सावरकरांचा हिंदू (भाग ४)

    दिनांक  22-Feb-2020 21:35:49
|


savarkar _1  H‘माझाच पक्ष खरा, इतरांचे पक्ष चुकीचे’ अशी भूमिका सावरकरांनी कधीच घेतलेली नाही. सनातन्यांपासून साम्यवाद्यांपर्यंत सर्वांनाच सावरकरांच्या हिंदू राष्ट्रात स्थान आहे. स्वराज्य आणि स्वातंत्र्यात सर्वात मोठा शत्रू अराजक असून आपले सारे मतभेद मतपेटीत सामावले पाहिजे, अशी अत्यंत व्यापक भूमिका सावरकरांनी घेतलेली आहे. अर्थात, या मतपेटीचे तळ फुटके नाहीत ना, हे तपासण्याची जबाबदारीही मतदारांची आहे, असा इशारा द्यायलाही ते विसरत नाहीत.


एप्रिल सन १९१५ दि
.९ ला हरिद्वार येथे हिंदू महासभेची रितसर प्राणप्रतिष्ठा झाली. या परिषदेने हिंदुत्वाची व्याख्या केली, ती अशी- हिंदू म्हणजे जो आपणास हिंदू म्हणून घेत असेल तो किंवा भारत वर्षात उत्पन्न झालेल्या कोणत्याही धर्माचा अनुयायी यात सनातनी, आर्यसमाजी, शीख, बौद्धधर्मीय, ब्रम्हो इत्यादींचा अंतर्भाव होतो.


हिंदू महासभेचे हेतू

. अखिल हिंदू समाज एकजीव करण्यासाठी सर्व अंगोपांगांना संघटित करणे.

. हिंदू जाती व हिंदुस्थानातील इतर जाती यामध्ये सद्भाव उत्पन्न करणे आणि त्यांच्यासह हिंदुस्थानात एकजूट करून स्वायत्त व संघटित हिंदी राष्ट्र निर्माण करणे.

. हिंदू जातीतील अस्पृश्य समजलेल्या वर्गांची स्थिती सुधारणे.

. आवश्यकता पडेल तेव्हा हिंदू जातीच्या हितसंबंधांचे संरक्षण व संवर्धन करणे.

. हिंदू समाजाला बलशाली करणे.

. हिंदू स्त्रियांची स्थिती सुधारणे

. गोमाता व गोवंश यांचे रक्षण व संवर्धन करणे.

. सामान्येकरून अखिल हिंदू जातींच्या धार्मिक, नैतिक, शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक व राजकीय हितसंबंधांचे, हक्कांचे संवर्धन आणि संरक्षण करणे.

टीप : हिंदू महासभा हिंदू जातींमध्ये, कोणत्याही एखाद्या पंथांमध्ये वा राजकीय पक्षांमध्ये ढवळाढवळ करणार नाही व तिला विरोध करणार नाही अथवा कोणाच्याही व्यक्तिगत श्रद्धेमध्ये ती ढवळाढवळ करणार नाही.


हे सर्व पाहता मुस्लीम लीगच्या अव्वाच्या सव्वा मागण्या
, इस्लामी राष्ट्र निर्मितीची स्वप्न, लोकसंख्येपेक्षा जास्त अधिकार मागणी, नकाराधिकाराची मागणी या सर्वांचा हिंदुसभेच्या उद्दिष्ट आणि हेतूंमध्येमागमूससुद्धा नाही. उलट धर्मनिरपेक्ष भारतीय राष्ट्र स्थापन करणे, हाच हिंदू महासभेच्या स्थापनेचा स्पष्ट हेतू हा तिच्या ध्येयातच अंतर्भूत केला आहे. अशा परिस्थितीमध्ये हिंदुत्ववादी मंडळींचा पहिला राजकीय पक्ष हिंदू महासभा आणि इस्लामी राष्ट्राचे स्वतंत्र अस्तित्व मांडणारी फुटीरतावादी मुस्लीम लीग हे दोघेही एकाच नाण्याच्या दोन बाजू म्हणून मांडणे हिंदुत्ववाद्यांवर अन्यायकारक होते, हे अगदी उघड आहे. False equality निर्माण करून हिंदू महासभा आणि मुस्लीम लीग एकाच परिभाषेत मोजणे अन्यायकारक होते. हिच छद्म समानता पुढे जागतिक इस्लामी दहशतवादावर पांघरूण घालण्यासाठी भ्रामक ‘भगवा दहशतवाद’ या संकल्पनेला जन्म घालते.हिंदू महासभेने प्रथमपासूनच हिंदूंसाठी कोणताही अधिकचा अधिकार मागितला नाही
. मुस्लीम लीगच्या जशा कुख्यात १४ मागण्या होत्या, तशा कोणत्याही मागण्या हिंदू महासभेने कधी केल्या होत्या काय? सनातन धर्म, शीख, जैन, बौद्ध हे सर्वच हिंदू होत, ही व्याख्या हिंदुमहासभेने फार आधीपासूनच केली होती. सावरकरांनी १९२३ साली तिला तात्त्विक आकार देऊन सूत्रबद्ध व्याख्या केली. सावरकर १९३७ साली राजकारणात आले त्यापूर्वीच दोन वर्षे म्हणजे १९३५ साली हिंदू महासभेचे अध्यक्षपदी बौद्धभिक्षू उत्तमा हे हिंदू महासभेचे अध्यक्ष झाले होते.


भारताची राज्य घटना निर्माण होत असताना हिंदू महासभेनेही स्वत
:च्या कल्पनेतून साकारलेल्या राज्यघटनेचे मुद्दे मांडले होते. ते बहुतांशी डॉ. आंबेडकरांच्याच सध्या अस्तित्वात असलेल्या भारताच्या राज्यघटनेशीच मिळतेजुळते आहेत. त्यातील महत्त्वाचे मुद्दे शं. रा. दाते लिखित ‘महाराष्ट्र हिंदुसभेचा इतिहास’ या पुस्तकामध्ये दिलेले आहेत. तात्पर्य, हिंदू महासभा आणि मुस्लीम लीग यांच्यात कोणत्याही प्रकारे संकुचित समानता नाही.


स्वातंत्र्यवीर सावरकर आणि जिना


त्या काळातही नि आताही काही वेळा अभ्यासक वा टीकाकार सावरकर आणिमोहंम्मद अली जिना यांच्याकडे एकाच चष्म्यातून पाहतात
. दोघेही द्विराष्ट्रवादी, दोघेही वैयक्तिक जीवनात नास्तिक किंवा निदान अधार्मिक असे बळेच गृहीत धरून ते समपातळीवरचेच असा लाडका निष्कर्ष काढण्यास विशिष्ट प्रवृत्तीचे अभ्यासक उत्सुक असतात. वस्तुतः स्वातंत्र्यवीर सावरकरांचा स्वातंत्र्यासाठीचा सशस्त्र लढा, क्रांतिकारी चळवळ, भोगलेली काळ्या पाण्याची शिक्षा याबाबत तर मोहम्मद अली जिना कुठेच नाहीत. राजकारण करतानासुद्धा सावरकरांनी कधीही हिंदूंसाठी एकतरी जास्तीचा अधिकार मागितला होता का? लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व, न कमी न जास्त, इतक्या विशुद्ध लोकशाहीच्या कल्पनेवर त्यांचे हिंदू राष्ट्र उभे आहे.


त्यात अहिंदूंचे दमन करावयाचे नाही
, त्यांना लोकसंख्येच्या प्रमाणात सर्वच्या सर्व अधिकार समान पातळीवर देण्यास सावरकरांचा राष्ट्रवाद तयार आहे, असे असताना सावरकर - जिना एका पातळीवर असूच शकत नाहीत. जिना काल्पनिक मुसलमानांनी राष्ट्र समोर ठेवून कृत्रिमपणे लोकसंख्येच्या प्रमाणापेक्षा जास्त प्रतिनिधित्व हवे होते आणि काँग्रेस तसे त्यांना देऊ करत होती. मुस्लीम लीग आणि काँग्रेस यांचा मुसलमानांना जास्त प्रतिनिधित्व देण्यावर मतभेद नसून किती कमी-जास्त द्यायचे, यावर मतभेद होते. काहीही ठरले असते तरी बहुसंख्य हिंदूंचा वाटा कमी होणार होता. सावरकरांचे सर्व राजकारण हिंदू-मुस्लीम ऐक्याच्या भ्रामक नावाखाली हिंदूंना संख्येपेक्षा वाटा कमी करण्याच्या विरुद्ध होते आणि काही जास्तही मागत नव्हते. त्यामुळे सावरकर हेच शुद्ध लोकशाहीवादी आणि धर्मनिरपेक्ष ठरतात.


दुसरे म्हणजे सावरकर
-जिना यांची काही गौण मुद्दे समान मानून तुलना करणारे, सावरकरांनी जसे हिंदूंचे प्रबोधन केले, जुनाट कालबाह्य गोष्टींवर जशी परखड टीका केली तशी जिनांनी कधी केली नाही, हे सोयिस्करपणे विसरतात. जिनांनी मुस्लीम धर्मांधतेला खतपाणी घालून फाळणी घडवली. याउलट सावरकरांचा मार्ग नुसते वैयक्तिक आयुष्यात बुद्धिवादी राहूनच न थांबता धार्मिक प्रबोधन, हिंदूंच्या पोथी निष्ठेवर कठोर आणि चौफेर हल्ला, हिंदूंची एकजाती करण्याचे जात्युच्छेदन, समता आणि ममता साधण्याचे सर्व प्रयत्न केले. अशा परिस्थितीत सावरकरांच्या राजकारणाची तुलना समपातळीवर होऊच शकत नाही. मुसलमान धर्मवेडे आहेत, त्याचे उत्तर म्हणून हिंदूंनी धर्मवेडे व्हावे, अशी भूमिका न घेता धर्मवेडाची नांगी ठेचू शकेल, असे एकच बळ म्हणजे वैज्ञानिक दृष्टी असे ते म्हणतात. सावरकरांबरोबर जिनांची तुलना कल्पनेतसुद्धा संभवत नाही.


राजकीय पक्षांसाठी आचारसंहिता


सावरकरांनी सांगितलेली हिंदू राष्ट्राच्या बहुपक्षीय लोकशाहीची आचारसंहिता आजही मार्गदर्शक ठरावी अशी आहे
. त्याची प्रमुख पाच सूत्रे अशी-

. सर्व पक्षांनी लाल ध्वज, तिरंगा ध्वज, भगवा ध्वज किंवा इतर कोणतेही पक्षाचे चिन्ह याचा मानभंग होईल, असे वर्तन टाळण्याचा शक्य तितका प्रयत्न केला पाहिजे.

. एखाद्या पक्षाने एखादी सभा मिरवणूक व आंदोलन आयोजित केले असेल तर इतर पक्षांनी एक तर त्यात उपस्थित राहण्याचे अजिबात टाळावे किंवा जर उपस्थित राहिले तर त्या पक्षाचे विचार व युक्तिवाद शांतपणे ऐकून घेतले पाहिजेत. त्यामध्ये बळाने कोणताही व्यत्यय आणता नये किंवा तो कार्यक्रम उधळण्याचा काही प्रयत्न करता कामा नये. जर त्या पक्षाची मते व कार्यक्रम टीका अयोग्य व निषेधार्ह वाटत असतील तर स्वतंत्र सभा अथवा कार्यक्रम घेऊन अशी टीका व निषेध केला गेला पाहिजे.

. जेव्हा दोन, तीन किंवा सर्वच पक्षांनी एक समान कार्यक्रम एकत्रित आयोजित करण्याचे ठरवले असेल, तर त्यांनी सर्वसंमत अशा ठरावाच्या योजना, घोषणा, ध्वज किंवा इतर कार्यक्रम अगोदर निश्चित केल्या पाहिजेत. ही योजना सर्वांना समजावून सांगितली पाहिजे. कुणीही या सर्वसंमत मर्यादेचा भंग करता नये किंवा फूट पडेल, असे वक्तव्यही करता नये.

. ही सर्व काळजी घेऊन व पथ्ये पाळूनही जर काही जणांकडून या आचारसंहितेचे उल्लंघन होत असेल, तर त्या व्यक्ती ज्या पक्षाच्या असतील त्या पक्षांनी त्यांच्या अशा उपद्रवाचा निषेध केला पाहिजे आणि इतर पक्षांनी अशी कृती संबंधित पक्षाची न मानता वैयक्तिक अशीच मानले पाहिजे. अशा वैयक्तिक चुकांकरता सबंध पक्षाला दोषी धरता नये.

. जसा प्रत्येकाला आपली मते मांडण्याचा व त्याचा प्रचार करण्याचा हक्क आहे, तसाच दुसर्या पक्षालाही त्या मताचा कायदेशीर मार्गाने विरोध व निषेध करण्याचा हक्क आहे. जोपर्यंत हा विरोध व निषेध अशा कायदेशीर व सर्जनशीलतेच्या मर्यादेत आहे, तोवर तो कितीही अप्रिय वाटत असला तरी सहन केला पाहिजे. हा सहनशीलतेचा सद्गुण प्रत्येक पक्षांनी जोपासला-रुजवला पाहिजे. सावरकरांनी आपल्या बहुपक्षीय धर्मनिरपेक्ष हिंदू राष्ट्राची जी आचारसंहिता मांडली याहून अधिक लोकशाहीवादी राष्ट्र काय असू शकते? (शेषराव मोरे - सावरकरांचा बुद्धिवाद पृ. २३८-२३९)


सावरकरी हिंदू राष्ट्र बहुपक्षीय लोकशाहीवादी
!


सन १९३८ मध्ये अजमेरच्या भाषणात सावरकर म्हणाले
- “आमचे भारतीय पार्लमेंट अशा स्वरूपाचे तयार होईल की, त्या पार्लमेंटमध्ये पाय ठेवताच हिंदू, मुसलमान, पारशी या भेदाचा मागमूसही राहणार नाही. सारेच्या सारे, भारतीय या नावाने संबोधले जातील. काँग्रेसने जर अशी प्रणाली रचली असती तर मी प्रथम काँग्रेसचा सभासद झालो असतो व नंतर हिंदू महासभेचा! परंतु, काँग्रेस राष्ट्रीयत्वाचा केवळ देखावा मात्र करत आहे.”


सन १९३९ मध्ये हिंदू संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना ते म्हणतात
- “हिंदू महासभेच्या दृष्टीने खरी राष्ट्रीयता तीच की तिच्या छायेखाली प्रत्येक व्यक्ती समान असेल. जिच्या लोकसभेत तुम्ही कोणत्या धर्माचे आहात, मुसलमान आहात, ख्रिश्चन आहात की यहुदी आहात, हे कोणालाही विचारले जाणार नाही. आम्ही सर्वांना हिंदुस्थानी संबोधू! सार्वजनिक क्षेत्रात सरकारी नोकरीतून हिंदुस्थानचा मनुष्य आहे की नाही व त्याची योग्यता आहे की नाही एवढेच पाहू. याहून खरी राष्ट्रीयता ती दुसरी काय असते? आम्ही तर छातीठोकपणे असे सांगू शकतो की काँग्रेस एवढेच काय पण काँग्रेसपेक्षाही काकणभर अधिक हिंदू महासभा राष्ट्रीय आहे.”


स्वातंत्र्य मिळाल्यावर सन १९४९ साली कोलकाता येथे हिंदू महासभेचे एक भव्य अधिवेशन झाले
. त्यावेळी सावरकरांनी दिलेला संदेश त्यांच्या लोकशाहीवरच्या निष्ठेविषयी आणि अराजकता विरोधी दृष्टीवर स्पष्टपणे प्रकाश टाकतो. सावरकर म्हणतात, “आपले भवितव्य घडवण्याचे आता आपल्याच हाती आहे, हे विसरू नका. मी या व्यासपीठावरून उद्घोषित करतो की, हिंदुसभेच्या छावणीतील तरुणांपासून वृद्ध नेत्यांपर्यंत प्रत्येकजण राष्ट्रीय आपत्तीत राष्ट्ररक्षणासाठी धावून येईल, मग सरकार कोणत्याही पक्षाचे असो. काँग्रेसचे असो वा समाजवाद्यांचे असो. हे ध्यानात ठेवा की, काँग्रेसवाले काय किंवा इतर कोणीही काय प्रामाणिक देशभक्तच आहेत. काळाबाजार, महागाई यासारख्या आपत्ती इतर देशातही आहेतच. मोठ्या उलथापालथीत अशी अव्यवस्था काही काळ अटळच असते. उद्या हिंदुमहासभेचे सरकार झाले तर काळाबाजार तत्क्षणी थांबेल काय? ज्याने त्याने आपल्या मनोदेवतेची साक्ष काढली तर लक्षात येईल, की कलंकभूत माणसे प्रत्येक पक्षात आहेतच. कारण, शेवटी सरकारची आणि जनतेची नैतिक पातळी एकच असावयाची. परस्परांवर दोघांचेही प्रतिबिंब उमटत असते. (तेव्हा) या अंतर्गत कठीण परिस्थितीने निराश होऊ नका.”


स्वा. सावरकर २२-१२-१९४९ आपला राष्ट्रधर्म


स्वातंत्र्यवीर सावरकर आपल्या खास सूत्रमय भाषेत सांगतात
. तो असा - आता आपले साध्य स्वातंत्र्य संरक्षण हे आहे. राष्ट्र संवर्धन हे आहे. आता निर्बंध स्वच्छता नव्हे तर निर्बंधशीलता, विध्वंसक नव्हे तर विधायक वृत्ती हा राष्ट्रधर्म आहे. स्वातंत्र्यानंतर देशात राज्य काँग्रेसचे आहे, असे म्हणणे सावरकरांना चुकीचे वाटते. ते म्हणतात, राज्य कोणा एका पक्षाचे नसून आपणा सर्वांचे आहे, हीच भाषा वापरली पाहिजे. विरोधी पक्ष हा विरोधासाठी विरोध करणारा नसावा, असे मत त्यांनी मांडले आहे. विरोधी पक्ष हा शब्दप्रयोग यापेक्षा अल्पमततधारी पक्ष हे शब्दप्रयोग सावरकरांना अधिक योग्य वाटतात. माझाच पक्ष खरा इतरांचे पक्ष चुकीचे अशी भूमिका सावरकरांनी कधीच घेतलेली नाही. सनातन्यांपासून साम्यवाद्यांपर्यंत सर्वांनाच सावरकरांच्या हिंदू राष्ट्रात स्थान आहे. स्वराज्य आणि स्वातंत्र्यात सर्वात मोठा शत्रू अराजक असून आपले सारे मतभेद मतपेटीत सामावले पाहिजे, अशी अत्यंत व्यापक भूमिका सावरकरांनी घेतलेली आहे. अर्थात, या मतपेटीचे तळ फुटके नाहीत ना, हे तपासण्याची जबाबदारीही मतदारांची आहे, असा इशारा द्यायलाही ते विसरत नाहीत. सावरकरांनी मांडलेले हे विचार अपवादात्मक नसून या भूमिकेचे शेकडो पुरावे आणि पुनरुच्चारण दाखवून देता येते. सावरकरांच्या हिंदू राष्ट्राचे लोकशाहीवादी आणि धर्मनिरपेक्ष समता व मानवतावादी स्वरूप असे आहे. सावरकरी हिंदू राष्ट्राचे स्वरूप छद्म-विकृत धर्मनिरपेक्ष नसून असे खर्‍या अर्थाने धर्मनिरपेक्ष आहे, ते ‘धर्माधिष्ठित राज्य’ नसून ‘इहवादी हिंदू राष्ट्र’ आहे.

- चंद्रशेखर साने
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.