काँग्रेस सोबत जाऊनही...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Feb-2020
Total Views |
Uddhav Thackeray Meets PM
 


नरेंद्र मोदींनी व्यवस्थित शाळा घेतल्याने उद्धव ठाकरेंना आपण मुख्यमंत्री का झालो, आपले कर्तव्य काय, हे आठवले. पंतप्रधानांनी सीएएचा अर्थ व्यवस्थित समजावल्याने नागरिकत्व सुधारणा कायदा ठाकरेंच्या मन-मेंदूत पूर्णपणे उतरला. परिणामी "सीएएला घाबरण्याचे कारण नाही," अशी भूमिका शिवसेना पक्षप्रमुखांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत घेतली.

 

"नागरिकत्व सुधारणा कायद्याला (सीएए) घाबरण्याचे कारण नाही," अशी भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकतीच दिल्लीतील पत्रकार परिषदेत घेतली. तत्पूर्वी केंद्र सरकारने संसदेत सीएएसंदर्भातील विधेयक सादर केले, त्यावेळी शिवसेनेने लोकसभेत समर्थन तर राज्यसभेत विरोध असा खेळ मांडला होता. सेनेचे त्रिकालज्ञानी खासदार संजय राऊत यांनी राज्यसभेत आपल्या पक्षाच्या कोलांटउड्यांची कारणमीमांसाही केली होती. लोकसभेतील सेना खासदार बिनडोक असल्याचे स्पष्ट करत संजय राऊत यांनी जम्मू-काश्मीर आणि कलम ३७० रद्दीकरणामुळे सीएएला विरोध करत असल्याचे सांगितले होते. पुढे उद्धव ठाकरे यांनीही तळ्यात-मळ्यात करत सीएएवरून विरोध की समर्थन, अशा झोकांड्या घेतल्या.

 

दिल्लीकर 'मातोश्री' आणि बारामतीकर 'काकाश्री' या नव्या मालकांची मर्जी सांभाळण्याची तारेवरची कसरत ठाकरेंना करावी लागत असल्याचेही त्यातून कळत होते. परंतु, सत्तेचे दिवस जसजसे जाऊ लागले, तसतसे उद्धव ठाकरेंनी दोन्हीकडच्या तोलाचा विचार न करता सरळ सीएएच्या समर्थनार्थ तोंड उघडले. काँग्रेससोबत जाऊनही आपल्या मनातले बोलत सीएएला पाठिंबा देणार्‍या शिवसेना पक्षप्रमुखांच्या भूमिकेचे प्रथमतः कौतुक करायला हवे. कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या टेकूवर तगलेले सरकार किती दिवस चालेल, हे माहिती नसले तरी ते राज्याचे घटनादत्त मुख्यमंत्री आहेत आणि त्यांनी घटनेला अभिप्रेत अशीच भूमिका घेतली. उद्या हे सरकार राहिले काय किंवा न राहिले काय, पण उद्धव ठाकरेंनी आपल्या हिंदुत्वनिष्ठ, राष्ट्रवादी वडिलांना दिलेल्या शब्दाची लाज राखल्याची नोंद तर होईलच.

 

तथापि, उद्धव ठाकरेंना यासाठी दिल्लीला जात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घ्यावी लागली, हेही खरेच. नरेंद्र मोदींनी व्यवस्थित शाळा घेतल्याने ठाकरेंना आपण मुख्यमंत्री का झालो, आपले कर्तव्य काय, हे आठवले. पंतप्रधानांनी सीएएचा अर्थ व्यवस्थित समजावल्याने नागरिकत्व सुधारणा कायदा उद्धव ठाकरेंच्या मन-मेंदूत पूर्णपणे उतरला. परिणामी, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या संसर्गाने हिंदूद्रोही झालेले उद्धवरावांचे रक्त मोदींच्या केवळ दर्शनमात्रेने हिंदुत्वाकडे-राष्ट्रवादाकडे धावू लागल्याचे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्यातूनच आपण नेमके कोणाचे वारस हे दाखवून देण्याची 'हीच ती वेळ' असा विचार उद्धव ठाकरे यांनी केला. पंतप्रधानांच्या भेटीसमोर त्यांना १० जनपथवाल्या मॅडम वा सिल्व्हर ओकवाल्या साहेबांचे डोळे वटारण्याचेही भान राहिले नाही. आपल्या अंतःकरणातल्या भावना व्यक्त करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी प्रवक्ते संजय राऊत यांच्यासह पत्रकार परिषद घेतली आणि सीएएला समर्थनाची भूमिका विशद केली. परंतु, यावेळी ठाकरेंच्या बाजूला बसलेल्या अतिशहाण्या राऊतांची अवस्था नेमकी कशी झाली असेल? कारण तीन-चार महिन्यांपूर्वी त्यांनीच सीएएला पाठिंबा देणार्‍या आपल्या पक्षाच्या खासदारांना निर्बुद्ध ठरवले होते. उद्धवरावांनी मात्र दिल्लीत जाऊन, संजय राऊतांना शेजारी बसवून कोण खरा अक्कलवंत हे दाखवून दिले. तसेच नागरिकत्व सुधारणा कायदा म्हणजे नेमके काय, सीएएमुळे शेजारील देशांतील धार्मिक अल्पसंख्याकांना कशाप्रकारे नागरिकत्व दिले जाते, सीएएने देशातील कोणाचेही नागरिकत्व काढून घेतले जात नाही, हेदेखील ते सर्वांना समजावून सांगू लागले. उद्धव ठाकरेंच्या या एकाच विरोधरेषेतल्या धावाधावीनंतरच्या थेट ३६० अंशातील यु-टर्नचे म्हणूनच आपणही स्वागत केले पाहिजे.

 

परंतु, हा केवळ एक मुद्दा झाला, उद्धव ठाकरेंना परत मागे फिरण्याचे इतर कितीतरी पर्याय उपलब्ध आहेत. पहिला मुद्दा म्हणजे आपलेच हात अडकल्यासारखा थयथयाट करणार्‍या शरद पवारांवर मात करत उद्धव ठाकरेंनी कोरेगाव-भीमा प्रकरणी ठाम भूमिका घ्यावी. एल्गार परिषद, कोरेगाव-भीमातील हिंसाचार आणि शहरी नक्षलवादाचा एकमेकांशी संबंध नसल्याचा पवारांचा दावा पोकळ असल्याचे सांगत खर्‍याच्या पाठीशी उभे राहावे. तसेच एनआयएला या सगळ्याच घडामोडींचा तपास करण्यात आडकाठी आणू नये. दुसरा मुद्दा म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर! काँग्रेस नेते राहुल गांधींपासून त्या पक्षाचा गल्लीबोळातला कार्यकर्ताही सावरकरांबद्दल अपशब्द वापरताना दिसतो. भाजपने वेळोवेळी त्यावर आक्षेप घेतलाच, पण स्वतःला सावरकरानुयायी म्हणवून घेणार्‍या उद्धव ठाकरेंनीही सावरकरांच्या अपमानावर बोलावे.

 

काँग्रेसच्या पाठिंब्यावर मिळालेली सत्तेची शिदोरी भिरकावून देत त्यांनी हिंदुत्ववादी-राष्ट्रवादी विचारांची पुरचुंडी सांभाळण्याची हिंमत दाखवावी. तसेच आता उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौर्‍याचेही घाटत आहे. विधानसभा निवडणुकीनंतर गांधी-पवारांच्या संभाव्य नाराजीमुळे जे शक्य झाले नाही, ते कर्तृत्व ठाकरे या दौर्‍यातून गाजवतील, असे चित्रही शिवसेनेकडून निर्माण केले जात आहे. उद्धव ठाकरेंना खरेच कर्तृत्व गाजवायचे असेल तर मग त्यांनी राम मंदिरावर रोखठोक भूमिका घ्यावी. काँग्रेस वा राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांच्या मुस्लीम मतपेटीचे चोचले न पुरवता श्रीराम मंदिराचे स्पष्ट शब्दांत समर्थन करावे. मशिदीसाठी ट्रस्ट का नाही, या साहेबांच्या विधानाचा समाचार घेण्याची जिगर दाखवावी. सोबतच शरद पवार, अशोक चव्हाण यांनी राज्यातला सत्ताबदल मुस्लिमांच्या इच्छेने झाल्याचे आणि मुस्लिमांच्या आज्ञेने आम्ही सत्तेत सामील झाल्याचे म्हटले होते. उद्धव ठाकरेंनी यावरही आपले म्हणणे राज्यातील जनतेसमोर मांडावे, जेणेकरून त्यांचे हिंदुत्व अजूनही गुंडाळले नसल्याचे समजेल.

 

दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या सीएएविषयक वक्तव्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठीच चलबिचल झाल्याचे दिसले. मॅडम आणि साहेब सत्तेत राहायला सांगतात की सोडायला, या कल्पनेनेही त्यांच्या पायाखालची वाळू घसरू लागली. म्हणूनच उद्धव ठाकरेंनी सीएएवरुन चारचौघांत बोलू नये, असे इशारेही दिले. पण मग मुख्यमंत्र्यांनी चारचौघांत बोलायचे नाही तर काय खोलीला कडी लावून एकट्याने 'समर्थन, समर्थन' करत बसायचे का? दुसरे म्हणजे ठाकरेंनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदळआपटीकडे लक्ष दिले नाही तरी चालेल, कारण जोपर्यंत सत्तेचा गुळ आहे, तोपर्यंत हे मुंगळे चिकटूनच बसणार आहेत. तसेच कोणीही सरकारमधून बाहेर पडणार नाही, कारण स्वतःच्या जीवावर निवडून येण्याची आपली क्षमता नाही, हेही या सगळ्यांना चांगलेच कळते. म्हणूनच उद्धव ठाकरेंना जर हिंदुत्व व राष्ट्रवादाला पाठिंबा द्यायचा असेल तर तो द्यावा.

@@AUTHORINFO_V1@@