दिल्लीत आंदोलकांच्या गटात दगडफेक

23 Feb 2020 19:48:14
Jafarabad_1  H
 

मेट्रो स्थानक बंद !


नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत जिथे डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त तैनात आहे, तर दुसरीकडे मौजपुर जाफराबाद येथील मेट्रो स्थानकाबाहेर सुरू असलेल्या सीएए आणि एनआरसी विरोधातील आंदोलनादरम्यान दगडफेक झाल्याने हिंसाचार उफळून आला आहे. विरोध करणाऱ्या आंदोलकांच्या घोषणांमुळे सीलमपूर, मौजपूर आणि यमुना विहार येथे जाणारे रस्ते बंद केले आहेत.
 
 

जाफराबाद येथे रविवारी सायंकाळी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान दोन गटांमध्ये जोरदार दगडफेक झाली. दरम्यान, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीसांतर्फे अश्रूधूर सोडण्यात आला आहे. संयुक्त पोलीस आयुक्त (पूर्वीय विभाग) आलोक कुमार यांनी पोलीसांवरही दगडफेक झाल्याची माहिती दिली आहे. सध्या स्थिती नियंत्रणात असून सुरक्षाकर्मी तैनात केले असल्याचे त्यांनी सांगितले. डिसेंबरमध्ये अशाप्रकारच्या हिंसक घटना उघडकीस आल्या होत्या.
 
 
दगडफेक झाल्याने मेट्रो स्थानक बंद करण्यात आले आहे. मेट्रो प्रशासनाने ट्विट करत ही माहिती दिली आहे. उत्तर प्रदेशच्या अलिगढ येथील रॅली दरम्यानही हिंसाचार उफाळून आला आहे. एनआरसी आणि एनपीआर दरम्यान झालेल्या आंदोलनात जोरदार दगडफेक झाली. पोलीसांच्या गाड्यांचीही तोडफोड करण्यात आली. स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीसांना लाठीचार्ज करावा लागला.
 


जाफराबादमध्ये झाले काय ?

  
 
जाफराबादमध्ये झालेल्या आंदोलनात बहुतांश महिलाच होत्या. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, या आंदोलकांची संख्या ही शंभरपेक्षा कमी होती. आंदोलकांनी एनआरसी आणि एनपीआर मागे घेण्याची मागणी केली होती. दरम्यान, जाफराबादच्या मुख्य मार्गावर हे आंदोलन सुरू होते. पोलीसांनी रस्ता मोकळा करण्याचे आवाहन केले होते. याच दरम्यान, दोन्ही गटादरम्यान दगडफेक झाली, पोलीसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रुधूराचा वापर करावा लागला. परिस्थिती सध्या नियंत्रणात असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.




Powered By Sangraha 9.0