
दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात हत्यारे आणि दारुगोळा जप्त
श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील अनंतनागमध्ये शनिवारी पहाटे झालेल्या गोळीबारात सुरक्षा दलाकडून लष्कर-ए-तोएबाच्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. या दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलाने हत्यारे जप्त केली आहेत. नावीद भट आणि आकीब यासीन भट अशी मारण्यात आलेल्या दहशतवाद्यांची नावं आहेत. सुरक्षादलाने त्यांच्याकडून एके-४७ आणि १ पिस्तुल जप्त केले आहे.
जम्मू काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात पोलीस, सीआरपीएफ आणि आर्मी यांच्या संयुक्त कारवाईत या २ दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. अनंतनागमध्ये संगम या ठिकाणी ही चकमक झाली. यात नावीद भट, आकीब भट यांचा खात्मा करण्यात आला. एके ४७ रायफल, पिस्तुल, एके रायफलींचे मॅगझिन आणि काडतुसे जप्त करण्यात आली.
'सीआरपीएफ'चे सर्च ऑपरेशन सुरू असताना संगम भागात दहशतवादी लपून बसल्याची सूचना त्यांना मिळाली होती. यानंतर घटनास्थळी पोहचलेल्या सीआरपीएफ जवानांवर दहशतवाद्यांकडून गोळीबार सुरू करण्यात आला. प्रत्यूत्तरादाखल सुरक्षादलानेही त्यांच्यावर गोळीबार केला. ठार दहशतवादी ‘लष्कर-ए-तोयबा’ या संघटनेचे असल्याचे सांगण्यात येत आहे.