदेशांमध्ये समाविष्ट केले गेले आहे. मात्र, आफ्रिका, अमेरिका, उत्तर भारत, मराठवाडा, इ. भागांमध्ये जे मोठे गवताळ प्रदेश आहेत, त्यांचे वैशिष्ट्य असे की, तिथे दगडांची झीज होऊन जी सूक्ष्मद्रव्ययुक्त माती तयार झाली आहे, त्या मातीत गवत वाढते. सड्यांवर मातीचे प्रमाण अत्यल्प असते. कारण, खडकाची झीज होऊन माती तयार होण्याच्या वेगाच्या तुलनेत, तयार होणारी माती आणि सूक्ष्मद्रव्ये पावसाने धुऊन जाण्याचा नैसर्गिक वेगच जास्त असतो. त्यामुळे गवताव्यतिरिक्त काही कंदवर्गीय वनस्पती (Geophytes), ‘युट्रीक्युलारिया’ सारख्या कीटकभक्षी वनस्पती (Carnivorous plants) आणि ‘इरिकॅल्युऑन’ सारख्या प्रजाती, ज्या इतरत्र तुरळक आढळतात, त्या सड्यांवरती प्रचंड प्रमाणात दिसतात. हे सड्याचे एक वेगळेपण आहे.


सडे कुठे आढळतात ?

सड्यांसारख्या फार कमी परिसंस्था जगात आढळतात. भारतात मेघालयामध्ये असलेले वा चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर असलेले चुनखडीचे भूभाग हा सड्यांचाच एक प्रकार म्हणता येईल. तेथील परिसंस्थेची वैशिष्ट्ये वेगळी आहेत. पश्चिम किनारपट्टीवर केरळपर्यंत, तसेच महाबळेश्वर, बेळगाव इ. सह्याद्रीच्या माथ्यावर मोठाले सडे आहेत. मराठवाड्याच्या दक्षिण भागात जत, बिदर इ. भागांमध्ये असेच फार प्राचीन सडे पाहायला मिळतात. ओडिशामध्येही खूप विस्तृत असे सडे आहेत. तिथे ‘साल’चे जंगल मोठ्या प्रमाणावर आढळते. मध्यप्रदेश, छत्तीसगढमध्येही बेलाडी वगैरे ठिकाणी सडे आढळतात. मात्र, पश्चिम घाट, कोकण आणि मलबार किनारपट्टीवरचे सडे हे जैवविविधतेच्या बाबतीत सर्वाधिक श्रीमंत आहेत. जगाचा विचार केला, तर ब्राझील, आफ्रिकेतील आयव्हरी कोस्ट, मादागास्कर आणि ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये विस्तृत सडे पाहायला मिळतात.

-प्रतीक मोरे

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.